शेती, पूरक व्यवसायातून साधली आर्थिक प्रगती

पुणे जिल्ह्यातील करंजगाव (ता. मावळ) येथील शिवाजीराव टाकवे यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे. त्यासोबत अमूल दूध संघाच्या मदतीने दूध संकलन केंद्र चालू केले आहे. संपूर्ण कुटुंब इतर व्यवसायांच्या बरोबरीने शेती पशुपालन व दूध संकलन करत आहेत. त्यामुळे शेती व पशुपालन व्यवसाय किफायतशीर झाला आहे.
Dairy Farming
Dairy FarmingAgrowon

सतीश कुलकर्णी

करंजगाव येथील शेतकरी कुटुंबातील शिवाजीराव महिपती टाकवे यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले. त्यानंतर पहिली सतरा वर्षे लोणावळा येथे ३० कि.मी. जाऊन येऊन नोकरी केली. या काळात गावपातळीवर व सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहिल्यामुळे १९८९ या वर्षी गावकऱ्यांनी त्यांच्या हाती सरपंचपद बिनविरोध सोपवले. त्यांच्या विश्‍वासाला जागून चोखपणे कामे केली. पुढे २००८-२०१४ या वर्षामध्ये श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही काम केले.

शेतीचे नियोजनः

शिवाजीरावांना वडिलोपार्जित शेती सहा भावांमध्ये दोन एकर सोळा गुंठे इतकी अल्प होती. पण स्वकर्तृत्वावर वाढवत ती ३० एकरपर्यंत नेली आहे. त्यांचे प्रमुख पीक भात आणि ऊस असले तरी वर्षभर तीन मुलांसह असलेल्या एकत्रित कुटुंबाला पुरेल इतका गहू, ज्वारी, कांदे-बटाटे यांचे उत्पादन घेतले जाते. पाच एकर शेती चाऱ्यासाठी राखीव ठेवली असून, अर्धा एकर क्षेत्रात कुटुंबीयांसाठी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेतात. दरवर्षी तीन-चार एकर सुरू ऊस, पावसाळ्यात तीन-चार एकरांत भात पीक घेतात.

तीन वर्षांनंतर उसाच्या शेतात हिरवळीचे पीक घेतात. ते गाडून पावसाळ्यात भाताचे पीक घेतल्यानंतर ऊस लागवडीचे नियोजन असते. ऊस कारखान्याकडून सलग तीन वेळा सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारे शेतकरी म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. (सहाशे ते सातशे टन ऊस उत्पादन.)

गेल्या काही वर्षांपासून मजुरांची उपलब्धता ही समस्या बनली आहे. त्यावर तीन मुलांची मदत आणि यांत्रिकीकरणाच्या (Farm Mechanization) साह्याने मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी एक- एक अवजार याप्रमाणे सर्व शेतीपूरक अवजार त्यांच्याकडे आहेत. उसामध्ये पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यामुळे छोट्या व मोठ्या ट्रॅक्टरच्या साह्याने बहुतांश अवजारे वापरता येतात. तणनियंत्रणाचा खर्च वाढत चालला आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार तणनाशकांचा वापर केला जातो.

जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी पशुपालन फायद्याचे ठरत आहे. त्यांच्या शेणावर चार घनमीटर क्षमतेचा गोबर गॅस चालतो. त्यामुळे इंधनावरील खर्चात बचत होते. तसेच गोबर गॅसची शेणस्लरी शेतामध्ये वापरली जाते.

...अशी झाली दुग्धोत्पादनाची सुरुवात

घरामध्ये पूर्वीपासूनच शर्यतीचे बैल जोपासले जात होते. घरगुती दुधासाठी म्हणून एका म्हशीपासून गोठा सुरू झाला. शेतीमध्ये सेंद्रिय खताची उपलब्धता होत नसल्याचे लक्षात आले. मग त्याच्या पूर्ततेबरोबरच दूध उत्पादन हेही ध्येय ठेवून गुजरातवरून सुरुवातीला चार म्हशी विकत आणल्या. पुढे गुजरात, हरियाना येथून काही म्हशी आणल्या.

