Chana Market Rate
Chana Market RateAgrowon

शेतकऱ्यांनो, हरभरा विकायची घाई करू नका

सध्या तूर, हरभरा (Chana) आणि इतर कडधान्यांचे दर दबावाखाली असले तरी लवकरच ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे. येत्या तीन-चार महिन्यांत हरभऱ्याच्या किंमती १०-१५ टक्के, तर इतर कडधान्यांच्या किंमती १५-२५ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

शेतीमाल बाजारपेठेमध्ये एका बाजूला खाद्यतेले (Edible Oil), गहू (Wheat) आणि कापसाच्या किंमतींचा (Cotton Rate) भडका उडालेला असताना कडधान्यांच्या (Pulses) किंमती मात्र तुलनेने थंडच राहिल्यात. काही प्रमाणात अपवाद उडदाचा. रब्बी हंगामातलं सगळ्यात महत्त्वाचं पीक असलेल्या हरभऱ्याची तर गोचीच झाली आहे. हरभरा आजदेखील हमीभावापेक्षा ५-१० टक्के कमी दराने विकला जातोय. खरं तर अन्नधान्य महागाईचा दर महिन्याला नवनवीन विक्रम होतो आहे. परंतु संपूर्ण देशभर रोजच्या जेवणात असणाऱ्या कडधान्यांच्या किंमती मात्र मंदीमध्ये आहेत. हे थोडंसं न पटणारं असलं तरी वास्तव तसंच आहे.

हरभऱ्याचा हंगाम (Chana season) दोन महिन्यांपूर्वी सुरु झाला. परंतु सुरूवातीपासूनच भाव मंदीच्या विळख्यात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल अजून रोखून ठेवला आहे. भाव वाढतील, या आशेवर ते बसले आहेत. स्थानिक बाजारामधील व्यापारी, स्टॉकिस्ट यांनीदेखील तेजीच्या लाटेमध्ये कडधान्यांचा नंबर लवकरच लागेल, या आशेवर साठे करून ठेवल्याचं बोललं जातंय. (Gram Market)

इतर वस्तुंच्या किंमती वेगाने वाढत असताना आपल्याकडील मालाची किंमत वाढणं तर सोडाच परंतु काही प्रमाणात कमी होत असल्याचं बघणं किती दुःखदायक असतं; ते फक्त शेअर किंवा कमोडिटी बाजारातील व्यापाऱ्यांनाच समजू शकतं. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती कडधान्य उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर ओढवली आहे.

दर सुधारणेचा ढोबळ अंदाज

मात्र थांबा, निराश होऊन हातपाय गाळून बसू नका. बाजाराचा कानोसा घेतल्यावर आशेचा किरण दिसतोय. कडधान्य बाजारात देखील 'ॲक्शन' येण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागलं आहे. साधारणपणे जून महिन्यामध्ये खरिपाच्या पेरण्यांची लगबग सुरू होईल. तेव्हापासून ते नोव्हेंबरपर्यंतचा जो कालावधी आहे, त्यात तूर, उडीद, मसूर आणि हरभरा या कडधान्यांमध्ये ही ‘ॲक्शन' कमी अधिक प्रमाणात येईल. अर्थात दरात सुधारणा होण्याचा हा ढोबळ अंदाज आहे. परंतु प्रत्येक कडधान्य पिकाची परिस्थिती वेगळी आहे. त्यांचा पिकनिहाय मार्केट ट्रेन्ड (बाजार कल) कसा राहील, याचा पुरेसा अंदाज यायला अजून थोडी वाट बघावी लागेल. परंतु निराशेच्या गर्तेत अडकून काही चुकीचे निर्णय होऊ नयेत, यासाठी ढोबळ हिन्ट देण्याचा हा प्रयत्न आहे.

सरकारी धोरणांमुळे मंदी

पुढं जाण्यापूर्वी आपण कडधान्य बाजारातली ही जी मंदी आहे, तिची कारणं बघूया. मुळात मागच्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारने कडधान्य आयातीसाठी मोठा आटापिटा केला. सरकारने तूर आयातीसाठी आफ्रिकी देश आणि म्यानमारशी पाच वर्षांचे करार करून टाकले. त्यामुळे कडधान्यांच्या किंमती दबावाखाली आल्या. त्यानंतर तूर, उडीद यांच्या करमुक्त आयातीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली. त्यामुळे देखील

मार्केट सेन्टिमेन्ट (बाजारातील वातावरण) बिघडलं. त्यापाठोपाठ अन्नधान्य उत्पादनाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजामध्ये हरभऱ्याचे उत्पादन विक्रमी ११० लाख टनांहून अधिक दाखवलं गेलं. त्यामुळेदेखील मंदीला खतपाणी मिळालं. आणि हे कमी म्हणून की काय, सरकारने हरभऱ्याच्या वायद्यांवर बंदी घालण्याचा फतवा काढला. सरकारनं जणू कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांविरूध्द युद्धच पुकारल्याचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे व्यापारी कडधान्यांमध्ये रस घेईनासे झाले.

