इजिप्त गव्हाच्या बदल्यात भारताला खत देणार

पाच लाख टन गहू आयातीचा करार करण्याची शक्यता
इजिप्त गव्हाच्या बदल्यात भारताला खत देणार
FertilizerAgrowon

पुणे ः इजिप्त भारताकडून पाच लाख टन गहू आयातीचा करार (Wheat Import) करण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात भारताला खत (Fertilizer) आणि इतर उत्पादने देण्याची तयारी इजिप्तने दर्शविली आहे. पुढील हंगामातही गव्हाची टंचाई (Wheat Shortage) भासण्याच्या भीतीने इजिप्त सावध झाला आहे. गहू पुरवठ्यातील (what Supply) अनिश्‍चितता लक्षात घेऊन देशात गव्हाचा पुरेसा साठा (wheat Stock) असावा, यासाठी इजिप्तची धडपड सुरू आहे.

इजिप्तने यंदा पहिल्यांदाच भारताकडून गहू आयात केला. मागील आठवड्यात सर्व तपासण्या, अटी आणि शर्ती पूर्ण करून ५५ हजार टन गहू इजिप्तच्या बाजारात दाखल झाला. भारतीय गव्हाची गुणवत्ता आणि पोषणमूल्य लक्षात घेऊन इजिप्तने आणखी पाच लाख टन आयातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याबदल्यात इजिप्त भारताला खते आणि इतर उत्पादने देऊ शकेल, असे इजिप्तचे पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्री अली अल-मुसेल्ही यांनी सांगितले.

तुर्कस्तान देशाने विषाणू आढळल्याचे कारण देत भारतीय गहू नाकारला होता. त्यामुळे गहू निर्यातीवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त होत होता; मात्र जागतिक पातळीवर गहूटंचाई भासत आहे. अनेक देश गव्हासाठी चाचपणी करत आहेत; मात्र सध्या केवळ भारताकडेच नवीन पीक आहे. भारताने निर्यातबंदी केली असली तरी शासन पातळीवर निर्यात सुरू आहे. केंद्र सरकारने ज्या देशांची अन्नसुरक्षेसाठी गहू पाठवण्याची मागणी मान्य केली आहे, त्यांना निर्यातबंदीतून सूट देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर तेजीत

२०२१ च्या हंगामात अनेक देशांत गहू उत्पादन कमी झाले. रशिया आणि युक्रेन हे देश गहू निर्यातीत आघाडीचे देश आहेत. त्यांच्यात युद्ध सुरू झाल्यामुळे निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचे दर ४० टक्क्यांनी वाढले. तसेच रशिया, युक्रेनमध्ये यंदा गव्हाची पेरणी घटली आहे. त्यामुळे जागतिक गहूटंचाई केवळ याच वर्षापुरती मर्यादित राहील, असे म्हणता येणार नाही. त्यातच हवामान विषयक संकट आणि उष्णता हे घटक गहू पिकावर परिणाम करतात. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार २०२२ आणि २३ या वर्षांतही धान्य उत्पादन कमी राहील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर तेजीत आहेत. या अंदाजानंतर सीबॉटवर गव्हाचे वायदे ५ टक्क्यांनी सुधारले.

चार महिने पुरेल एवढाच गहूसाठा

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार नुकतेच इस्लामिक विकास बॅंकेच्या बैठकीदरम्यान इजिप्तचे पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्री अली अल-मुसेल्ही यांनी गहू निर्यातीच्या संदर्भात भारतीय राजदूतांसोबत चर्चा केली. भारताकडून विविध टप्प्यांत पाच लाख टन गहू आयातीचे करार करण्यासाठी चर्चा झाल्याचे मुसेल्ही यांनी स्पष्ट केले आहे. इजिप्तमध्ये सध्या चार महिने पुरेल एवढाच गव्हाचा साठा शिल्लक आहे. चालू हंगामातील पीक खरेदी केल्यानंतर २०२२ च्या शेवटपर्यंत पुरेल एवढा गहू सरकारकडे असेल. परंतु पुढील हंगामातील अनिश्‍चितता लक्षात घेऊन इजिप्त भारताकडून गहू खरेदी वाढवण्याच्या विचारात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com