कोट्यवधी नागरिकांची क्रयशक्ती कशी वाढणार?

आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य आंदोलनात (Freedom Struggle) भाग घेतला. का? तर स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशात आपले फुटके नशीब काही प्रमाणात सांधले जाईल या स्वप्नाने भारावून.
Narendra Modi
Narendra ModiAgrowon

संजीव चांदोरकर

महोदय, हवे तर त्या सगळ्या तथाकथित, टोकन मदत करणाऱ्या लोककल्याणकारी योजना बंद करा; पण सारखे फुकटे, फेकलेल्या रेवडी उचलणारे म्हणून हिणवू नका. आम्ही पिढ्यान् पिढ्या अर्धपोटी राहिलो, माणूस म्हणून जन्मलो तरीदेखील आमच्या अनेक पिढ्या जनावरासारखे आयुष्य जगल्या आणि एक दिवस मेल्या. आम्ही आमच्या, पुढच्या पिढ्यादेखील तसेच जगू आणि मरून जाऊ.

आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य आंदोलनात (Freedom Struggle) भाग घेतला. का? तर स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशात आपले फुटके नशीब काही प्रमाणात सांधले जाईल या स्वप्नाने भारावून. आम्ही सतत प्रत्येक निवडणुकीत (Election) हिरिरीने मतदान करतो. कशासाठी? तर हे आपले जनप्रतिनिधी (representatives) आहेत, परके नाहीत. आपले शासन आहे. आज ना उद्या आपले राहणीमान सुधारेल, आपल्या मुलाबाळांचे भविष्य घडेल या आशेने.

Narendra Modi
ग्रामीण अर्थकारणास डेअरी क्षेत्रामुळे चालना : नरेंद्र मोदी

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी सरकारी आकडेवारीपासून जागतिक संस्थांपर्यंत सगळे जण सांगत आहेत की देशातील दारिद्र्य संपत नाहीये. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी देखील कोट्यवधी नागरिक गरीब असतील तर तो दोष गरिबांचा की विशिष्ट आर्थिक धोरणे ठरवणाऱ्या, राबवणाऱ्या अर्थतज्ज्ञ, बँकर्स, थिंक टँक्स, राजकारणी, नोकरशहा यांचा?

जरा ग्रामीण भागात उघड्या डोळ्यांनी, तुमच्या आलिशान गाड्यांच्या काळ्या काचा खाली करून बघा. पुरुष, स्त्रिया किती कष्ट घेत असतात, याची नोंद घ्या. त्यांचा बॉडी-मास रेशो काढा. त्यांचे काळवंडलेले चेहरे बघा. देशातील ७० टक्के नागरिक अजूनही अनिश्‍चित शेतीवर उपजीविका करतात.

तुमच्या त्या सुटेड बुटेड एमबीए/ कॉर्पोरेट फायनान्सवाल्या ‘रिस्क मॅनेजमेंट’ शिकलेल्याना सांगा एकदा शेतीतील ‘रिस्क असेसमेंट’ करायला. त्यांना पळता भुई थोडी होईल. ग्रामीण भागातून रोजगाराच्या अपेक्षेने महानगरात ढकलले गेलेले स्थलांतरित बघा. रोजगार नाही तर किडुकमिडुक स्वयंरोजगार करत स्वाभिमानाने आयुष्य कंठणारे लोक बघा.

गेली ३० वर्षे मार्केट सगळे काही देईल म्हणून कानठळ्या बसवत आम्हाला सांगता आहात. आम्हाला पण आवडेल ना सर्व काही मार्केटमधून खरेदी करायला; पण त्यासाठी आमच्याकडे क्रयशक्ती तयार व्हायला नको? कोट्यवधी नागरिकांची क्रयशक्ती कालबद्ध रीतीने कशी वाढणार? त्यासाठी कोणत्या योजना तुमच्याकडे आहेत? हे प्रश्‍न विचारले की मार्केट तत्त्वज्ञान पाजळणारे पळून जातात.

त्या अर्थतज्ज्ञांचे सोडून द्या; पण तुम्ही राजकारणी? तुम्ही तर काही वर्षांपूर्वीपर्यंत आमच्या वर्ग-जातीतले होतात ना? तुमचे कितीतरी भाईबंद, जातवाले, गाववाले अजूनही त्याच दलदलीत फसले आहेत. आम्ही तुम्हाला निवडून देतो; पण तुम्ही त्यांची भाषा बोलता?

आम्हाला देखील फुकट / सबसिडी/ कल्याणकारी योजनांमधून काहीही नको आहे. आम्हाला गरीब म्हणवून घेणं नको आहे. कोणत्याच प्रौढ स्त्री-पुरुषाला ते आवडत नसते. कारण त्यातून आमच्या आत्मसन्माला आत खोलवर जखम होते. भळभळत राहते रक्त दिवस-रात्र. आम्हाला भाकरी हवी, हे खरे आहे; पण आत्मसन्मान देखील हवा आहे. खरं तर आत्मसन्मान विकून आम्हाला भाकरी नको. वेळ पडली तर आम्ही अर्धपोटी राहू.

तुम्ही जे काही देता ते तर सगळे ‘टोकानिझम’ असते. बंद करा सगळ्या त्या टोकन कल्याणकारी योजना; पण ते फुकटे, रेवडी उचलणारे म्हणून आम्हाला हिणवू नका.

(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक असून टाटा समाजविज्ञान संस्थेत अध्यापन करतात)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com