कृषी आणि बांधकाम उपकरणांत इथेनॉल वापरणार : गडकरी

कारखान्यांनी साखर उत्पादनाकडून इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे सांगताना गडकरी यांनी त्यामागील अर्थकारण उलगडून सांगितले. साखरेची वाढती मागणी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. जेंव्हा कच्च्या तेलाच्या किमती उतरतात, साखरेचे दरही उतरत असल्याचे गडकरी म्हणाले.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाकडे वळण्याची गरज व्यक्त करताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कृषी व बांधकाम सामग्री क्षेत्रात इथेनॉल वापरासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

पुण्यातील वसंतदादादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित राज्य साखर परिषदेत शनिवारी (तारीख ४ जून) गडकरी बोलत होते. देशातील ऊर्जा आणि विद्युत क्षेत्राची गरज भागवण्यासाठी देशाला १० लाख कोटी रुपयांची पेट्रोलियम उत्पादने आयात करावी लागतात. येत्या पाच वर्षांत ही मागणी २५ लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही बाब योग्य नसल्याचे गडकरी म्हणाले.

भविष्यात पर्यायी इंधनाचा वापर करावा लागेल. इलेक्ट्रिक स्कुटर्स, कार आणि बसेसनंतर लवकरच आपल्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स आणि ट्रक्सही दाखल होणार आहेत. त्यासाठी आपण आग्रही असल्याचे गडकरी म्हणाले.

डिझेलवर चालणारी कृषी उपकरणे पेट्रोलवर चालवायला हवीत. फ्लेक्स इंजिनही इथेनॉलमध्ये परावर्तित करायला हवीत. बांधकाम सामग्री निर्मितीतही इथनॉलचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले आहे.

कारखान्यांनी साखर उत्पादनाकडून इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे सांगताना गडकरी यांनी त्यामागील अर्थकारण उलगडून सांगितले. साखरेची वाढती मागणी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. जेंव्हा कच्च्या तेलाच्या किमती १४० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत वाढतात त्यावेळी ब्राझील उसापासून इथेनॉल बनवतो. त्याचवेळी भारतातून साखरेची मागणी वाढत असते. मात्र जेंव्हा कच्च्या तेलाच्या किमती ७० ते ८० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत घसरतात, त्याचवेळी ब्राझीलमधून साखरेची निर्मिती केली जाते. जेंव्हा कच्च्या तेलाच्या किमती उतरतात, साखरेचे दरही उतरत असल्याचे गडकरी म्हणाले.

शेतकऱ्यांना त्यांचे इथेनॉल थेट विकता यायला हवे. त्यासाठी पुण्यात इथेनॉल पम्पचा सेटअप उभारण्याची सूचनाही गडकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिषदेत व्हर्च्युअली हजेरी लावली. राज्यातील साखर उद्योगासमोर आज अनेक अडचणी आहेत. बाजारपेठेच्या अभ्यासातही आपल्याला ब्राझीलचे अनुकरण करावे लागते. ब्राझीलमध्ये पाहणी करून वर्षातले पीक नियोजन केले जाते. आपणही आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करायला हवा, इथेनॉल निर्मितीवर भर द्यायला हवा, अशी गरज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com