सोयाबीन, कापूस बियाण्याला मागणी

खरिपात मका पिकालाही पसंती मिळण्याचे संकेत
सोयाबीन, कापूस बियाण्याला मागणी
Cotton SoybeanAgrowon

पुणे ः मॉन्सून दारावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपासाठी बियाणे खरेदी (Seed) सुरू केली. यंदा महाराष्ट्रासह देशभरात कापूस लागवड (Cotton Sowing) वाढणार आहे. गुजरात, कर्नाटकासह दक्षिण आणि उत्तर भारतात कापूस बियाणे (Cotton Seed) खरेदी वाढली. तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सोयाबीन (Soybean) आघाडीवर राहील, मका लागवडीलाही (Maize Cultivation) पसंती मिळत आहे. तर उत्तर प्रदेशात मात्र भाताला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसते, असे जाणकारांनी सांगितले.

चालू हंगामात चांगला दर मिळालेल्या पिकांची पेरणी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. हवामान विभागाने यंदा देशात मॉन्सून वेळेवर दाखल होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदीची लगबग सुरू केलीये. शेतकरी खरिपासाठी मे महिन्यापासूनच बियाणे खरेदी करतात. आतापर्यंत शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन आणि मका बियाणे खरेदीला चांगला प्रतिसाद दिल्याचे बियाणे उद्योगाने स्पष्ट केलंय.

यंदा कर्नाटकसह दक्षिण भारत आणि गुजरात तसेच मध्य भारतात शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पसंती दिल्याचे स्पष्ट झालंय. चालू हंगामात कापसाला चांगला दर मिळाला. त्यामुळे या भागांतील शेतकरी कापूस बियाण्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे बियाणे कंपन्यांच्या सूत्रांनी सांगितले. कर्नाटक आणि गुजरातमध्ये कापूस बियाणे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर महाराष्ट्रातही खरेदी सुरू झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कापूस बियाणे खरेदी वाढल्याने लागवड क्षेत्र १० टक्क्यांनी वाढू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Cotton Soybean
विदर्भात सोयाबीन दर काहीसे नरमले

कापसासोबतच यंदा सोयाबीनलाही शेतकरी पसंती देताना दिसत आहेत. महाराष्ट्रात यंदाही सोयाबीनची पेरणी कापसापेक्षा अधिक होणार आहे. यंदा महाराष्ट्रात ४६ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा प्रस्तावित आहे. मात्र शेतकऱ्यांचा प्रतिसाद सोयाबीनला चांगला मिळतोय. बियाणे खेरदीत सध्या सोयाबीन आघाडीवर असल्याचे बियाणे विक्रेत्यांनी सांगितलं. मध्य प्रदेश आणि राजस्थान तसेच कर्नाटकातही सोयाबीन बियाण्याला चांगला उठाव राहिला. तुरीला शेतकरी यंदा कमी पसंती देत आहेत. याचा फायदा सोयाबीन क्षेत्रवाढीला होऊ शकतो, असं अॅग्रो इनपुट्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी सांगितलं.

महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सोयाबीन लागवड वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात खरिपासाठी सोयाबीन बियाण्याची सर्वाधिक खरेदी झाली. तर उत्तर प्रदेशात मात्र भाताच्या बियाण्याला उठाव मिळाला.

शासनाच्या आदेशानुसार वितरक पातळीवर सध्या कापूस बियाणे वितरण सुरू आहे. गेल्या हंगामात अनधिकृत बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी यंदा अधिकृत बियाणे घेत आहेत. बियाणे विक्रीला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच चांगला दर मिळाल्याने महाराष्ट्रात यंदा कापूस लागवड ५ ते ७ टक्क्यांनी वाढू शकते. तर उत्तर भारतात लावगड शेवटच्या टप्प्यात आहे. या भागात १० टक्क्यांपर्यंत क्षेत्रवाढ होऊ शकते.
अजय झोडे, उपाध्यक्ष, नुजिवीडू सीड्स
राज्यात कापूस बियाणे विक्रीला एक जूनपासून परवानगी आहे. मात्र सध्या सोयाबीन आणि मका बियाणे खरेदी जोरात सुरु आहे. सोयाबीनला सुरुवातीपासूनच चांगला दर मिळाला. त्यामुळं शेतकरी सोयाबीन लागवड वाढविणार असल्याचं बियाणे खरेदीवर लक्षात येतं. मकाही अनेक भागांत वाढू शकतो. मात्र यंदा राज्यात तूर लागवड घटण्याची शक्यता दिसते.
मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, अॅग्रो इनपुट्स डीलर्स असोसिएशन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com