
संदीप नवले
पुणे : बाजारात शेतीमालाचे दर कमीअधिक होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. मात्र सासवड येथील बाजारात शेतकरीपुत्र तरुणांकडून सीताफळ, अंजीर विक्रीतून रोज ३० ते ४० लाख रुपयांची उलाढाल केली जात असून, त्यांनी विक्रीत हातखंडा तयार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सीताफळ, अंजिराला अधिक दर मिळत असल्याने या तरुणांची तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे.
सासवड तालुक्यात सीताफळ आणि अंजिराचे सुमारे पाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्र आहे. अनेक शेतकरी सीताफळ, अंजिराचे उत्पादन घेतात. जूनपासून सीताफळाचे उत्पादन सुरू होत असून, डिसेंबरपर्यंत ते सुरू असते. तर अंजिराचे ऑक्टोबरपासून उत्पादन सुरू होऊन ते मे जूनपर्यंत उत्पादन शेतकरी घेतात. शेतात घेतलेल्या फळांची मजुरांमार्फत काढणी करून योग्य ती प्रतवारी करून कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून पुणे, मुंबई येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवितात. परंतु येथील व्यापारी कमी दराने खरेदी करून जादा दराने ग्राहकांना विक्री करतात. त्यामुळे कधी कधी शेतकऱ्यांना कमी दरावर समाधान मानावे लागते. एखादेवेळेस चांगला दर मिळाल्यानंतर त्याची चर्चा करून बाजारात जादा माल आल्यानंतर कमी दराने खरेदी करतात. त्या वेळी शेतकऱ्यांचे चांगलेच आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांवर बागा तोडण्याची वेळ येते. हे होऊ नये, म्हणून सासवडमधील आठ ते दहा तरुणांनी अंजीर, सीताफळ विक्रीचा निर्णय घेतला आहे.
विक्रीमध्ये स्वतः शेतकरी असलेले नितीन काळे, गौरव काळे, बजरंग काळे, आकाश काळे, योगेश भिंताडे, गिरीश काळे, तुषार झेंडे, सागर धुमाळ, विठ्ठल काळे यांचा समावेश आहे. हे तरुण दरवर्षी शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदी करतात. दररोज अंजिराची १५ ते १६ टन, तर सीताफळ ७-८ टनांची विक्री करतात. शेतकऱ्यांकडून प्रति कॅरेट (१७-१८ किलो) ५०० ते ३००० रुपये दरम्यान दर ठरविला जातो. त्यानंतर मालाची प्रतवारी करून ते परराज्यांतील गुजरात, गोवा, हैदराबाद, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर, सुरत, बडोदा अशा विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवितात. दररोज सुमारे ३० ते ४० लाख रुपयांची या माध्यमातून उलाढाल होते. यातून शेतकऱ्यांनाही चांगले दर मिळत असल्याने या भागात फळबागा वाढीस चालना मिळू लागली आहे.
वैशिष्ट्ये ः
- विक्री करणारे सर्व तरुण हे शेतकरी कुटुंबातील आहेत.
- येथे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा पाहिला जातो.
- इतर मार्केटच्या तुलनेत सासवड हे मार्केट शेतकऱ्यांना ठरतेय फायदेशीर.
- हवेली, इंदापूर, दौंड, बारामती भागांतून येथे फळे विक्रीसाठी येतात.
- तरुणांकडून उत्पादक शेतकऱ्यांना मिळतेय प्रोत्साहन.
मी गेल्या बारा वर्षांपासून सीताफळ विक्रीमध्ये काम करत आहे. पूर्वी माझ्याकडे सीताफळाला प्रति कॅरेटला ५०० ते १५०० रुपये दर होता. त्या वेळी गुजरात, गोवा अशा ठिकाणी विक्री करत होतो. परंतु संपर्क वाढल्यानंतर इतर ठिकाणी माल पाठविण्यास सुरुवात केली. हंगामात दररोज मी दोन ते तीन टन मालाची खरेदी करून विक्री करतो. शेतकऱ्यांना कमीत कमी प्रति कॅरेटला ९०० ते १००० रुपये प्रमाणे दर देतो, तर जास्तीत जास्त २५०० रुपये दर देतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
- नितीन काळे, सीताफळ-अंजीर विक्रेते, सासवड, मो. ९९२१२१५३५५
मी सुरुवातीच्या टप्प्यात कमी माल घेऊन विक्री करत होतो. आता गुजरात, हैदराबाद, सुरत येथे माल विक्रीसाठी पाठवत आहे. प्रति कॅरेट ५०० ते २००० प्रमाणे विक्री करत असल्याने पुणे, मुंबई येथील मार्केटपेक्षा हा नक्कीच जास्त दर शेतकऱ्यांना मिळतो. विशेषतः कमी खर्चात शेतकऱ्यांच्या मालाची विक्री होत असून, शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मालाचे पैसे मिळतात. याशिवाय शेतकऱ्यांच्या मालाचा त्यांच्यासमोर दर ठरवला जातो, हे बाजाराचे वैशिष्ट्ये आहे.
- गौरव काळे, सीताफळ-अंजीर विक्रेते, सासवड
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.