Cotton Market : कापसाचे वायदे १३ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होणार

वायद्यांमध्ये मोठे बदल; बाजाराला आधार मिळण्याची शक्यता
Cotton Market
Cotton MarketAgrowon

पुणेः सेबीने (SEBI) कापूस वायद्यांवरील बंदी उठवली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवरील कापूस वायदे १३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.

एप्रिल, जून आणि ऑगस्ट महिन्यातील वायद्यांमध्ये व्यवहार करता येईल. कापसाचे वायदे (Cotton Future) सुरु झाल्यानंतर कापूस बाजारालाही (Cotton Market) आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस वायद्यांच्या अटी आणि शर्ती बदलण्यासाठी सेबीने जानेवारीचे वायदे आणण्यास बंदी घातली होती. पण जानेवारी महिना संपत आला तरी एमसीएक्सवरील (MCX) वायदे सुरु करण्यात आले नव्हते.

नेमकं जानेवारी महिन्यात कापसाच्या भावात नरमाई आली. कापसाचे दर (Cotton Rate) कमी होण्यासाठी केवळ वायदेबंदी जबाबदार नव्हती. पण वायद्यांमुळं पुढील काही महिन्यांतील दराची माहिती मिळते.

त्यामुळं शेतकऱ्यांनी वायदे सुरु करण्याची मागणी लावून धरली. शेतकरी नेते अनिल घनवट यांच्या नेतृत्वात स्वतंत्र भारत पार्टीने सेबी कार्यालावर मोर्चाही काढला होता. त्यावेळी कापसाचे वायदे लवकरच सुरु करु, असे आश्वासन देण्यात आले होतं.

एमसीएक्सने वायद्यांच्या अटी आणि शर्ती बदलल्या आहेत. तसंच कापसाचे वायदे सुरु करणार असल्याचं एमसीएक्सनं काल परिपत्रक काढून जाहीर केलं.

कापसाचे वायदे १३ फेब्रुवारीपासून सुरु होतील. १३ फेब्रुवारीला एप्रिल, जून आणि ऑगस्ट महिन्यातील वायदे सुरु होतील, असं एमसीएक्सनं म्हटलं आहे. म्हणजेच तीन महिन्यांचे वायदे उपलब्ध असतील.

एमसीएक्सनं कापूस वायद्यांच्या सिंबाॅल, डिस्क्रीप्शन, ट्रेडिंग युनिट, कोटेशन, कमाल ऑर्डर साईज, टिक साईज, डिलिवरी युनिट आणि सेंटर, गुणवत्ता स्पेसिफिकेशन आदींमध्ये बदल केला.

हे बदल केल्यानं उद्योग आणि व्यापाऱ्यांना व्यवहार करणं सोपं जाईल, असं पीएसीच्या सदस्यांचं म्हणणं आहे.

Cotton Market
Cotton Rate : कापूस उत्पादक दरवाढीच्‍या प्रतीक्षेत

गाठींऐवजी खंडीत होणार व्यवहार

महत्वाचा बदल म्हणजे एमसीएक्सवर आतापर्यंत गाठींमध्ये व्यवहार होत होते. मात्र यापुढे व्यवहार खंडीमध्ये होणार आहेत. एक खंडी जवळपास ३५६ किलोची असते.

यापुर्वी २५ गाठींचे ट्रेडिंग युनिट होते. ते आता ४८ खंडीचे असेल. कमाल आॅर्डर साईजमध्येही बदल करण्यात आला. कमाल ऑर्डर साईज १२०० गाठींऐवजी ५७६ खंडी करण्यात आली.

ओपन पोझिशन्समध्ये बदल

कमाल ओपन पोझिशनमध्येही मोठे बदल करण्यात आले. एक क्लाईंटला ९ हजार ६०० खंडीची ओपन पोझिशन घेता येईल. म्हणजेच २० हजार गाठी. यापुर्वी ३ लाख ४० हजार गाठींची मर्यादा होती.

तसेच एकत्रित सर्व क्लाईंटसाठी ओपन इंटरेस्ट कमाल मर्यादा ९६ हजार खंडीची करण्यात आली. म्हणजेच २ लाख गाठी. ती यापुर्वी ३४ लाख गाठी होती.

नव्या केंद्रांचा समावेश

एमसीएक्सने काही नव्या डिलिवरी केंद्रांचा समावेश केला आहे. यापुर्वी महाराष्ट्रातील यवतमाळ आणि जालना, गुजरातमधील काडी आणि मुंद्रा तर तेलंगणामधील अदीलाबाद केंद्राचा समावेश होता.

पण आता या केंद्राशिवाय मध्य प्रदेशातील इंदोर, राजस्थानमधील भिलावाडा, आंध्र प्रदेशातील गुंटूर, कर्नाटकातील रायचूर आणि तमिळनाडूतील सेलम येथेही केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

वायद्यांचा शेतकऱ्यांना फायदा काय?

आता वायदे सुरु होणार. त्यामुळं शेतकऱ्यांना वायदे सुरु असलेल्या महिन्यांतील दराचा अंदाज येईल. तसंच हजर बाजारातील दर सुधारण्यासही मदत होऊ शकते. पण दर नेहमीच वाढतात असं नाही. वायद्यांमध्ये शेतकऱ्यांचे व्यवहार नाहीत, असंही सांगितलं जातं.

वायद्यांमध्ये कच्च्या कापसाचे नाही तर रुईचे व्यवहार होतात. त्यामुळं कापसाच्या खंडी तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना आपला कापूस वायद्यांमधून विकता येईल.

पण व्यापारी आणि उद्योगांना वायद्यांच्या माध्यमातून जोखिम व्यवस्थापन करता येईल. यातून कापसाचा व्यापार वाढण्यास मदत होईल. वायदे सुरु झाल्यास कापूस दरात सुधारणाही दिसू शकते, असं सांगितलं जातं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com