मसालेदार ‘ऑप्शन्स'

हळदीसाठी (Turmeric) महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमधील शेतकरी कंपन्यांसाठी जोखीम व्यवस्थापन अधिक सोपे होईल, अशी अपेक्षा आहे.
Spice
SpiceAgrowon

श्रीकांत कुवळेकर

एनसीडीईएक्सने मागील शुक्रवारी मसाले पिकांमध्ये (Spice Crops) ऑप्शन्स उपलब्ध करून दिले आहेत. सुरवातीला फ्युचर्समध्ये जोरदार व्यवहार होत असलेल्या हळद, जिरे आणि धने या तीनही मसाले पिकांमध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांसाठी ऑप्शन्स उपलब्ध केले गेले आहेत. यापैकी हळदीसाठी (Turmeric) महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमधील शेतकरी कंपन्यांसाठी जोखीम व्यवस्थापन अधिक सोपे होईल, अशी अपेक्षा आहे. तर जिरे आणि धने या दोन पिकांमध्ये असलेल्या ऑप्शन्सचा फायदा गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांतील शेतकरी घेऊ शकतील.

एनसीडीईएक्स या भारतातील आघाडीच्या कृषी कमोडिटी एक्सचेंजने नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांच्या वायदेमंचावरून 'ऑप्शन्स' हे साधन उपलब्ध करून दिले होते. सुरवातीला हरभरा आणि मोहरीसाठी उपलब्ध असलेले हे साधन नंतर सोयाबीन, गवार, आणि मक्यासारख्या पिकांसाठी उपलब्ध करण्यात आले. मधल्या काळात सोयाबीन (Soybean), मोहरी (Mustard)आणि हरभरा यांच्या वायद्यांवर केंद्र सरकारने बंदी घातली.

त्यामुळे सध्या फक्त गवार आणि मक्याच्या (Maize) ऑप्शन्समध्ये व्यवहार होताना दिसतात. एकंदरीत एनसीडीईएक्सवरील वायदेबंदीमुळे व्यवहार थंडावले असून दुसरीकडे जोखीम व्यवस्थापनाची संधी हिरावून घेतली गेली. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोन्ही घटकांचे नुकसानच झाले आहे. बरे एवढे करूनदेखील वायदे बंदीनंतरचे सलग नऊ महिने शेतीमालाचे दर वाढतच राहिले. त्यामुळे सरकारला देखील काहीच फायदा झालेला नाही.

महागाईशी झुंजताना आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारामध्ये (International Commodity Market) जोरदार मंदीची लाट येण्याची सुरूवात कधी झाली तेदेखील कळले नाही. खनिज तेल, पाम तेल सोयाबीन आणि सोयातेल, गहू, सूर्यफूल तेल २०-४० टक्क्यांहून अधिक गडगडले.

आता खरीप हंगामातील पिकांची जेव्हा काढणी होईल तेव्हा म्हणजे ऑक्टोबर-डिसेंबर या काळात किंमती किती घसरतील याबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे. त्यातून शेतकरी कंपन्या आणि उद्योग व व्यापारी संघटनांनी वायदे बाजार परत चालू करण्यासाठी सरकार दरबारी गाऱ्हाणे नेण्यास सुरवात केली आहे.

बंद झालेले वायदे परत केव्हा सुरु होतील याबद्दलची अनिश्चितता तशीच असताना वायदे बाजारामध्ये नुकतीच एक चांगली गोष्ट घडली आहे. एनसीडीईएक्सने मागील शुक्रवारी मसाले पिकांमध्ये ऑप्शन्स उपलब्ध करून दिले आहेत. सुरवातीला फ्युचर्समध्ये जोरदार व्यवहार होत असलेल्या हळद, जिरे आणि धने या तीनही मसाले पिकांमध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांसाठी ऑप्शन्स उपलब्ध केले गेले आहेत.

यापैकी हळदीसाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमधील शेतकरी कंपन्यांसाठी जोखीम व्यवस्थापन अधिक सोपे होईल, अशी अपेक्षा आहे. तर जिरे आणि धने या दोन पिकांमध्ये असलेल्या ऑप्शन्सचा फायदा गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांतील शेतकरी घेऊ शकतील.

ऑप्शन्स व्यवहारांबाबतची माहिती या स्तंभातून तसेच ॲग्रोवनच्या बातम्या आणि इतर सदरांमधून वेळोवेळी दिली गेली आहेच. त्याची थोडक्यात उजळणी आपण येथे करूया. तर ऑप्शन्स हे कॉन्ट्रॅक्ट कमोडिटीचा दर्जा, डिलिव्हरी, मार्केट लॉट साईझ या बाबतीत फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट प्रमाणेच असते. परंतु फ्युचर्समध्ये सुरवातीला द्यावे लागणारे १०-१२ टक्के मार्जिन आणि त्यानंतर दररोज बाजारभावामध्ये होणाऱ्या बदलांप्रमाणे अनेकदा द्यावे लागणारे मार्क-टू-मार्केट साठी लागणारे भांडवल ऑप्शन्समध्ये गरजेचे नसते.

