दूध खरेदीदर घसरण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू

दूध उत्पादक व व्यवसाय प्रक्रिया कल्याणकारी संघाची भूमिका ---
दूध खरेदीदर घसरण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू
Milk Rate Agrowon


पुणे ः राज्यात एकसमान खरेदीदर धोरण (Milk Rate Policy) ठरविल्याशिवाय असंतुलित दराचे दुष्टचक्र अजिबात थांबणार नाही. मात्र शेतकरी हितासाठी सध्याचे खरेदीदर प्रतिलिटर ३० रुपयांपेक्षा खाली न जाण्यासाठी काळजी घेतली जाईल, असे राज्याच्या दूध उत्पादक (Milk Producer) व व्यवसाय प्रक्रिया कल्याणकारी संघाने स्पष्ट केले आहे.

राज्यात गायीच्या दुधाचे (Cow Milk) खरेदीदरात तेजी येत प्रतिलिटर ३५ रुपयांपर्यंत दर स्थिर झालेले होते. मात्र अचानक खासगी डेअरी प्रकल्पांनी दोन रुपयांनी दर कमी केले आहेत. ‘दरात चालू झालेली ही घसरण पुढे चालू राहील व पूर्वीसारखेच २५-२८ रुपयांपर्यंत दर जातील,’ अशा अफवा बाजारात पसरत आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर संघाने मांडलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

दर घसरण्याचे मुख्य कारण दूध भुकटी व लोण्याचे कमी झालेले भाव हेच आहे. राज्यात सध्या सहकाराकडे ३० टक्के, तर खासगी डेअरीचालकांकडून ७० टक्के दूध खरेदी केले जाते. खासगी व्यावसायिकांना त्यांचे खरेदीदर ठरविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दुधाचा पुरवठा व भुकटी, लोण्याची मागणी पाहून दुधाचे खरेदीदर ठरवले जातात. मात्र खरेदीदर प्रतिलिटर ३० रुपयांपेक्षा खाली गेल्यास शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडते. त्यामुळे घसरणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी व सहकारी दूध प्रकल्पांच्या समन्वय घडवून आणण्याचे प्रयत्न केले जातील, असे संघाने म्हटले आहे.

‘‘सध्या राज्यात कुठेही एकसमान खरेदीदर नाहीत. सांगली, कोल्हापूर भागांत प्रतिलिटर २९ ते ३० रुपये दर दिला जात आहे. काही सहकारी दूध संघ ३३ ते ३५ या दरम्यान दर देत आहेत. नगर भागातील एका डेअरीने दर घटविलेला नाही. आंबेगाव भागातील डेअरीने दर ३४ वरून ३५ रुपयांपर्यंत केला आहे. म्हणजेच सध्या कुठेही दरात समानता नाही. एकसमान दर धोरण ठरल्याशिवाय असे असंतुलन कायम राहील,’’ असे संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांना दुधाचे खरेदीदर प्रतिलिटर ३० रुपयांपेक्षा कमी मिळणार नाहीत, याकरिता सहकारी व खासगी डेअरी प्रकल्प एकत्रितपणे काळजी घेतील. पूर्वीसारखे मोठ्या प्रमाणात दर घसरण्याच्या अफवांवर विश्‍वास न ठेवता शेतकऱ्यांनी आपापल्या दूध धंद्याचे व्यवस्थापन चांगले करावे.
प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक व व्यवसाय प्रक्रिया कल्याणकारी संघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com