आदिवासी पाड्यांवरील आंब्याची अमेरिकेत निर्यात

नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ
आदिवासी पाड्यांवरील आंब्याची अमेरिकेत निर्यात
MangoAgrowon

नाशिक : जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यात सुरगाणा तालुक्यातील उत्पादित आंबा (Mango) स्थानिक पातळीवर विक्री (Mango sale) होत असे. मात्र कृषी विभागाचे पाठबळ व मार्गदर्शनाखाली शेतकरी निर्यातक्षम आंबा (Export Quality Mango) उत्पादन घेत आहेत. हा आंबा निर्यात (Mango Export) होण्यासाठी ‘इको किसान शेतकरी उत्पादक कंपनी’ने कामकाज पाहिले. या भागातून पहिल्यांदाच अमेरिकेत निर्यात झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने (Department Of Agriculture) दिली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठा खुणावू लागल्या आहेत.

सुरगाणा तालुक्यातील सायलपाडा या दुर्गम भागातील शेतकरी छबू मल्हारी धूम यांच्या १२ क्विंटल केसर आंब्याची निर्यात झाली आहे. या तालुक्यात २ हजार हेक्टर क्षेत्रावर केसर, वनराज व हापूस या आंबा जातीच्या लागवडी अधिक प्रमाणावर आहेत. शेतकरी प्रामुख्याने सेंद्रिय निविष्ठा वापरतात. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित आंब्याला बाजारपेठ मिळण्यासाठी विविध संस्थांकडून वेळोवेळी प्रयत्न सुरू होते. निर्यातक्षम मालाच्या अनुषंगाने निर्यातीचे निकष पाळून आंब्याची काढणी झाली. काढणीपश्‍चात आवश्‍यक प्रक्रिया करून हा आंबा निर्यात झाला आहे.

पहिल्या खेपेत १२ क्विंटल आंबा पाठविण्यात आला आहे. तर आता दुसऱ्या खेपेला १२ क्विंटल आंबा निर्यातीच्या मार्गावर आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक कैलास शिरसाट, तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहणे, मंडळ कृषी अधिकारी सतीशकुमार बागूल, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दीपक बिरारी आदींचे सहकार्य लाभले.

चांगले दर मिळू लागले

कृषी विभाग व आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा तालुक्यातील जवळपास ८३ शेतकऱ्यांच्या ८८ प्लॉटची क्षेत्र नोंदणी केली आहे. त्यामुळे पारंपरिक स्थानिक विक्रीच्या तुलनेत निर्यातीमुळे चांगले दर मिळाले आहेत. जागेवर स्थानिक खरेदी ६० ते ६५ रुपये प्रतिकिलोने होते. मात्र निर्यात प्रक्रियेत १०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण आंबा उत्पादनाचे तंत्र अवगत केले आहे. त्यामध्ये काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी ‘अपेडा’च्या ‘मँगोनेट’ प्रणालीत नोंदणी केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने येथील बागांमध्ये निर्यातक्षम उत्पादन घेतले जात आहे.
प्रशांत राहाणे, तालुका कृषी अधिकारी, सुरगाणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com