
Oil News : भारत खाद्यतेलाचा प्रमुख आयातदार आहे. देशातील तेलबियांचे दर (Oil Seed Rate) कमी झाल्यामुळे भारत पामतेल आयातीवरील (Palm oil Import Duty) शुल्क वाढविण्याच्या विचारात आहे, अशी माहिती सरकार आणि उद्योगाच्या सुत्रांनी दिल्याचे वृत्त राॅयटर्स या संस्थेने दिले.
पामतेल आयात शुल्कात वाढ केल्यास देशातील खाद्यतेलाचे दर सुधारतील. देशातील मोहरीचे दर सुधारण्यासाठी आम्ही पामतेल आयातीवरील शुल्क वाढीचा प्रस्ताव दिला आहे, असे सरकारी सुत्रांनी सांगितल्याचं राॅयटर्सने म्हटले आहे.
मोहरी हे रब्बीतील महत्वाचे तेलबिया पीक आहे. मोहरीची लागवड ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होते. तर काढणी मार्चपासून सुरु होते. गेल्या हंगामात चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोहरीची लागवड वाढवली. पण सध्या मोहरीच्या भावावर दबाव आला आहे.
मागील काही महिन्यांमध्ये देशात खाद्यतेलाची आयात वाढल्याचा दबाव मोहरी तेलावर आला. यंदा सरकारने मोहरीसाठी ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. पण मोहरीचे दर ५ हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्यामुळं सरकार पामतेल आयात शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे.
सध्याचे आयातशुल्क
केंद्राने पामतेलावरील आयात शुल्क मागीलवर्षी कमी करून ५.५ टक्क्यांवर आणले आहे. तर रिफाईंड पामतेलावर १२.५ टक्के आयातशुल्क आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्यानंतर भारत सरकार आयातशुल्क वाढविण्याच्या विचारात आहे.
वाढती महागाई सरकारसाठी चिंतेची बाब आहे. पण खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं राॅयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
मोहरीचे दर हमीभावापेक्षा कमी
नव्या हंगामातील मोहरी उत्पादनामुळे दरावर दबाव आला. त्यामुळं मोहरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. सरकारने आयातशुल्काचा दर ठरवला आहे. यामुळे देशातील दराचा बेंचमार्क तयार होईल, असेही सुत्रांनी सांगितल्याचे राॅयटर्सने म्हटले आहे.
राजस्थानमधील निवडणुका डोळ्यासमोर
राजस्थानमध्ये पुढील काळात निवडणुका आहेत. देशातील मोहरी उत्पादनात राजस्थानाचा वाटा निम्म्यापेक्षा अधिक आहे. पण मोहरीचे भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली.
त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार शेतकऱ्यांचे हीत जोपासण्याची शक्यता आहे, असे व्यापारी आणि उद्योगाच्या सुत्रांनी सांगितले. पामतेल आयातशुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे आणि आंतरमंत्रालयीन पॅनल त्यामध्ये लक्ष घालत आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
सोयाबीनलाही आधार मिळेल
सरकारने मोहरीचे दर सुधारण्यासाठी पामतेल आयातशुल्कात वाढ केल्यास याचा फायदा सोयाबीनलाही मिळेल. सध्या सोयाबीनचे दर नरमलेले आहेत.
शेतकऱ्यांना दर सुधारण्याची प्रतिक्षा आहे. पामतेल आयात शुल्कात वाढ केल्यास सोयातेलाचेही दर वाढतील. यामुळे सोयाबीनचे दर सुधारण्यास मदत मिळेल, असेही सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.