केवळ म्हैसपालनावरच न थांबता संकरित गाय (एचएफ) पालनही सुरू केले. हळूहळू वाढ करत आज गोठ्यात १५ म्हशी व पंधरा एचएफ गाई आहेत. कालवडी, पारडे अशी लहान २५ जनावरे आहेत. छोट्या जनावरांसाठी स्वतंत्र गोठा उभारला आहे. पूर्वी घराशेजारील पाच गुंठे जागेमध्ये गोठा व शेण, गोबर स्लरी साठवली जाई. मात्र आता शेतामध्ये (८० फूट बाय ३५ फूट) आकाराचा मोठा उभारला आहे.

दूध व्यवसायाचे अर्थकारणः

-वर्षभर स्वतःचे प्रति दिन सरासरी २५० लिटरपेक्षा जास्त दूध. सध्या दुधाळ दहा म्हशी आणि १४ एचएफ गायी आहेत. त्यांचे दूध प्रति दिन २४० लिटर दूध सुरू आहे.

- महिन्याला तीन बिले मिळतात. खर्चामध्ये दोन बिलांची रक्कम वजा जाता एक बिलाइतका (एक लाखापेक्षा अधिक) नफा शिल्लक राहतो.

-पाच एकर राखीव क्षेत्रामध्ये वर्षभर पुरेल इतका चाऱ्याचे नियोजन केले जाते. भात पेंड्याही साठवून ठेवल्या जातात.

-गोठ्यात जनावरांची पैदास करण्यावर भर. प्रत्येक जनावरांची कमीतकमी ६-६ वेत जोपासना केल्यास नवीन जनावरे खरेदी करायला रोख खर्च करावा लागत नाही. गोठ्यात पैदास झालेली जर्सी जनावरेसुद्धा प्रतिकारशक्ती जास्त असल्याने निरोगी राहतात.

दूध संकलन केंद्रः

दूध व्यवसाय (Dairy Farming) सुरू करताना संकलन केंद्र व घरचेही दूध ही दुहेरी भूमिका घेतली. घरची जागा, पाण्याची सुविधा, वीज, बांधकाम व काम करण्याची क्षमता या बाबी पाहून दूध संकलन कंपनीने संकलन केंद्र त्वरित मंजूर केले. यात स्वतःच्या आर्थिक गुंतवणूक फारशी करावी लागली नाही. दूध विक्रीसाठी स्वतःचे संकलन केंद्र असल्याने वाहतुकीचा खर्च व वेळ वाचतो. संकलन केंद्रात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे सरासरी १५०० लिटर दूध संकलन होते. दूध संकलन केंद्रातून पन्नास हजार इतके उत्पन्न हाती येते. उत्तम दर्जाच्या दुधाची अतिरिक्त ३.५ लाख रु. रकमेतून नुकतेच कॉम्प्रेसर व अन्य यंत्रणा अद्ययावत केली.

शेतीतून येणारे वार्षिक उत्पन्नः एकूण क्षेत्र - ३० एकर

१) ऊस पीक - क्षेत्र १५ एकर, एकरी उत्पादन ५० ते ५५ टन, उत्पादन खर्च २० हजार रु. प्रति एकर, दर २७०० रुपये प्रति टन.

२) भात पीक - क्षेत्र ५ एकर, एकरी उत्पादन ३५ क्विंटल, उत्पादन खर्च २५ हजार रु. प्रति एकर, दर २६०० रुपये प्रति क्विंटल.

शेतीपूरक व्यवसायः

दुग्धोत्पादनातून येणारे उत्पन्नः एक लाख रुपये प्रति महिना

दूध संकलनातून मिळणारे उत्पन्नः पन्नास हजार प्रति महिना

कुटुंबीयांचे प्रमुख खर्चः

-एकत्रित कुटुंबीयांचा खर्च प्रति वर्ष २.५ लाख रुपये.

- मुलांच्या शिक्षणावरील खर्च प्रति वर्ष ६० हजार रुपये.

- वैद्यकीय खर्च प्रति वर्ष ( इन्शुरन्स प्रिमियम वगैरे) ५० हजार रुपये.

