राज्यात हरभरा खरेदीला १८ जूनपर्यंत मुदतवाढ

उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने मुदतीपूर्वीच थांबविलेली हरभरा खरेदी पुन्हा सुरू होणार आहे.
Chana
Chana Agrowon

अकोला ः उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने मुदतीपूर्वीच थांबविलेली हरभरा खरेदी (Chana Procurement) पुन्हा सुरू होणार आहे. नव्याने उद्दिष्ट वाढून मिळाल्याने आता राज्यात १८ जूनपर्यंत खरेदी प्रक्रिया (Procurement Process)राबवली जाणार असून नोंदणी केलेल्या हजारो हरभरा उत्पादकांना (Chana Farmer) या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.

केंद्राच्या आधारभूत किमतीने हरभरा (Chana MSP) खरेदीसाठी मार्चपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नोंदणी केलेल्यांची हरभरा खरेदी २९ मेपर्यंत खरेदीची मुदत होती. मात्र, २३ मे रोजीच खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने पोर्टल बंद करण्यात आले होते. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. प्रामुख्याने नोंदणी करूनही हरभरा खरेदी होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांमध्ये हाहाकार उडाला होता. शासनाने तातडीने मुदतवाढ व उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी सर्व स्तरातून झाली.

केंद्राने राज्याला ६७ लाख १३ हजार ५३४ क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. आता नव्याने मुदतवाढ देऊन ७ लाख ४६ हजार ४६० टनाचे सुधारित उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. यामुळे राज्यात नाफेड व एफसीआयसाठी व्हीसीएमएफ, मार्केट फेडरेशन, महाएफपीसी, पृथाशक्ती एफपीसी, वॅपको आदी खरेदी संस्थांच्या माध्यमातून आधीच्या केंद्रांवर ही प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हजारो क्विंटल हरभऱ्याची नोंदणी बाकी

२३ मे रोजी पोर्टल दुपारीच बंद केल्याने खरेदी करणाऱ्या एजन्सीसमोर पेच उभा राहिला होता. या दिवशी खरेदी केलेल्या हरभऱ्याची डाटा एन्ट्री झालेली नाही. गेले सात दिवस यासाठी प्रतीक्षा होती. प्रत्येक केंद्रावर किमान हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभऱ्याची नोंद व्हायची आहे. जोपर्यंत खरेदीची ही माहिती पोर्टलला अपडेट होत नाही, तोवर चुकाऱ्यांच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया होऊ शकत नव्हती. आता मुदत वाढवून मिळाल्याने पोर्टल सुरू होताच २३ मे रोजीच्या खरेदीची नोंद पोर्टलला करण्याची घाई राहणार आहे.

शेतकऱ्यांना बसला फटका

मुदतीपूर्वीच खरेदी प्रक्रिया अचानक बंद केल्याचा मोठा फटका हरभरा उत्पादकांना बसला. खरेदी केंद्रांवर उभ्या असलेल्या वाहनांचे सात दिवसांचे भाडे चुकवावे लागणार आहे. या हरभऱ्याच्या राखणीसाठी शेतकऱ्यांना केंद्रावर राहावे लागले. खरेदी बंद पडताच दरम्यानच्या काळात खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर पाडण्यात आले होते. हमीभाव व खुल्या बाजारातील दरात किमान १००० ते १५०० रुपयांची तफावत निर्माण झाली होत.

शेतकऱ्यांनी शेतमाल आणावा

ज्या शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली त्यांनी एसएमएस प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी आणावा. कुठल्याही प्रकारची घाई करू नये, असे आवाहन यानिमित्ताने बोलताना अधिकाऱ्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com