सोलापूर- शेतीचं उत्पन्न नव्हे, खर्च पोचला दुप्पटीवर

मशागतीसह मजुरीही झाली अव्वाच्या सव्वा
सोलापूर- शेतीचं उत्पन्न नव्हे, खर्च पोचला दुप्पटीवर

सोलापूर ः शेणखतासह रासायनिक खतांचे (Chemical Fertilizer) वाढलेले दर, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे (Fuel Price) ट्रॅक्टरद्वारे करावयाच्या मशागतीचे वाढलेले दर (Tractor Cultivation Rate) आणि पैसे देऊनही मजुरांची असलेली वानवा या सारख्या महागाईच्या (Inflation) प्रश्नांनी एकीकडे आभाळाचे टोक गाठले असताना, दुसरीकडे शेतीचे उत्पन्न दुप्पट (Agriculture Income) करण्याबाबत आश्वासनाचा रतीब लावणाऱ्या सरकारने शेतीचा खर्च मात्र दुप्पटीवर नेऊन ठेवल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे.

देशाच्या तुलनेत शेतीमध्ये महाराष्ट्र हे प्रगत, प्रयोगशील आणि कडधान्य, तृणधान्यासह फलोत्पादनातील आघाडीवरील राज्य आहे. साहजिकच, सरकारी धोरणांचा, निर्णयांचा मोठा फटका शेतीला बसतोच बसतो. पण अलीकडच्या काही वर्षात महागाईचा हा आगडोंब इतका उसळला आहे की, शेती करणे मुश्कील होऊन बसले आहे. खते, बियाण्यांच्या वाढत्या किमती, नांगरणी, वखरणी, पेरणी, शेतमाल वाहतूक, मजुरी यांचे दर आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. त्यात पुन्हा अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीची भर पडते आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या खर्चाचा हिशोब करता शेतीचा खर्च दुप्पटीने वाढल्याचे दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक, मानसिक कोंडी झाल्याचे चित्र आहे.

या बाबत ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील तरुण शेतकरी सुनील पाटील यांनी या वाढत्या खर्चावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘माझ्याकडे ५० एकर शेती आहे. त्यात दोन एकर द्राक्ष, अडीच एकर हिरवी मिरची आणि ३५ एकर ऊस आहे. गेल्या दोन वर्षांत शेतीतला खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा मेळच बसत नाही. विशेषतः मशागत आणि मजुरीचा खर्च अव्वाच्या सव्वा होतो आहे.’’

गुंजखेड (ता. लोणार, जि. बुलडाणा) येथील शेतकरी प्रफुल्ल सुलताने म्हणाले, ‘‘माझ्याकडे ८५ एकर शेती आहे. आम्ही तूर, हरभरा, सोयाबीन, गहू अशी हंगामी पिके घेतो. त्यामुळे मधल्या काळात एक-दोनवेळा जादाची मशागत आम्हाला करावी लागते. पण गेल्या दोन वर्षात पेरणी, नांगरणीचे दर ४० ते ५० पन्नास टक्क्यांनी वाढले आहेत. त्याशिवाय मजुरी दरातील वाढही अशीच आहे. आता पेट्रोल- डिझेलचे दर काहीसे उतरले, पण ट्रॅक्टरवाले वाढवलेले दर कमी करायला तयार नाहीत. बाकी उत्पादनाचा आणि मिळणाऱ्या दराचा बेभरवसा तर ठरलेलाच आहे.’’


शेतातील खर्चाची स्थिती
काम---पूर्वीचा दर---आताचा दर
शेणखत (प्रतिट्रॅाली)...३५०० रुपये---५५०० रुपये
नांगरणी (प्रतिएकर)...१००० रुपये---२००० रुपये
फणपाळी (प्रतिएकर)--- ७०० रुपये---१५०० रुपये
पेरणी (प्रतिएकर)---८०० रुपये--- १६०० रुपये
ऊस लागवड मजुरी (प्रतिएकर)---२५०० रुपये---४५०० रुपये
कांदा लागवड मजुरी (प्रतिदिन)---३०० रुपये---६०० रुपये
शेणखत टाकणे मजुरी (प्रतिमजूर)---२५० रुपये---५०० रुपये

शेतमाल वाहतूक खर्चातही वाढ
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीचा खर्च जसा वाढला, तसा शेतमाल वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाली आहे. पूर्वी साधारणपणे दहा ते बारा किलोमीटरसाठी ३०० रुपये भाडे आकारले जायचे. परंतु सध्या ७०० ते ८०० रुपयांवर पोचले आहे. शिवाय, काही वाहनधारक प्रतिगोणी, कॅरेट यानुसारही स्वतंत्र भाडेआकारणी करतो. त्यातही भरीव वाढ झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com