उदाहरणार्थ, सध्याच्या मंदीमध्येही फ्युचर्स व्यवहारात सोयाबीनचा एक लॉट विकण्यासाठी ३० ते ३५ हजार रूपये मार्जिन द्यावे लागते, तसेच मार्क-टू-मार्केट साठी सुमारे २५ हजार रुपयांची अतिरिक्त ठेव लागते. परंतु पुट ऑप्शन्समध्ये मात्र त्याऐवजी सुमारे १५ हजार रुपये एकदाच भरून सोयाबीनमध्ये आपला विक्रीचा भाव निश्चित करता येऊ शकतो.

म्हणजेच पुट ऑप्शन्स खरेदी करण्यासाठी आपल्याला जी विक्री किंमत हवी, त्यावर आधारित प्रीमियम द्यावा लागतो. पिकविम्यासाठी जसा आपण एक वेळचा प्रीमियम देतो अगदी तसेच. ऑप्शन्सवरील प्रीमियम देखील आपण पिकविम्याप्रमाणेच उत्पादन खर्चात जोडावा. आता खरेदी केलेला पुट ऑप्शन खरेदीदार शेतकऱ्याला आधी ठरलेल्या किंमतीला आपला माल विकायचा हक्क देते परंतु दायित्व अथवा बांधिलकी नाही.

म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर ७,००० रूपयांचे पुट ऑप्शन घेतले असेल आणि ऑप्शन समाप्ती अगोदर भाव ८,००० रूपये झाला तर शेतकरी आपला माल हजर बाजारात ८,००० रुपयांना विकू शकतो. ऑप्शन खरेदीदाराला ७००० रूपयात माल देण्यासाठी तो बांधील नसतो. मात्र समाप्तीला भाव ६,००० रुपये झाला तर त्याला डिलिव्हरी करण्याचा हक्क बजावू शकतो. म्हणजेच एकदा पुट ऑप्शन खरेदी केले की ज्या भावाचे ऑप्शन घेतले त्यापेक्षा कमी भाव झाला तरी शेतकऱ्यांचा फायदा किंवा भाव वाढला तरीही फायदाच. या गोष्टीसाठी मोजावी लागणारी थोडीशी किंमत म्हणजे सुरवातीला भरावा लागणार प्रीमियम.

यावरून आपल्या लक्षात येईल की फ्युचर्सपेक्षा ऑप्शन्समध्ये कमी भांडवलात जोखीम व्यवस्थापन करणे शक्य आहे. त्याबरोबरच राज्य सरकारे देखील हळदीसारख्या पिकामध्ये हमीभाव खरेदी करण्यासाठी पुट ऑप्शनचा वापर करू शकतात. उदाहरणार्थ, जर तेलंगणाच्या मार्कफेड या सरकारी पणन संस्थेला ५०,००० रुपये प्रति टन भावाने १,००० टन हळद खरेदी करायची तर ५ टन लॉट साईझ असलेली २०० पुट ऑप्शन्स काँट्रॅक्टस ते एनसीडीईएक्स मंचावर ठरलेल्या शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरेदी करून देऊ शकतात.

त्यासाठी लागणारा प्रीमियम राज्य सरकारने अनुदान म्हणून भरावा. यानंतर सरकारची जबाबदारी संपली. ना हजर बाजारात हळदीचे साठे हाताळणे आले, ना गोदामांची गरज, ना सरकारी यंत्रणांवरील कामाचा ताण आणि ना मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज. सध्याच्या पध्दतीत शेतीमालाचे भाव हमीभावापेक्षा खाली गेले की शेतकऱ्यांमधून ओरड सुरू होते, मग त्यानंतर बरीच भवति न भवति होऊन सरकार प्रत्यक्ष बाजारातून हमीभावाने शेतीमाल खरेदीची प्रक्रिया सुरू करते. यात वेळ बराच जातो, सरकारवर मोठा आर्थिक भुर्दंड पडतो आणि खरेदीचे प्रमाण मर्यादीत असल्याने शेतकऱ्यांनाही पुरेसा दिलासा मिळत नाही.

महाराष्ट्र हळदीच्या (Turmeric Cultivation) लागवडीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हळद लागवड क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. कोरोनानंतर आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्यामुळे हळदीचा खप वाढला. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे काढणीच्या किंवा इतर योग्य वेळी हळद बाजारात शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी विविध योजनांद्वारे ऑप्शन्सद्वारे बाजार हस्तक्षेप कसा करता येईल, याची माहिती घेणे फायदेशीर ठरेल.

(लेखक कृषी व्यापार, कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com