वाढीव हमीभाव सध्या निरर्थक पण...

खरिपाचे नियोजन करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. मागील वर्षभरात ज्या पिकांना चांगला भाव त्याला अधिक पसंती हा सर्वसाधारण फॉर्म्यूला असला तरी यावर्षी पुढील काळात कुठल्या पिकांना जास्त महत्त्व येईल याकडे जरा जास्तच लक्ष द्यावे लागेल.
वाढीव हमीभाव सध्या निरर्थक पण...
MSPAgrowon

श्रीकांत कुवळेकर

मागील चार-सहा आठवड्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मॉन्सून (Monsoon)अंदाजांमुळे देशाच्या कृषिक्षेत्रामध्ये निर्माण झालेले चैतन्य कुठेतरी कोमेजले जाऊ लागले आहे. नावापुरती कुठे कुठे मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. अजूनही अनेक ठिकाणी पडलेला पाऊस हा मोसमी पाऊस आहे की पूर्वमोसमी याबद्दल उलटसुलट मते व्यक्त केली जात आहेत. जून अर्धा संपून गेला असून, एकंदर मोसमी पाऊस ३०-३५% पिछाडीवर आहे. याबाबत एका माध्यमातील शीर्षक फार बोलके वाटले. ‘अदृश्य पावसाने बराच देश व्यापला’ अशा आशयाचे शीर्षक असलेल्या बातमीमध्ये मॉन्सूनबाबतच्या वस्तुस्थितीचे वर्णन केले आहे.

मागील चार-पाच वर्षांपासून बदलत चाललेल्या ऋतूंचा आणि मोसमी पावसाच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून काही अधिकारी आणि मंत्र्यांनी सुरुवातीलाच सल्ले दिले होते, की अमुक इतका पाऊस झाल्याशिवाय खरिपाच्या (Kharip Sowing)पेरण्या करू नका. त्यांच्यावर टीकाही झाली होती. शेवटी मोसमी किंवा बिगर मोसमी पाऊस, दोन्ही गोष्टी निसर्गाच्या हातात असतात. परंतु अनुभवाने आलेल्या शहाणपणाचे महत्व किती असते हे लक्षात आल्याने त्यांचा सल्ला सर्वांना पटू लागला आहे. या घडीला स्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना आपल्या भागात मॉन्सून येऊन पोहोचला की नाही, याबाबतच्या हवामान खात्याच्या माहितीपेक्षा प्रत्यक्ष शेतात चांगला पाऊस कधी येणार याबद्दलची चिंता भेडसावत आहे.

या पार्श्‍वभूमीवर खरिपाचे नियोजन करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. मागील वर्षभरात ज्या पिकांना चांगला भाव त्याला अधिक पसंती हा सर्वसाधारण फॉर्म्यूला असला तरी या वर्षी पुढील काळात कुठल्या पिकांना जास्त महत्त्व येईल याकडे जरा जास्तच लक्ष द्यावे लागेल. कारण कोविड आणि पाठोपाठच्या रशिया-युक्रेन युद्धामुळे वेगाने बदलणाऱ्या कृषी बाजारपेठेमध्ये सर्वच विकले जाईल अशी परिस्थिती सध्या आहे. मात्र परिस्थिती बदलली तर कुठल्या पिकांच्या किमती कमी-जास्त होऊ शकतील याचा अंदाज घेण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांची पसंती कोणत्या पिकांना?

केंद्र सरकारने नुकतेच खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती म्हणजेच हमीभाव जाहीर केले. हमीभावात ५-९ टक्क्यांची वाढ दिसत असली तरी पेरणीच्या दृष्टीने या वर्षी त्याचा फारसा प्रभाव नाही. याचे कारण म्हणजे कापूस आणि तेलबियांच्या सध्याच्या किमती हमीभावापेक्षा खूपच वर आहेत. त्यामुळे केवळ खुला बाजार, येत्या काळातील आंतरराष्ट्रीय घडामोडी यांनाच पेरणीच्या दृष्टीने महत्व राहणार आहे.

त्या दृष्टीने या घडीला खरिपातील कापूस आणि सोयाबीन यांच्या किमतीमधील तेजी शाबूत आहे. तर तिसरा पर्याय म्हणजे कडधान्य. परंतु अन्नमहागाई विक्रमी पातळीला असूनसुद्धा कडधान्ये सध्या हमीभावाच्या आसपास किंवा त्याखाली १० टक्के या कक्षेतच आहेत. म्हणून सध्या वाढीव हमीभावापेक्षादेखील अधिक किमतीमध्ये विकला जाणारा मका हा तिसरा पर्याय म्हणून अधिक योग्य राहील.

कडधान्यांच्या बाबतीत सरकारचे आयात शिथिलीकरण आणि मर्यादित खरेदी या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची कायम निराशा केलेली आहे. बदललेल्या ऋतूंमुळे मूग आणि उडीद ही पिके मागील चार वर्षे सातत्याने ऑगस्ट-सप्टेंबर मधील जोरदार पावसाला बळी पडताना दिसत आहेत. या वर्षी देखील तशाच प्रकारचे अंदाज असल्यामुळे काळजी घ्यावी लागेल. कडधान्ये हा खास करून खरिपापेक्षा रबीमध्ये चांगला पर्याय ठरेल.

मंदीची चाहूल?

