Raw Sugar Export: सरकारचा आणखी काही कच्च्या साखरेच्या निर्यातीला हिरवा कंदील ?

देशातील विविध बंदरांवर सुमारे दोन लाख टन कच्ची साखर (Raw Sugar) पडून असल्याची माहिती आहे. ही साखर देशाबाहेर पाठवण्यास परवानगी द्यावी, अशी साखर उद्योगाची मागणी होती. (Sugar Export)
Raw Sugar Export
Raw Sugar ExportAgrowon

केंद्र सरकार (Central Government) आणखी काही कच्ची साखर निर्यात (Raw Sugar Export) करण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्याच्या तयारीत आहे. देशातील विविध बंदरांवर पडून असलेल्या कच्च्या साखरेचा प्रश्न त्यामुळे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेही ही बातमी दिलीय.

सरकारने गेल्या महिन्यात साखर निर्यातीवर बंधने आणली होती. निर्यातीसाठी १०० लाख टन साखरेची मर्यादा घातली होती. तसेच कोटा ठरवून देण्यात आला होता. त्यानंतर देशातील विविध बंदरांवर सुमारे दोन लाख टन कच्ची साखर पडून असल्याची माहिती आहे. ही साखर देशाबाहेर पाठवण्यास परवानगी द्यावी, अशी साखर उद्योगाची मागणी होती. हा प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच त्यासंदर्भातील निर्णय होईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

केंद्र सरकारने वाढती महागाई रोखण्यासाठी गहू निर्यातबंदीपाठोपाठ साखरेकडे मोर्चा वळवला होता. अर्थात गव्हाप्रमाणे साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली नाही. परंतु स्थानिक बाजारात साखर जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी आणि भाव नियंत्रणात राहावेत यासाठी निर्यातीवर काही बंधने घालण्यात आली. त्यानुसार निर्यातीसाठी १०० लाख टनाची मर्यादा घालण्यात आली. हा टप्पा आता जवळपास गाठला आहे.

साखर कारखान्यांकडे कच्च्या साखरेचा मोठा साठा आहे. तो मोकळा करण्यासाठी निर्यातीची परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाने केंद्र सरकारकडं केली आहे. कारखान्यांकडे कच्च्या साखरेचा एकूण साठा पाच लाख टनांच्या आसपास असल्याची माहिती आहे. त्यापैकी सुमारे दोन लाख टन साखर देशभरातील विविध बंदरांवर अडकून पडली आहे.

भारताची साखर निर्यात यंदा विक्रमी १०० लाख टनावर पोहोचण्याच्या बेतात आहे. त्यापैकी सुमारे ४५ लाख टन ही कच्ची साखर आहे तर उरलेली ५५ लाख टन ही रिफाईन केलेली पांढरी साखर आहे. भारतातले साखर कारखाने केवळ निर्यातीसाठीच कच्च्या साखरेचं उत्पादन घेतात. ही साखर ज्या देशांना पाठवली जाते तिथे त्यावर प्रक्रिया केली जाते. गेल्या काही वर्षांपासून कच्च्या साखरेच्या निर्यातीत भारताने आपलं एक स्थान निर्माण केलंय. ब्राझील आणि थायलंडच्या बरोबरीने भरवशाचा पुरवठादार म्हणून नाव कमावलंय.

पण निर्यातीवर बंधने घातल्यावर या शिल्लक कच्‍च्या साखरेचं काय करायचं, हा प्रश्न उभा राहिला. कारण कच्च्या साखरेला स्थानिक बाजारात मागणी नाही. ती तशीच पडून राहिली तर कारखान्यांचं आर्थिक नुकसान होणार. त्यामुळे ही साखर निर्यात करायला परवानगी देणंच शहाणपणाचं ठरेल, असं मत इंडियन शुगर मिल्स असोसिएशन म्हणजे इस्माचे अध्यक्ष आदित्य झुणझुणवाला यांनी व्यक्त केलंय.

केंद्र सरकारने अचानक निर्यातीवर बंधनं आणली. त्यातच ट्रक आणि रेल्वे वॅगन्सचा तुटवडा असल्यामुळे वाहतुकीत अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे कच्च्या साखरेची वाहतुक मंदावली. त्यामुळे साखरेचे साठे वाढले. सरकारने कारखान्यांकडून आणि निर्यातदारांकडून कच्च्या साखरेची आकडेवारी गोळा करायला सुरूवात केलीय.

सरकारने कारखान्यांना साखर निर्यातीसाठी परवानगी दिली तर कारखान्यांना मोठा फायदा होईल. जागतिक बाजारात साखरेचे दर सध्या चढे आहेत. त्यामुळे भारतीय साखरेला चांगला दर मिळेल, असे बाजारविश्लेषकांनी सांगितलं. साखर कारखान्यांचा आर्थिक ताळेबंद सुधारण्यासाठी या निर्णयाचा फायदा होऊ शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com