आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर नरमले

मागील वर्षभरापासून दराचे नवनवे विक्रम करणारे खाद्यतेलाचे दर आता नरमले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर नरमले
Edible OilAgrowon

पुणेः मागील वर्षभरापासून दराचे नवनवे विक्रम करणारे खाद्यतेलाचे दर (Edible Oil Rate) आता नरमले आहेत. युक्रेनमधून सूर्यफुल तेलाची (Sunflower Oil) रस्त्याने सुरु झालेली वाहतूक, इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील (Palm Oil Export) मागे घेतलेली बंदी आणि पामतेल उत्पादन (Palm Oil Production) वाढीची शक्यता यामुळे खाद्यतेलाचे दर टनामागे ३०० डाॅलरने नरमले, असे जाणकारांनी सांगितले.

कोरोनानंतर जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या दराने विक्रम गाठला. याला प्रामुख्याने तीन घटक कारणीभूत आहेत. पहिला म्हणजे मजूर टंचाईमुळे घटलेलं पामतेल उत्पादन. कोरोनामुळे इंडोनेशिया आणि मलेशिया या महत्वाच्या पामतेल उत्पादक देशांमध्ये मजुरांची टंचाई होती. त्यामुळे या दोन्ही देशांतील पामतेल उत्पादन मागील हंगामात घटले. त्यामुळे जागतिक पातळीवर पुरवठा कमी राहीला. दुसरा घटक म्हणजे महत्वाच्या सोयाबीन उत्पादक देशांतील दुष्काळ.

जगात सोयाबीन उत्पादनात ब्राझील पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या आणि अर्जेंटीना तिसऱ्या क्रमांकार आहे. यातील ब्राझील आणि अर्जेंटीनात यंदा दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे या दोन्ही देशांतील सोयाबीन उत्पादन घटले. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे युद्ध. रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा घटला. हे दोन देश महत्वाचे सूर्यफुल तेल उत्पादक आहेत. मात्र युद्धामुळे काळा समुद्र मार्गातून वाहतूक विस्कळीत झाली. या तीन कारणांमुळे जागतिक पातळीवर खाद्येतलाचा पुरवठा कमी झाला आणि दर तेजीत आले होते. खाद्यतेल दरवाढीला पामतेलातील तेजी कारणीभूत ठरली होती.

मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर कमी होत आहेत. पामतेलाचे दर सध्या मागील सहा महिन्यांतील निचांकी पातळीवर आले आहेत. त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. याचा फायदा भारतातील ग्राहकांना होऊ शकतो. तर महागाईला तोंड देत असलेल्या सरकारलाही यातून दिलासा मिळेल. याविषयी साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता म्हणाले, की आंतरराष्ट्री बाजारात खाद्यतेलाचे दर टनामागे ३०० डाॅलरने कमी झाले. त्यालाही तीन कारणे आहेत. त्यात पहिलं कारण म्हणजे युक्रेनमधून सूर्यफुल तेलाची रस्तेमार्गाने सुरु झाली निर्यात. दुसरे म्हणजे इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील बंदी मागे घेतली. त्यामुळे पुरवठा वाढला. तिसरे आणि महत्वाचे म्हणजे इंडोनेशिया आणि मलेशियात लागवड वाढल्याने उत्पादन उच्चांकी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर टनामागे ३०० डाॅलरने कमी झाले.

पामतेलाचे दर आठवडाभरातच जवळपास १६ टक्क्यांनी कमी झाल्याचे मलेशिया पाम ऑील काऊंसीलने स्पष्ट केले. ७ जूनला कच्च्या पामतेलाचा भाव ६ हजार ५०५ रिंगीट प्रतिटन होता. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. हा भावा आता ४ हजार ९८१ रिंगीटवर पोचला. यासोबातच सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाचेही दर कमी झाले. सोयाबीन दर मागील महिन्याच्या तुलनेत १३ टक्क्यांनी नरमले. तर मोहरी तेल १० टक्के आणि कॅनोला तेल १५ टक्क्यांनी स्वस्त झाले. तर देशातही खाद्यतेल स्वस्त झाल्याचा दावा साल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केला. देशात पामतेलाचे दर मागील महिन्याच्या १८१५ डाॅलर प्रतिटनांवरून १४२० डाॅलरवर आले. रिफाईंड सोयाबीन तेल १९१५ डाॅलरच्या तुलनेत १६०० डाॅलरपर्यंत कमी झाले. तर कच्चे सोयाबीन तर २१५० डाॅलर वरून १८५० डाॅलर प्रतिटन झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर नरमले. मात्र याही परिस्थितीत आयातदार देशांची खरेदी वाढली नाही. विशेष म्हणजे भारतात पामतेलाचा साठा खूपच कमी आहे. तरीही भारताची मागणी वाढलेली नाही. भारतीय खरेदीदारांनी दीर्घकालीन करारांऐवजी अल्पकालीन करारांवर भर दिला आहे. दरात सातत्याने घसरणीचे चित्र असल्यास कुणीही दीर्घकालीन करार करणार नाहीत. जे सध्या दिसत आहे. तसेच सरकारने २० लाख टन सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाच्या शुल्करहीत आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सणासुदीत खाद्यतेलांचे दर कमी होऊ शकतात, असे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com