कापसाचे उत्पादन ३१५ लाख गाठींवर

देशात जवळपास ३२४ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज एप्रिल महिन्यात वर्तविला होता. तर मे महिन्यातील अंदाज ३१५ लाख गाठींपर्यंत कमी करण्यात आला.
कापसाचे उत्पादन ३१५ लाख गाठींवर
Cotton ProductionAgrowon

पुणेः चालू हंगामात कापूस उत्पादनात (Cotton Production) मोठी घट आली. देशातील कापूस उत्पादन ३१५ लाख गाठींवरच स्थिरावेल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. तर कापूस वापरही एवढाच होईल, असा अंदाज व्यक्त केला.

जागतिक बाजारात चालू हंगामात कापूस (Cotton)सुरवातीपासूनच भाव खात आहे. उद्योगाची मागणी वाढली. परंतु बाजारात पुरवठा कमी राहिला. परिणामी, दर ११ वर्षांतील उच्चांकावर पोहोचले. देशातही कापूस उत्पादन वापराच्या तुलनेत कमी झाले. त्यामुळे दराने विक्रम गाठला. सध्याही कापसाचा बाजारभाव ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. यंदा पाऊस आणि कीड-रोगाने कापसाचे उत्पादन घटले.

‘सीएआय’ने हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाच्या (Cotton) अंदाजात कपात केली. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातही ‘सीएआय’ने मागील अंदाजाच्या तुलनेत ८ लाख ३१ हजार कापूस गाठींची कापत केली. एक कापूस गाठ १७० किलोची असते. देशात जवळपास ३२४ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज एप्रिल महिन्यात वर्तविला होता. तर मे महिन्यातील अंदाज ३१५ लाख गाठींपर्यंत कमी करण्यात आला. ३१ मेपर्यंत देशातील बाजारांत २८८ लाख गाठी कापूस आला. म्हणजेच एकूण उत्पादनाच्या ९१.४५ टक्के कापसाची विक्री झाल्याचे ‘सीएआय’ने म्हटले आहे.

देशातून कापूस निर्यातीचा (Cotton Export)अंदाज मात्र ४० लाख गाठींवर कायम ठेवण्यात आला. देशातील कापूस वापर कमी होऊन ३१५ लाख गाठींवरच स्थिरावेल. तर ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ या सहा महिन्यांत १७५ लाख गाठी कापसाचा वापर झाला. तर २०२२ मधील एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतील वापर ५० लाख गाठींचा होता. जून ते सप्टेंबर या काळात ९० लाख गाठी कापूस वापर होण्याची शक्यता आहे.

आयातीचे काय होईल?

सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क रद्द केले. त्यामुळे कापूस आयात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. काही संस्थांनी २० ते २५ लाख गाठी कापूस आयात होईल, असा अंदाज निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी करताना व्यक्त केला होता. मात्र ‘सीएआय’ने देशात १५ लाख टनांच्या दरम्यानच आयात होईल, असे सांगितले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरातील तेजी हे आहे.

शिल्लक साठा ४७ लाख टनांपर्यंत कमी राहणार

उत्पादनातील घट आणि वाढलेला वापर यामुळे पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा ४७ लाख टनांपर्यंत कमी राहील, असेही ‘सीएआय’ने स्पष्ट केले. त्यामुळे पुढील हंगामात पुरवठ्यावरील दबाव कमी राहील. मात्र कापसाचे उत्पादन किती हाती येईल, यावर बाजार अवलंबून असेल, असे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com