Flower Market: गणेशोत्सवासाठी सजले जळगावचे फूल ‘मार्केट’

जळगाव जिल्हा फुलांच्या उत्पादनातही (Flower Production) अग्रेसर आहे. गुलाब, शेवंती, लिली, निशिगंध आदींची लागवड वाढत आहे.
Flower Market
Flower MarketAgrowon

जळगाव जिल्हा केळी (Banana), कापूस (Cotton) यांच्याबरोबर फुलशेतीसाठीही (Flower Farming) प्रसिद्ध आहे. गुलाब, झेंडू, लिली व शेवंतीच्या फुलांसाठी येथील बाजार प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जळगावचा हा फुलबाजार फुलला आहे. यंदा अतिपावसामुळे फुलांची आवक अन्य वर्षांच्या तुलनेत कमी राहील. मात्र शेतकऱ्यांना दर चांगले मिळतील अशी जाणकारांची आशा आहे.

जळगाव जिल्हा फुलांच्या उत्पादनातही (Flower Production) अग्रेसर आहे. गुलाब, शेवंती, लिली, निशिगंध आदींची लागवड वाढत आहे. कामिनी, मोगरा आदींचीही एक-दोन गुंठ्यांत लागवड करणारे शेतकरी आहेत.

भुसावळ, एरंडोल, जामनेर या भागांबरोबर जळगाव तालुक्यातील शिरसोली प्रगणे बोरनार व शिरसोली प्रगणे नशिराबाद येथे फुलांची सर्वाधिक शेती पाहण्यास मिळते. कोविड काळात प्रतिकूल अनुभव आल्याने अनेकांनी गुलाब, लिलीच्या बागा काढून टाकल्या. आता पुन्हा नव्याने बागा वाढल्या आहेत.

यंदाची स्थिती

शेतकरी गणेशोत्सव, नवरात्री व पुढील सणांमध्ये फुले बाजारपेठेत आणण्याच्या दृष्टीने लागवड हंगाम साधतात. यंदा जुलै व ऑगस्टमध्ये अति पावसामुळे जिल्ह्यात १५० एकरांतील झेंडू व सुमारे १०० एकरांतील शेवंती पीक नुकसानग्रस्त झाले. परिणामी, आवक कमी दिसत आहे. परिणामी, फुलांचे दर स्थिरावले आहेत. कोविड काळातील बंधने दूर झाली आहेत.

यंदा जिल्ह्यात दीड हजारांवर मोठी गणेश मंडळे आहेत. प्रत्येक घरात श्रींची प्रतिष्ठापना होतेच. गणरायाला दूर्वांसह फुले वाहण्याची परंपरा आहे. यामुळे लहान, मोठे हार, फुलांना मोठी मागणी असते. पूर्वीच्या अनुकूल काळाचा विचार केल्यास गणेशोत्सवात जळगावच्या बाजारात दररोज ६० ते ६५ क्विंटल झेंडू, सात ते आठ क्विंटल शेवंती, गुलाब फुले ३० ते ३५ हजार नग आणि निशिगंधाच्या चार ते पाच क्विंटल फुलांना मागणी असते. परंतु यंदा नुकसानीमुळे एवढी आवक शक्य नाही.

सध्या बाजारात दररोज ३५ ते ४० क्विंटल झेंडू, तीन ते साडेतीन क्विंटल शेवंती, दीड ते दोन क्विंटल निशिगंध आणि गुलाबाचे सुमारे २५ हजार नग एवढी आवक होत आहे. जळगावच्या बाजारातून स्थानिकसह नागपूर, अकोला, अमरावतीसह गुजरातमधील बडोदा, सुरत, अहमदाबाद, मध्य प्रदेशातील इंदूर, बऱ्हाणपूर येथे फुलांची पाठवणूक होते.

