‘बीएनपीएल’ची धोक्याची घंटा

जगातील सर्वात महागडे शिक्षण क्षेत्र, जगातील सर्वात जास्त पेटंट घेणारी विद्यापीठे आणि संशोधन संस्था असणाऱ्या देशाला टीनएजर मुलांना आयुष्य म्हणजे नक्की काय, शिक्षण कशाशी खातात हे शिकवून इतरांचे, लहान मुलांचे प्राण घेण्यापासून परावृत्त कसे करायचे हे माहीत नाही.
BNPL
BNPLAgrowon

संजीव चांदोरकर

‘बीएनपीएल’ म्हणजेच Buy Now Pay Later. म्हणजे आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या. वित्त क्षेत्रात वापरली जाणारी इंग्रजीमधील कितीतरी लघुरूपे जसे की एटीएम, ईएमआय, क्रेडिट कार्ड, गुगल पे इत्यादी अगदी खेडेगावातील लोकांच्या दैनंदिन भाषा व्यवहाराचा अविभाज्य भाग बनत आहेत. अमेरिकेतील वित्तक्षेत्र नेहमीच जगासाठी ट्रेंड सेट करत असते. त्यावरून ठोकताळे बसवायचे तर `बीएनपीएल` हे लघुरूप आता वापरात असणाऱ्या लघुरूपांच्या कुटुंबात येणार हे नक्की.

आता खरेदी करा आणि नंतर पैसे भरा (बीएनपीएल) ही संकल्पना तशी नवीन नाही, कारण त्याच मार्गाने जाणारे क्रेडिट कार्ड गेली अनेक दशके वापरले जात आहे. मग `बीएनपीएल`मध्ये नवीन काय आहे? क्रेडिट कार्डवर केलेली खरेदीचे पैसे विशिष्ट कालावधीत / महिन्यात क्रेडिट कार्ड कंपनीला भरावे लागतात; `बीएनपीएल` मध्ये मात्र पैसे हप्त्याने भरणे अध्याहृत आहे.

मोटर बाईक , फ्रिज , टीव्ही अशा महाग वस्तूंसाठी हप्त्याने पैसे देण्याची सोय लॉजिकल आहे; पण आता मोजे, किराणामाल, कपडे अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी बीएनपीएल ऑफर केले जात आहे. आता ऍमेझॉन, वॉलमार्ट यासारख्या ऑनलाइन शॉपिंग कंपन्या टार्गेट वित्तक्षेत्रात देखील घुसल्या आहेत आणि त्यांचा रिटेल कर्जाचा पोर्टफोलिओ त्यांना वाढवायचा आहे. दुसऱ्या बाजूला बीएनपीएल देणारी अनेक ॲप्स विकसित केली गेली आहेत.

BNPL
शेतकऱ्यांना यंदा मिळणार ४२ हजार कोटींची ‘एफआरपी’

प्रत्येक क्रेडिट कार्डला किती क्रेडिट देणार याची मर्यादा ठरवली जाते आणि त्यात खरेदीदारांची ऐपत , मासिक उत्पन्न इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या जातात ; परंतु `बीएनपीएल`मध्ये मात्र नागरिकांची `पत` (क्रेडिटवर्दीनेस) दुर्लक्षिली जात आहे. अमेरिकेत ८० टक्के नागरिक बीएनपीएल वित्तसेवेचा वापर करत आहेत. त्यातील ७० टक्के बॉटम ऑफ पिरॅमिड म्हणजे तळाच्या आर्थिक गटामधील आहेत.

सिस्टीमचा विचार केला तर ही अशी वित्तप्रॉडक्ट कशी तयार होतात हे कळते. थिजलेल्या अर्थव्यवस्था, जीडीपी, कुटुंबांची- व्यक्तींची खालावलेली क्रयशक्ती, रिटेल क्षेत्रात विशेषतः ऑनलाइन कंपन्यांत असणारी रक्तरंजित स्पर्धा, वित्त क्षेत्रातील तयार झालेली अनेक स्टार्टअप्स आणि विकसित देशात गेली काही वर्षे आलेला भांडवलाचा महापूर यांना एकत्रित बघितले की बीएनपीएलचा अर्थ लागतो.

