निर्यातबंदी टाळा; अन्न बाजारपेठा खुल्या ठेवा

अमेरिकेसह ३६ देशांचे संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांना आवाहन
Food Security
Food SecurityAgrowon

न्यू यॉर्क, अमेरिका (वृत्तसंस्था) ः हवामान बदल (Climate Change) आणि रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) परिणाम यंदा जगभरातील अन्नधान्य उत्पादनावर (Foodgrain Production) आणि साठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जगभरात मोठे अन्न संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेसह ३६ देशांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांना अन्न आणि कृषी उत्पादनांच्या बाजारपेठा खुल्या ठेवण्याबरोबरच अन्न आणि खतांवरील निर्यात बंदीसारखे (Export Ban) अन्य अन्यायकारक निर्बंध टाळण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक अन्न सुरक्षेसाठी रोडमॅप-कृतीची गरज या विषयावर गुरुवारी (ता. १९) झालेल्या मंत्रीस्तरावरील बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात ३६ देशांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांना जागतिक कृषी आणि अन्न व्यवस्थेला बसलेल्या धक्क्यांमुळे होणारा मध्यम आणि दीर्घकालीन परिणाम कमी करण्यासाठी एकत्रितपणे कृती करण्याचे आवाहन केले. अन्न सुरक्षेचा संभाव्य धोका आणि खतांचा तुटवडा कमी करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. कृषी क्षमता आणि लवचिकतेमध्ये गुंतवणूक वाढवण्याबरोबरच असुरक्षित परिस्थितीत असलेल्यांना त्यांच्या अन्नसुरक्षा, पोषण आणि कल्याणावर होणाऱ्या परिणामांपासून सुरक्षित केले पाहिजे आणि या गंभीर मुद्द्यांवर उच्चस्तरीय जागतिक राजकीय प्रतिबद्धता टिकवून ठेवली पाहिजे, असे या निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेचे अर्थमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जागतिक अन्न सुरक्षेसह पोषण आणि लवचिकतेच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला. उपलब्ध संसाधनांच्या मदतीने सात मुद्द्यांवर कृती कार्यक्रम राबविण्याबाबत संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांना आवाहन करण्यात आले. मानवतावादी दृष्टिकोनातून जीव वाचवण्यासाठी तातडीने मानवतावादी साह्य करणाऱ्या संघटनांना आणखी निधी पुरवण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांना विनंती करण्यात आली की, अन्न आणि कृषी उत्पादनांच्या बाजारपेठा खुल्या ठेवाव्यात आणि अन्न आणि खतांच्या निर्यात बंदीसारखे अन्यायकारक निर्बंध टाळण्याबाबत सांगण्यात आले. ज्यामुळे जागतिक स्तरावर अन्न सुरक्षेला आणि पोषणाला निर्माण झालेला धोका आणि बाजारपेठेत वाढणारी अस्थिरता कमी होऊ शकेल, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. असुरक्षित परिस्थितीत असलेल्या आणि आधीच गरिबी, भूक आणि कुपोषणाचा अनुभव घेत असलेल्यांसाठी प्राधान्याने सदस्यांनी कृती कार्यक्रम राबवावा आणि काळ्या समुद्रातून सुरक्षितपणे वाहतुकीचे आश्‍वासन द्यावे, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या बैठकीमध्ये रोडमॅपला प्रतिसाद देताना अनेक प्रकारची आश्‍वासने देण्यात आली असून, या रोडमॅपची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त संसाधनांना चालना देण्याची आवश्‍यकता असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

३६ देशांतील ४० दशलक्ष लोक तीव्र स्वरूपात अन्न असुरक्षित

अन्नाच्या प्रश्‍नासंदर्भात २०२२ च्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार तीव्र अन्न असुरक्षेचा सामना करणाऱ्या जगातील लोकांची संख्या २०१९ च्या तुलनेत वाढून १३५ दशलक्षवरून १९३ दशलक्षांवर पोहोचली. ५३ देशांतील १९३ दशलक्ष लोकांना अन्नसुरक्षेसंदर्भात मदतीची गरज आहे. तर ३६ देशांतील सुमारे ४० दशलक्ष लोक दृष्काळसदृश स्थितीत असून तीव्र स्वरूपाच्या अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com