- यंत्रे, अवजारे व यांच्यातील गुंतवणूक, देखभाल व खर्च - २० ते २५ हजार रुपये.

नफ्यातील रकमेचा विनियोगः

१) शिल्लक रकमेमध्ये दरवर्षी काही एकर या प्रमाणे शेती खरेदी करत ३० एकरांपर्यंत पोहोचले आहेत. त्याच प्रमाणे रहिवासी क्षेत्रामध्ये एक एकर क्षेत्र खरेदी केले. या घेतलेल्या शेती व जमिनीच्या विकासासाठी खर्च आवश्यक केला जातो.

२) शैक्षणिक व सामाजिक कामांमध्ये आवश्यक तिथे खर्च केला जातो. नुकतीच शाळेच्या दोन वर्ग बांधकामासाठी व कुंपणासाठी मदत केली. त्यामुळे येथेच दहावी बोर्डाचे परीक्षा केंद्र मिळाल्याने मुलांची वडगाव, कामशेतपर्यंतची धावपळ वाचली.

शेतीसोबतच अन्य व्यवसायही

केवळ शेतीवर अवलंबून चालणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी आपला मोठा मुलगा विजय याला वीस वर्षांपूर्वी ‘लॅण्ड डेव्हलपमेंट’साठी जेसीबी, पोकलेन, ट्रक चा व्यवसाय सुरू करून दिला. दुसरा मुलगा राजेश हा पूर्ण वेळ शेतीमध्ये व उद्योगात लक्ष देतो. तर धाकटा दिनेश हा शिक्षक आहे. तोच नोकरी सांभाळून दूध व्यवसायही सांभाळतो. प्रत्येकाने आपले व्यवसाय चांगले वाढवले आहेत.

परिसराच्या शैक्षणिक विकासासाठी धडपड...

नाणे मावळातील पस्तीस गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी अडचण होत होती. ती लक्षात घेऊन १९९५ मध्ये एका कंपनीच्या सहकार्याने गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालय सुरू केले. गावाच्या शैक्षणिक विकासासाठी म्हणून स्वतःची रस्त्यालगतची जागा शाळेसाठी दिली. पुढे शाळेचा व्याप वाढत गेल्यामुळे आणखी दोन एकर जागा खरेदी करून दिली. या जागेमध्ये शाळेची इमारत, डिजिटल सुविधा, अद्ययावत संगणक कक्ष, प्रत्येक वर्गात ई-लर्निंगची सोय, प्रशस्त मैदान, भव्य सांस्कृतिक सभागृह असा सोयी उपलब्ध केल्या आहे. त्यामुळे परिसरातील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी लहान वयातच मुलींची लग्ने होत. ते आता संपूर्ण थांबले आहे.

बैलगाडा शर्यत म्हणजे केवळ हौस नव्हे!

मावळ तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यतीची मोठी परंपरा आहे. त्यातून गोवंश व संस्कृतीची जपणूक होते. पूर्वीपासून टाकवे कुटुंबीयांनी हा हौशी व मर्दानी खेळ जोपासला होता. त्याविषयी बोलताना शिवाजीराव म्हणाले, ‘‘तयार बैल विकत घेऊन शर्यत जिंकण्यात कसला आलाय पराक्रम. ती पैशाची मस्ती आहे. त्यापेक्षा खिल्लार वासरू पारखून घ्यायचं, त्याला प्रशिक्षित करायचं आणि मग शर्यतीत उतरवायचं, हे खऱ्या शेतकऱ्याचं लक्षण.’’ हा नियम ते स्वतः पाळतात. त्यांच्या घरात बैलगाडा शर्यतीमध्ये मिळवलेल्या बक्षिसांना ठेवायला जागा पुरत नाही. आजही त्यांच्या पहिल्या बैलजोडीचे (बबड्या आणि हालकर) अनेक फोटो जपलेले आहेत.

दिनेश टाकवे (मुलगा), ९९७०१४०९८७

शिवाजीराव टाकवे, ९८२३८४८६७६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com