BNPL
दूध क्षेत्र : हवी लूटमार मुक्तीकडे वाटचाल

२००८ मध्ये माहीत असूनही, ऐपत नसणाऱ्या नागरिकांना गृहकर्जे दिल्यामुळे अमेरिकेत `सबप्राइम` अरिष्ट आले आणि त्यामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली. अमेरिकेसह अन्य देशांनाही खूप मोठी किंमत चुकवावी लागली. अक्कल गहाण न ठेवलेले अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील अर्थतज्ज्ञ इशारे देत आहेत की बीएनपीएल टिकटिक करणारा एक टाइम बॉम्ब आहे आणि वाढणारी महागाई , वाढणारे व्याजदर इत्यादींमुळे तो कधीही फुटू शकतो.

आपण भारतात याची दखल का घ्यावी? कारण हे लोण आपल्याकडे आधीच आले आहे आणि फुगा फुटल्यानंतर स्थूल अर्थव्यवस्थेवर (मॅक्रो इकॉनॉमी) होणाऱ्या परिणामातून कोणीही सुटू शकत नाही म्हणून. या सगळ्यात गुंतलेल्या व्यक्तींना अनैतिक, स्वार्थी असली लेबले लावणे बंद करूया. प्रश्न विचारू या यात शासन संस्था, रेग्युलेटर्स, नियामक मंडळे, साऱ्या वित्तसंस्थांचे सुटेड बुटेड बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काय करत आहेत? व्यक्तिकेंद्री नाही सिस्टीमकेंद्री विचार करूया.

ओ अमेरिका...

देशाच्या बाह्य शत्रुंपासून संरक्षण सिद्धतेसाठी दरवर्षी ७०० बिलियन्स डॉलर्स (५६ लाख कोटी रुपये) खर्च करणाऱ्या देशाला काही डॉलर्समध्ये नाक्यावरच्या दुकानात मिळणाऱ्या बंदुकीपासून आपल्या नागरिकांचे, कोवळ्या मुलांचे जीव आपल्याच हिंसक नागरिकांपासून कसे वाचवायचे हे कळत नाही. एकदा नाही पुन्हा पुन्हा...

जगातील सर्वात महागडे शिक्षण क्षेत्र, जगातील सर्वात जास्त पेटंट घेणारी विद्यापीठे आणि संशोधन संस्था असणाऱ्या देशाला टीनएजर मुलांना आयुष्य म्हणजे नक्की काय, शिक्षण कशाशी खातात हे शिकवून इतरांचे, लहान मुलांचे प्राण घेण्यापासून परावृत्त कसे करायचे हे माहीत नाही.साऱ्या जगाला बहुसांस्कृतिकता, व्यक्तिस्वातंत्र्य, तथाकथित लोकशाही प्रणालीचे महत्त्व अशी प्रवचने देण्याची एकही संधी न सोडणाऱ्या देशाला आपल्याच देशातील वांशिक भेद, कातडीच्या रंगाचे भेद रक्तरंजित होण्यापासून थांबवता येत नाही.

अमेरिकेतील (आणि भारतासकट इतर देशांतील ) शाळा, कॉलेजेसच्या मुला-मुलींना आवाहन - आमच्या पिढीने केलेल्या चुका, आमच्या पिढीचा दुटप्पीपणा, आमच्या पिढीचा बोलघेवडेपणा, आमच्या पिढीचा निष्क्रीय बोटचेपेपणा याकडे तुच्छतेने बघा. आणि स्वतःचे आयुष्य, समाजकारण, राजकारण, पर्यावरण हातात घ्या. हे एकविसावे शतक तुमचे आहे.

(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक असून टाटा समाजविज्ञान संस्थेत अध्यापन करतात.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com