पेरूच्या पीक कर्जामध्ये वाढ करण्याची मागणी

इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब काढून पेरूची लागवड (Guava Cultivation) केली आहे.
Guava
GuavaAgrowon

वालचंदनगर, ता. इंदापूरः तालुक्यातील शेतकऱ्यांचा पेरूचे पीक (Guava) घेण्याकडे कल वाढला आहे. या पिकाच्या लागवडीसाठी राष्ट्रीयकृत बॅंका, जिल्हा बॅंका व सहकारी बॅंकांनी मध्यम मुदतीचे कर्ज सुरू करून पीक कर्जाच्या (Crop Loan) रकमेमध्ये वाढ करावी, अशी मागणी निमसाखर येथील शेतकरी अनिल बोंद्रे, शेळगाव येथील गणपत भोंग यांनी केली आहे.

इंदापुरात ऊस (Sugarcane) हे हुकमी उत्पादन देणारे पीक म्हणून पाहिले जाते. बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल असतो. मात्र उसाच्या पिकासाठी सुमारे १२ ते १८ महिन्यांचा कालावधी व जास्त पाण्याची गरज असल्याने अनेक शेतकरी कमी कालावधीमध्ये उत्पादन मिळणाऱ्या पिकाकडे वळू लागले आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये डाळिंब पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. पेरूला दरही चांगला मिळत असल्याने हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, पेरू लागवडीसाठी मध्यम मुदतीचे कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यावर मर्यादा येत आहेत. तसेच, इतर पिकांच्या तुलनेमध्ये पेरूसाठी कमी पीककर्ज मिळत असून पेरूच्या पीककर्जामध्ये (Crop Loan) वाढ करण्याची गरज आहे.

इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब काढून पेरूची लागवड (Guava Cultivation) केली आहे. मात्र, अनेकांनी कृषी विभागाकडे पेरुची नोंद केली नसल्यामुळे कागदोपत्री सुमारे ९५० हेक्टर पेरू पिकाची नोंद आहे. प्रत्यक्षात तालुक्यात ३ हजार हेक्टर पेक्षा जास्त पेरूचे क्षेत्र असून पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मदत करणे गरजेचे आहे.

‘हेक्टरी तीन लाखांच्या कर्जाची गरज’

‘‘एक एकर पेरू लागवडीसाठी ५०० ते ९०० रोपे लागतात. एका रोपाची किंमत ६० ते २०० रुपये आहे. एक हेक्टर पेरूच्या रोपांसाठी एक ते तीन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ठिबक सिंचनासाठी हेक्टरी १ लाख रुपयांचा खर्च येत असून, खतासाठी सुरुवातीला ६० हजार रुपयांची गरज असून हेक्टरी सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च होत आहे.

पेरूसाठी हेक्टरी तीन लाख रुपये मुदत कर्ज मिळावे. उत्पादन खर्च (Production Cost) ही जास्त असल्याने औषधफवारणी व इतर कामासाठीही पेरूसाठी हेक्टरी दोन ते अडीच लाख रुपये पीक कर्ज मिळण्याची गरज आहे,’’ असे शेळगाव येथील कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी मोहन दुधाळ यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com