Pigeon Pea
Pigeon PeaAgrowon

तूर आयात अपेक्षेपेक्षा कमी

वरील परिस्थिती आता थोडीशी बदलत आहे. तुरीची आवक आता बऱ्यापैकी येऊन गेली आहे. तसेच सुरवातीला परदेशी तूर मोठ्या प्रमाणात येईल असं बाजारात वातावरण होतं. परंतु अपेक्षेपेक्षा कमी तूर आयात झाली. देशांतर्गत बाजारात भाव वाढल्याशिवाय आयात करणं परवडणार नाही. सध्या आफ्रिकी तूर ५३-५५ रुपये किलो तर म्यानमारमधली लेमन तूर ६३ रुपये किलोच्या आसपास आहे. स्थानिक तूर बाजारात येत असल्यामुळे भाव वाढत नाहीत. स्थानिक तुरीच्या किंमतींपेक्षा आयात तूर महाग पडत आहे. त्यामुळे आयात अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येतंय. अर्थात त्याबद्दलची अधिकृत आकडेवारी अजून उपलब्ध नाही. स्थानिक तूर आयात मे महिन्याच्या मध्यापासून रोडावू लागेल. तेव्हा पुरवठा नियंत्रित होऊन तुरीचा बाजार सुधारत जाईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

Lentil
LentilAgrowon

मसुरमध्ये मंदीची शक्यता नाही

मसुर पुरवठा यावर्षी देखील कमीच असून या हंगामात सहा ते सात लाख टन आयात करावी लागेल. त्यामुळे रब्बी हंगामापर्यंत जसजसा पुरवठा कमी होईल तसा किंमतीला आधार मिळत जाईल, असं म्हटलं जात आहे. मसुर या कडधान्याला अरब देश, बांगलादेश आणि तुर्कीमधून चांगली मागणी असल्यामुळे त्याच्या किंमतीमध्ये मंदी येण्याची शक्यता नाही.

Black Gram
Black GramAgrowon

उडदात तेजीचे अनुमान

उडदाची गोष्टच वेगळी आहे. देशातील उत्पादन मागणीपेक्षा कमी असून म्यानमारमधील किंमतीदेखील चढ्याच आहेत. त्यामुळे आयात आर्थिकदृष्ट्या फायद्याची नाही. म्हणजे उडदाच्या बाबतीतही मागणी-पुरवठा समीकरण तेजीला पूरक आहे. दाक्षिणात्य समाजामध्ये उडीद कितीही महाग झाला तरी त्याच्या मागणीत फारशी घट होत नाही. त्यामुळे यावेळीही काही वेगळं घडण्याची सुतराम शक्यता नाही.

परंतु उडीद वगळता तूर, हरभरा आणि इतर कडधान्यांच्या बाबतीत एक गोष्ट समान असते. ती म्हणजे मे आणि जून महिन्यात देशाच्या बहुतेक भागात बाजारात आंबे मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे आंब्याच्या रसाच्या नादी लागलेले लोक कडधान्यांकडे या काळात थोडा कानाडोळा करतात. परंतु यावर्षी आंब्याचीही थोडी बोंबच झाली आहे. देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागांत आंब्यांचं उत्पादन चांगलंच घटलंय. तर पूर्व आणि उत्तर भारतात तुलनेनं उत्पादन बरं आहे. आंब्याची अशी स्थिती असल्यामुळे हरभरा, तूर आणि मसूर यांची मागणी वाढणार, हे नक्की.

धीर धरा...

सगळ्यात शेवटी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. देशात येत्या खरिपात सोयाबीन, कापूस आणि मक्याकडे शेतकऱ्यांचा ओढा असणार आहे. तर रब्बी हंगामात मोहरी आणि गहू बाजी मारण्याची चिन्हे आहेत. या पिकांच्या स्पर्धेत मंदीतील कडधान्यांचा टिकाव कितपत लागेल या शंकेची पाल चुकचुकू लागली आहे. ती खरी ठरल्यास पुढील हंगामामध्ये कडधान्यांचं उत्पादन खूप घसरेल. अर्थात सध्यापुरत्या या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत. पण तसं घडून आलं तर मात्र २०२२च्या उत्तरार्धात कडधान्य उत्पादकांना चांगले दिवस येतील. सरकारचा पीक उत्पादनाचा तिसरा अंदाज कधी येतोय, याची मात्र वाट बघावी लागेल. त्यात कडधान्यांचं उत्पादन कमी दाखवलं जातंय की नाही, हे तपासावं लागेल.

तर ही होती कडधान्य बाजाराच्या ट्रेन्डची ढोबळ माहिती. त्या आधारे आपल्याला असा अंदाज बांधायला हरकत नाही की, येत्या तीन-चार महिन्यांत हरभऱ्याच्या किंमती १०-१५ टक्के, तर इतर कडधान्यांच्या किंमती १५-२५ टक्क्यांपर्यंत वाढतील. कडधान्यांचे व्यापारी आणि आयातीमधल्या आघाडीच्या संस्थांमधील सूत्रांकडूनही त्याला दुजोरा मिळतो आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com