डीएपी, पोटॅश, फाॅस्फेटयुक्त खतांच्या अनुदानात वाढ

वाढलेल्या दरामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
DAP
DAP

पुणेः केंद्र सरकारने पोषणमुल्य आधारित खत अनुदानात (Nutrient based subsidy) वाढ केली आहे. यामुळे डीएपीसह (DAP) पोटॅश (Potash) आणि फाॅस्फेटयुक्त (Phosphate) खतांचे दर गेल्यावर्षीप्रमाणे कायम राहतील, असे माहीती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. तर डीएपी खताच्या बॅगवरील अनुदान ५१२ रुपयांवरून २ हजार ५०१ रुपये करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना डीएपीची बॅग १ हजार ३५० रुपयांनी मिळेल, असेही ठाकूर यांनी सांगितले.

खत दरवाढीत आर्थिक होरपळ होणाऱ्या शेतकऱ्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने पोषणमुल्य आधारित खत अनुदानात वाढ केली. केंद्र सरकारने खरिप हंगामासाठी एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ या सहा महिन्यांसाठी खत अनुदान देण्यासाठी तब्बल ६० हजार ९३९ कोटी रुपयांचे अनुदान मंजुर केले. डीएपीसह पोटॅश आणि फाॅस्फेटयुक्त खतांसाठी हे अनुदान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजेच मागील वर्षभरात पोषणमुल्य आधारित खत अनुदानासाठी केवळ ५७ हजार १५० कोटी रुपये अनुदान दिले होते.

DAP
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दहापटीने वाढ; तोमर

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना माहीती व प्रसारणमंत्री (Minister of Information and Broadcasting)अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सरकारने डीएपी खतावरील अनुदान वाढवून प्रतिबॅग २ हजार ५०१ रुपये केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना डीएपी(DAP) खताची बॅग १ हजार ३५० रुपयांनाच मिळेल. २०२०-२१ मध्ये डीएपी खताच्या बॅगेवर १६५० रुपयाचे अनुदान मिळत होते. ते आता २ हजार ५०१ रुपये केले. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात ही वाढ कायम आहे. परंतु याचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे. शेतकऱ्यांना आता आधीच्याच दरात खते मिळतील, असेही मंत्री ठाकूर यांनी सांगितले.

सरकारने नायट्रोजन, फाॅस्फेट(Phosphate), पोटॅश आणि सल्फरचा समावेश असलेल्या खतांवर अनुदान देण्यासाठी २०१० पासून पोषणमुल्य आधारित खत अनुदान धोरण सुरु केले. सरकार दरवर्षी या खतांसाठी अनुदान जाहिर करते. यामुळे वाढलेल्या किमतीचा बोजा थेट शेतकऱ्यांवर पडत नाही. सरकार अनुदानाची रक्कम कंपन्यांना देते आणि दर नियंत्रणात ठेवले जातात.

मागील काही महिन्यांत शेतकऱ्यांना खत दरवाढीचा मोठा फटका बसत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात पोटॅश आणि फाॅस्फेटचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांनाही खतांसाठी दुप्पट पैसा मोजावा लागत होता. त्यामुळे सरकारने पोषणमुल्य आधारित खत अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत होती. आता सरकारने निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com