शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण द्या ः जावंधिया

कोटा पूर्ण झाल्याच्या सबबीखाली महाराष्ट्रात नाफेडची हरभरा खरेदी बंद करण्यात आली.
शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण द्या ः जावंधिया
Vijay JawandhiyaAgrowon

नागपूर : ‘‘कोटा पूर्ण झाल्याच्या सबबीखाली महाराष्ट्रात नाफेडची (NAFED) हरभरा खरेदी बंद (Chana Procurement) करण्यात आली. परिणामी, शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने हरभरा विकावा लागत आहे. याची दखल घेत शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण (MSP Protection) मिळावे, याकरिता शासनाने विधानसभेत कायदा करावा. केंद्र सरकारवर दबावासाठी आंदोलन करावे,’’ अशी मागणी कृषी विषयाचे अभ्यासक विजय जावंधिया (Vijay Jawandhiya) यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना या विषयावर त्यांनी पत्र लिहिले आहे. पत्रानुसार, शेतकऱ्यांच्या व्यथेला अंत नाही. गेल्या वर्षी मी स्वतः माझा गहू वर्धा बाजार समितीत १४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने विकला होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर तेजी आली. त्यामुळे देशांतर्गत गव्हाचे दर २२०० ते २५०० रुपयांवर पोहोचले. या तेजीमुळे शेतकरी सुखावला असताना किरकोळ बाजारात देखील महागाई वाढेल, या भीतीने ग्रासलेल्या केंद्र सरकारने तत्काळ निर्यात बंद केली. परिणामी, बाजारात गव्हाच्या दरात घसरण झाली.

डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढवा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा पेरा वाढवला. निसर्गाने साथ दिली. उत्पादन चांगले झाले. पण सरकारने डाळी आयात केल्या. परिणामी, बाजारात भाव पडले. नाफेडकडून ५२५० रुपये हमीभावाने हरभरा खरेदी होत आहे. वर्धा बाजार समितीत ४००० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल दर आहेत. यावरूनच शेतकऱ्यांना सरसकट १००० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे, असा आरोपही जावंधिया यांनी केला.

यंदाच्या हंगामात हरभऱ्याचे उत्पादन अधिक झाले असताना नाफेडकडून केवळ ६.८ लाख टन इतका अत्यल्प कोटा निश्‍चित करण्यात आला. उद्दिष्टा इतका हरभरा खरेदी झाल्यानंतर शासनाने खरेदी बंद केली. उद्दिष्टपूर्तीचा आकडा जाहीर करण्यात आला. परंतु किती शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात हरभरा विकला, याचा आकडा देखील शासनाने जाहीर करावा, अशी मागणी जावंधिया यांनी केली.

हिंगणघाटमध्ये सहा लाख क्विंटल हरभरा शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात विकला. त्याचवेळी शासकीय खरेदी केवळ २० हजार क्विंटल आहे. वर्धा बाजार समितीत रोज ५०० ते ६०० क्विंटल हरभरा आवक होत आहे. या ठिकाणी ४००० ते ४२४० प्रति क्विंटल दर आहेत. वर्धा केंद्रावर १६०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी केवळ ६३५ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला. शेतीमाल हमी किमतीत बाजार समितीच्या प्रांगणातच विकला जाईल, याची हमी देणारा कायदा विधानसभेत करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com