बाजाराचा विस्तार

विविध फुलांचा रोपे शेतकरी रोपवाटिकेतून उपलब्ध करतात. जामनेर, जळगाव तालुक्यांत रोपवाटिका व्यवसाय त्या अनुषंगाने वाढला आहे. जळगाव- औरंगाबाद रस्त्यावरील मुख्य बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केट यार्डात पूर्वी लिलाव व्हायचे. तेथे जाण्यास अधिक वेळ व वाहतूक खर्च लागायचा. ही बाब लक्षात घेऊन जळगाव शहरात मध्यवर्ती वल्लभदास वालजी (व.वा.) व्यापारी संकुलातील तळमजल्याला शेतकऱ्यांनी विक्री सुरू केली. त्यास गोलाणी मार्केट म्हणूनही ओळखले जाते. पंचवीस वर्षांत बाजाराने चांगला विस्तार साधला आहे. सध्या १२ अडतदार आहेत.

टवटवीत फुलांची आवक

लिलाव सकाळी सहालाच सुरू होता. शेतकरी तोडणी भल्या पहाटेच करतात. लागलीच ती गोलाणी मार्केटमध्ये येतात. ताज्या फुलांना अधिक दर मिळावेत असा त्यांचा प्रयत्न असतो. बुलडाणा येथूनही हंगामी आवक होते. काही शेतकरी जळगाव शहरातील विविध चौक व पेठांमध्येही थेट विक्री करतात. झेंडूची सर्वाधिक तर पाठोपाठ गुलाब, शेवंती, लिलीची आवक असते. निशिगंध व मोगऱ्याची आवक तीन वर्षांत कमी झाली आहे. मोगरा अर्धा क्विंटल ते ३० किलो एवढीच आवक मागील वर्षी प्रति दिन सरासरी झाली. मोगऱ्याला विषम वातावरणाचा फटका बसतो. इतर फुलांच्या तुलनेत हे पीक अति संवेदनशील असल्याचे शेतकरी सांगतात.

दर व उलाढाल

-प्रातिनिधिक आवक सांगायची, तर २०२१ मध्ये झेंडू ३० लाख क्विंटल, लिली ४० लाख गठ्ठे, शेवंती अडीच हजार क्विं. गुलाब ४० लाख नग आवक.

-मागील दोन वर्षे (२०१९, २०२०) मध्ये झेंडूची हीच आवक ६० ते ६४ लाख क्विंटल. लिली ५० लाख गठ्ठ्यांच्या आसपास होती.

-मागील गणेशोत्सवात गुलाबास ३० पासून ते १५० रुपये प्रतिशेकडा, झेंडू २०० रुपये प्रति किलो दर.

-शेवंतीला ६० ते कमाल २०० रुपये प्रति किलोचा दर मागील वर्षांत मिळाला.

-लिली ४० ते ५० रुपये प्रति गठ्ठा, तर सरासरी ३० रुपये दर राहिला.

-कोविड काळात दर कमी अधिक राहिले.

उलाढाल (कोटी रुपयांत)

२०१९ - सात

२०२० - साडेसहा

२०२१ - सहा कोटी ७४ लाख

-काही महिन्यांत उलाढाल २५ लाखांपर्यंत. सप्टेंबर ते डिसेंबर काळात ती एक कोटींवर. उन्हाळ्यात लग्नसराईत उलाढाल चांगली. या वर्षी उन्हाळ्यात गुलाबास प्रति शेकडा २०० रु., झेंडू ५० रुपये (प्रति किलो), निशिगंध १४० रुपये प्रतिकिलो दर होते. पावसाळ्यात दर कमी झाले. गुलाबास १०० रुपये प्रति शेकडा, झेंडूस २५ रुपये व निशिगंध व मोगरा यांना मात्र २०० रुपये प्रति किलो दर मिळाले.

यंदा अतिपावसाचा फुलाशेतीला फटका बसला आहे. त्यामुळे फुलांची आवक मागील वर्षाच्या तुलनेत निम्मीच राहील. झेंडू व शेवंतीची आवक कमी व मागणी अधिक राहील. शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील.

- श्रीराम बारी- ८८३०२०९४७० फूल अडतदार व शेतकरी, जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com