कापूस, मक्याच्या भावात घसरण

मे महिन्यात कापूस व मका यांच्या किमती पहिल्या तीन सप्ताहांत वाढत होत्या. शेवटच्या सप्ताहात मात्र त्या कमी झाल्या.
कापूस, मक्याच्या भावात घसरण
Cotton And MaizeAgrowon

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी

मे महिन्यात कापूस व मका यांच्या किमती पहिल्या तीन सप्ताहांत वाढत होत्या. शेवटच्या सप्ताहात मात्र त्या कमी झाल्या. हळद, हरभरा, मूग, सोयाबीन व तूर यांच्या किमती कमी होण्याचा कल होता. कांद्याच्या किमती रब्बी आवक वाढल्यामुळे कमी होत होत्या; अखेरच्या सप्ताहापासून त्या वाढू लागल्या आहेत.

मे महिन्यात कापसाची भारतातील सर्व बाजार समितीतील साप्ताहिक आवक कमी होत होती. मक्याची रब्बी आवक अजून चालू आहे; मे महिन्यात ती प्रति सप्ताह ५०,००० टनांच्या आसपास होती. हळदीची आवक कमी होत आहे. मुगाची आवक मे महिन्यात वाढून ती प्रति सप्ताह १५,००० टनापर्यंत गेली आहे. हरभऱ्याची आवक वाढून ती १,६६,००० टनांपर्यंत गेली होती; सध्या ती ९०,००० टनांच्या आसपास आहे. किमती घसरू लागल्याने मे महिन्यात सोयाबीनची आवक वाढली. कांद्याची आवक वाढून ती प्रति सप्ताह सरासरी ३ लाख ५० हजार टनांपर्यंत गेली आहे. टोमॅटोची मे महिन्यातील सरासरी आवक ५०,००० टन आहे.

NCDEX मध्ये १ जूनपासून ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी मका व हळदीचे व्यवहार सुरू झाले. MCX मध्ये कापसाचे जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू आहेत. कपाशीसाठी MCX मध्ये नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरीसाठी व्यवहार उपलब्ध आहेत. सोयाबीन, हरभरा, मूग, तूर यांचे मात्र फ्यूचर्स व्यवहार अजूनही चालू केले नाहीत. या महिन्यात खरीप पिकांसाठी हमीभाव जाहीर केले जातील.

मॉन्सून केरळ व दक्षिण कर्नाटक येथे एव्हाना पोहोचला आहे. पाऊस समाधानकारक झाला व उत्पादन वाढले, तर त्यांचा कापूस व मका यांच्या किमती कमी होण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फ्यूचर्स किमतींचा फायदा घेऊन हेजिंग करणे सोयीचे असते. त्यामुळे या पिकांच्या किमतींवर लक्ष ठेवावे. सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) मे महिन्यात वाढत होते; अखेरच्या सप्ताहापासून ते कमी होत आहेत. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव २.५ टक्क्यांनी घसरून रु. ४८,८५० वर आले होते. या सप्ताहात ते ३.४ टक्क्यांनी घसरून रु. ४७,१८० वर आले आहेत. जुलै डिलिव्हरी भाव १.१ टक्क्याने घसरून रु. ४५,४३० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा २.३ टक्क्यांनी घसरून रु २,३७१ वर आले आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती मे महिन्यात वाढत होत्या. अखेरच्या सप्ताहापासून त्या कमी होत आहेत. गेल्या सप्ताहात २.५ टक्क्यांनी घसरून रु. २,२४२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी घसरून रु. २,१६८ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जुलै डिलिव्हरी) किमती रु. २,१८१ वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती रु. २,००८ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,८७० आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती मे महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या १.७ टक्क्याने घसरून रु. ८,२३८ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. ८,१०४ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती जूनमध्ये उतरत होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्याने घसरून रु. ४,६४४ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ६,६०० होती; या सप्ताहात ती ६,२०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,२७५ आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) मे महिन्यात उतरत होती. या सप्ताहात ती ०.८ टक्क्याने घसरून रु. ६,९७३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ३,९५० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) मे महिन्यात कमी होत होती. गेल्या सप्ताहात ती रु. ५,८८३ वर आली होती. या सप्ताहात ती ३.४ टक्क्यांनी घसरून रु. ५,६८३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,३०० आहे. तुरीची आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा

कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. ८४९ होती; या सप्ताहात ती रु. १,०४३ वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) गेल्या सप्ताहात रु. ३,६६७ होती; या सप्ताह-अखेर ती रु. ४,००० पर्यंत आली आहे. टोमाटोची आवक आता कमी होऊ लागली आहे. किमती वाढू लागल्या आहेत.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोंची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com