मात्र जागतिक बाजारात शेतीमालाच्या दरातील सध्याची तेजी अशीच कायम राहील का आणि जर किमती कमी होऊ लागल्या तर कुठल्या पिकामध्ये मंदी मर्यादित राहील हेही पाहणे गरजेचे आहे. मुळात पुढे मंदी येण्यासाठी कोणती कारणे असतील? तर युक्रेनमधील युद्धसमाप्ती आणि अमेरिका उपखंडातील हवामान अपेक्षेहून चांगले राहण्याची शक्यता. यापैकी युद्ध समाप्ती झाल्यास खनिज तेल आणि नैसर्गिक गॅस यांच्या किमती बऱ्यापैकी पडू शकतील. यामुळे सोयाबीन आणि पामतेल स्वस्त होईल. परंतु किमती वर्षभरापूर्वीच्या पातळीवर येण्यास निदान एक हंगाम तरी जावा लागेल. जोडीला जागतिक हवामान बरे राहिले तर सोयाबीन बरोबर कापूस देखील खाली येईल.

व्याजदरवाढीचा फटका

मात्र या सर्वांहून मंदीला सर्वात मोठे कारण ठरू शकेल ते म्हणजे व्याजदरातील वाढ. मागील महिन्याभरात अर्धा टक्का आणि पाऊण टक्का अशा दोन व्याजदर वाढीनंतर शेअर बाजारामध्ये झालेला भूकंप, क्रिप्टोसारख्या आभासी चलनांमधील घसरण आणि त्यामुळे कित्यके अब्ज डॉलरने कमी झालेली रोख तरलता याचे दृश्य परिणाम कसे असतील याची कल्पना करणे कठीण आहे. परंतु अजून निदान दोन किंवा तीन व्याजदरवाढीमुळे स्थिती काय होईल याची कल्पना मागील शुक्रवारच्या जागतिक कमोडिटी बाजारातील घसरणीवरून येईल.

MSP
ॲक्टिव्हेटेड कार्बनमुळे नारळ व उत्पादनाच्या निर्यातीत ४१ टक्क्यांची वाढ

शुक्रवारी कच्च्या तेलामध्ये उच्च स्तरावरून ९ टक्के घसरण झाली. विशेष म्हणजे इराणवर अमेरिकेने नवे निर्बंध लादल्यावरही कच्चे तेल घसरणे धोक्याचे आहे. तर अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या पोलाद, ॲल्युमिनियम, तांबे, जस्त या कमोडिटीजमध्ये देखील मागील दोन आठवड्यांपासून चाललेली घसरण थांबण्याचे नाव नाही. मोठ्या प्रमाणातील व्याजदरवाढ जगातील प्रमुख देशांबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेने देखील सुरू केलीच आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर व्याजदरवाढीचे हे युद्ध रशिया-युक्रेन युद्धापेक्षा भयंकर परिणाम करणारे ठरेल. जग मंदीच्या खाईत लोटले जाईल, ही भीती काही काळात वस्तुस्थिती ठरेल असेही म्हटले जात आहे. आणि मंदीमध्ये सोने वगळता कोणतीच मालमत्ता परतावा देत नसते, हा अर्थव्यवस्थेचा नियमच आहे. अशा परिस्थितीमध्ये तुलनेने अन्नपदार्थ आणि पशुखाद्य यांचे भाव बरे राहतील. कारण जिवंत राहण्यासाठी त्या मूलभूत गरजा आहेत. म्हणजे सोयाबीन आणि मका यामधील धोका मर्यादित राहील.

कापसात मात्र व्याजदरात वाढीमुळे होणारी घसरण मोठी असू शकेल. त्याव्यतिरिक्त फीच या नामांकित कंपनीच्या अहवालाप्रमाणे या वर्षात चीनमध्ये वाढीव उत्पादन आणि मोठी आयात यामुळे मोठे साठे तयार झाले आहेत. त्यामुळे चीनकडून कापसाला येत्या वर्षात मागणी कमी राहील. तसेच जिंजियांग प्रांतातील बालमजूर वापर प्रकरणी तेथील कापसावर अमेरिकेने घातलेली निर्यातबंदी उद्यापासून अंमलात येणार आहे.

यामुळे देखील चीनमधील पुरवठा चांगलाच राहील. शिवाय या वर्षीच्या विक्रमी किमतींमुळे जवळपास सर्वच देशात कापसाचे उत्पादन वाढेल अशी शक्यतादेखील मंदीला खतपाणी घालू शकते.अर्थात, कमोडिटी बाजारातील मंदी शेतीमालामध्ये कितपत येईल हे बऱ्याच प्रमाणावर अमेरिकेतील मोठ्या हेज फंडांच्या लहरीवर अवलंबून असेल. इतर मालमत्तेतील पैसे त्यांनी शेतीमालात गुंतवला तर मंदीवर मर्यादा येईल. अर्थात, आपल्या देशातील स्थितीचा विचार करता मंदीच्या परिस्थितीमध्ये सोयाबीन, मका आणि कापूस यांचे सध्या निरर्थक वाटणारे वाढीव हमीभाव किंमत विमा संरक्षणाचे काम करू शकतील.

एकंदर पाहता वरील परिस्थिती जर-तर वर अवलंबून आहे. परंतु म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या मात्र पाऊस या एकाच गोष्टीवर नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. शेवटी निसर्गात वरील सर्व आडाखे बदलून टाकण्याची अमर्याद क्षमता आहे.

(लेखक कृषी व्यापार आणि कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com