अडीच महिन्यांत ८० टक्के खरीप पीककर्जाचे वितरण

जिल्हा बँकेकडून यंदा कमी कालावधीतील कर्जवाटपाचा उच्चांक
अडीच महिन्यांत ८० टक्के खरीप पीककर्जाचे वितरण
Crop LoanAgrowon

पुणे ः खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (PDCC Bank) शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीककर्जाचे (Crop Loan) वाटप सुरू केले आहे. यंदा बँकेने खरीप हंगामासाठी (Kharif Season) एक हजार ८०१ कोटी ६५ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी अडीच महिन्यांत खरिपात जिल्ह्यातील एक लाख ८४ हजार ७८८ सभासद शेतकऱ्यांनी एक हजार ४४८ कोटी १५ लाख रुपये म्हणजेच ८० टक्के पीककर्ज वाटप (Loan Supply) करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक शिरूर तालुक्यात वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

बदलते हवामान, शेतीमालाला कमी दर, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच खरीप हंगामात त्याला आधार देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडवणूक करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप करण्यात येते. खरीप हंगामात भात, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी अशा विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरिपाचे नियोजन करून पिके घेतात. त्यानुसार बँकेने शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पीककर्ज वाटपास सुरुवात केली. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली अशा शेतकऱ्यांना पुन्हा खरिपात तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

गेल्या वर्षी खरिपासाठी एक हजार ७३९ कोटी ९४ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी एक लाख ७१ हजार ४१५ सभासदांना एक हजार ३२९ कोटी ४६ लाख ९४ हजार रुपये म्हणजेच ७६ टक्के वाटप केले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेने तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या शाखांमार्फत विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यात बँकेचे जवळपास २९४ शाखांमधून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येते. जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास तीन लाख ५ हजार ७९६ पर्यंत आहे. त्यापैकी जवळपास तीन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात. बँकेकडून तीन लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत. येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत हा कर्जपुरवठा सुरू राहणार आहे. त्यानंतर रब्बीसाठी कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. खरीप पिकांव्यतिरिक्त बँकेकडून शेती पूरक व्यवसायांनाही कर्जाचे वाटप करत आहे.

...या पिकांसाठी दिले जाते कर्ज

तूर, मूग, उडीद, भात, ज्वारी, बाजरी, कपाशी, मका, सूर्यफूल, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची अशी विविध पिके.

नवीन ९०३ सभासदांना कर्जवाटप :

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे तीन लाखांहून अधिक सभासद शेतकरी आहेत. त्यामध्ये दरवर्षी वाढ होत असून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. चालू वर्षी रब्बी हंगामात नव्याने झालेल्या ९०३ सभासद शेतकऱ्यांनी नव्याने पीककर्ज घेतले आहे. त्यांना सुमारे ६ कोटी ७४ लाख एक हजार रूपयाचे पिकांचे वाटप केले आहे. यामध्ये बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यांत सर्वाधिक वाटप केले आहे. त्यामुळे बँकेने ठेवलेल्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य करण्यास काही प्रमाणात मदत होत आहे.

तालुकानिहाय पीककर्जाचे झालेले वाटप, रूपयेः

तालुका --- सभासद --- वाटप झालेले कर्ज

आंबेगाव --- १८,७४३ --- ११४ कोटी ४१ लाख १८ हजार रुपये,

बारामती --- १९,६१७ --- १६९ कोटी ९८ लाख ६० हजार

भोर --- १०,६२३ --- ७२ कोटी ३२ लाख २१ हजार

दौंड --- १६,५९६ --- १७९ कोटी ४८ लाख ९१ हजार

हवेली --- ५९३० --- ५२ कोटी १९ लाख ११ हजार

इंदापूर --- ८७०९ --- १०२ कोटी ९६ लाख ५८ हजार

जुन्नर --- २६,१७२ --- १८४ कोटी १६ लाख २५ हजार

खेड --- २६,५५९ --- १५० कोटी १४ लाख ८७ हजार

मावळ --- ५३९७ --- ३५ कोटी ९४ लाख ८० हजार

मुळशी --- ३९५१ --- २३ कोटी ५ लाख ९० हजार

पुरंदर --- १९,२६३ --- १३८ कोटी २३ लाख ८८ हजार

शिरूर --- २०,८५४ --- २१३ कोटी ७३ लाख ३७ हजार

वेल्हा --- २३७४ --- ११ कोटी ५० लाख १५ हजार

एकूण -- १८४७८८ --- १४४८ कोटी १५ लाख ८१ हजार रुपये

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com