खानदेशात कापसाच्या सरळ वाणांचा काळाबाजार

चार हजार रुपये प्रति पाकिटने विक्री; प्रशासन अपयशी
खानदेशात कापसाच्या सरळ वाणांचा काळाबाजार
cottonagrowon

जळगाव ः खानदेशात कापसाच्या (Khandesh Cotton) सरळ किंवा देशी सुधारित, देशी संकरित वाणांची (Indigenous Cotton Verity) मागणी किमान दोन ते अडीच लाख पाकिटांची आहे. परंतु पुरवठा (Cotton Seed Supply) अत्यल्प आहे. यातच काही सरळ वाणांचा पुरवठा कंपन्यांकडून झालेलाच नाही. यामुळे या वाणांचा मोठा काळाबाजार (Black Market Of Cotton Seed) सुरू आहे. या वाणाच्या एक ४३५ ते ४५० ग्रॅम वजनाच्या पाकिटाची विक्री तब्बल साडेतीन ते चार हजार रुपयांनी सुरू आहे.

गुजरात, मध्य प्रदेशातून या वाणांची खरेदी काही एजंट करीत आहेत. त्याची विक्री जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, धरणगाव, भडगाव, जामनेर, रावेर, एरंडोल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा या भागांत अव्वाच्या सव्वा दरात सुरू आहे. हा काळाबाजार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यंदा ‘एचटीबीटी’ किंवा ‘बोलगार्ड पाच’ या वाणांच्या नावाखाली बियाण्यांची खानदेशात काळ्या बाजारात एप्रिलपासून विक्री सुरू होती. ही विक्री सुरू असतानाच सरळ वाणांचाही काळाबाजार सुरू झाला आहे.

खानदेशात रावेर, शहादा, तळोदा भागांतील केळी उत्पादक बेवडसाठी सरळ वाणांची लागवड करतात. तर पारोळा, अमळनेर, जामनेर, धरणगाव, शिरपूर व इतर भागांतील टंचाईचा सामना करणारे शेतकरी सरळ वाण लागवडीला पसंती देतात. कमी पाणी आणि फवारणी, खतांच्या अल्प खर्चात सरळ वाणांद्वारे चांगले उत्पादन खानदेशात अनेक शेतकरी घेतात. त्यांची मागणी अडीच ते तीन लाख पाकिटांची आहे. परंतु पुरवठा पाच ते १० हजार पाकिटे एवढाच असतो. यातच अधिकची मागणी असलेल्या एका कंपनीच्या वाणाचा पुरवठा यंदा अद्याप झालेला नाही. या कंपनीकडून सरळ वाणांचा पुरवठाच होणार नाही, अशी आवईदेखील होती. यामुळे या कंपनीच्या वाणाचा काळाबाजार वेगात सुरू आहे. विनापावती विक्री सुरू आहे. एजंट गावोगावी सक्रिय आहेत. काही कृषी केंद्रचालकही यात खिसे भरत आहेत. प्रशासनाचा याकडे काणाडोळा असल्याची कुजबूजदेखील सुरू आहे.

एका कंपनीच्या देशी किंवा सरळ वाणांची लागवड मला करायची आहे. पण त्याचा पुरवठाच यंदा बाजारात झालेला नाही. काळ्याबाजारात त्याची विक्री साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिपाकिट या दरात सुरू आहे. हे बियाणे बाजारात का आले नाही, हा प्रश्‍न आहे. बियाणे काळ्या बाजारात पाठवायचे आणि अधिकची नफेखोरी करायची, असा प्रकार सुरू आहे.
एक शेतकरी, पारोळा, जि. जळगाव
देशी सुधारित किंवा सरळ वाणांच्या एका कंपनीच्या वाणाची अधिक मागणी आहे. त्यामुळे संबंधित कंपनी व वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून या वाणांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. इतर कंपन्यांच्या सरळ वाणांचा पुरवठा झाला आहे. सरळ वाणांच्या काळ्या बाजाराबाबत एक कारवाईदेखील मुक्ताईनगर तालुक्यात झाली आहे.
वैभव शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com