राज्यात केळीचे दर उच्चांकी पातळीवर

बहुतांशी भागात केळीची टंचाई; नव्या लागवडीसाठी रोप मागणीत वाढ
राज्यात केळीचे दर  उच्चांकी पातळीवर
BananaAgrowon

कोल्हापूर : राज्यात केळीची (Banana) उपलब्धता कमी असल्याने केळीचे दर (Banana Rate) उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. केळीला टनास विभागानुसार १५००० ते २०००० रुपये पर्यंत दर मिळत आहे.

या पार्श्‍वभूमीवर ठप्प असलेली केळी रोपांची मागणी (Banana Plant Demand) मात्र आता हळूहळू वेग धरू लागली आहे. राज्यातील अनेक रोपवाटिकांकडे जुलै मागणीचे बुकिंग सुरू आहे. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र वगळता खानदेश व मराठवाड्याच्या काही भागांत जुलैनंतर केळी लागवडी वाढण्याची शक्यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र अजूनही अपेक्षित प्रमाणात केळी रोपांची मागणी नसल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले.

केळी उपलब्धतेसाठी धावाधाव
खानदेशामध्ये बहुतांशी करून केळीची लागवड होते. कोरोनामुळे केळीचे मोठे नुकसान झाल्याने पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून केळीच्या लागवडी थांबल्या आहेत. यातच महापुराने नुकसान झाल्याने केळी लागवड करण्यास शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. तर खानदेशातील केळी उत्पादक तालुक्यांमध्ये व्हायरसमुळे केळी खराब होत आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या राज्यात केळीची टंचाई जाणवत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून केळीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर केळी दर कमी झाले. पण त्यानंतर बाजारपेठा खुल्या झाल्याने केळी दरात वाढ होत राहिली. पण मागणी प्रमाणात केळी उपलब्ध नसल्याने दरात सातत्याने वाढ होत राहिली. सध्या पश्‍चिम महाराष्ट्रात केळी उपलब्ध नसल्याने या भागातील व्यावसायिक सोलापूर टेंभुर्णी जळगाव भागातून केळी घेत आहेत. पण या भागातही केळीचे प्रमाण कमी असल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. आणखी एक महिना तरी केळीचे दर तेजीतच राहतील, अशी शक्यता आहे. ज्या शेतकऱ्याकडे केळी आहेत या शेतकऱ्यांकडे केळी खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागत आहे. अनेकांनी खोडवा, निडवा ठेवला नसल्याने केळीच्या उत्पादनात घट आहे.

टिश्‍युकल्चर लॅबमध्ये लगबग वाढली
गेल्या वर्षभरापासून मंदीत असणाऱ्या टिश्‍युकल्चर लॅबमध्ये मात्र आता लगबग दिसते. जून-जुलैच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी केळीच्या रोपांची आगाऊ नोंदणी या रोपवाटिकांमधून सुरू केली आहे. अचानक मागणी वाढल्याने रोपे हव्या त्या प्रमाणात तयार नसल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांना जुलैनंतरच बुकिंग घ्यावे लागत आहे. सध्या केळीला दर असल्याने पाण्याची सोय असणारा शेतकरी केळीला पसंती देत असल्याचे केळी रोपवाटिका चालकांनी सांगितले. जुलैपासून थोड्या थोड्या प्रमाणात केळी लागवड वाढेल, असा अंदाज केळी क्षेत्रातील तज्ज्ञांचा आहे.

गेल्या काही दिवसांपासून केळीला चांगले दर मिळत आहेत. आमच्यासाठी सध्याचे दर हे सुखावणारे आहेत. विशेष म्हणजे सातत्याने मागणी आहे. यामुळे दर चांगले मिळतील, असा विश्‍वास आहे.
राजकुमार गाजी, केळी उत्पादक, दुधगाव, जि. सांगली
आमच्याकडे सध्या केळी रोपांची मागणी वेगात आहे. मागणीच्या तुलनेत तातडीने रोपांची उपलब्धता करणे अडचणीचे ठरत आहे. जुलै-ऑगस्टमध्ये मात्र पुरेशा प्रमाणात रोपे उपलब्ध होतील, अशी शक्यता आहे.
सुरेश मगदूम,वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता, जैन इरिगेशन, कोल्हापूर विभाग
सध्या खानदेश, नांदेड भागातून लागवडीसाठी रोपांना मागणी आहे. या तुलनेत स्थानिक पश्‍चिम महाराष्ट्रातून मागणी कमी आहे. या भागात महापुराच्या भीतीने काही शेतकरी रोप लागवड करण्यास दबकत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्याच्या अन्य भागांतून मात्र रोप मागणीत सातत्य आहे.
विश्‍वास चव्हाण, टिश्युकल्चर लॅब चालक, तळसंदे, जि. कोल्हापूर
राज्यात सध्या बऱ्हाणपूर, रावेर, सोलापूर भागातील बाजारपेठांमध्ये केळीला चांगला दर मिळत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये स्थानिक केळी नसल्याने इतर ठिकाणाहून केळीचा शोध घ्यावा लागत आहे.
चेतन पाटील, केळी रायपनिंग चेंबर व्यावसायिक, तमदलगे, जि. कोल्हापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com