भारतीय आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत

५ हजार ५२० बॉक्सेसमधून १६ हजार ५६० किलो आंबा कंटेनरद्वारे पाठविण्यात आला आहे. सर्व प्रक्रिया होऊन ५ जून रोजी आंबा प्रत्यक्षात जहाजावर लोड होऊन, अमेरिकेकडे रवाना होईल.
भारतीय आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत
Indian MangoAgrowon

पुणेः अमेरिकेमध्ये भारतीय आंबा निर्यात खर्च कमी होऊन, रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठीच्या गेल्या तीन वर्षांच्या प्रयत्न आणि प्रयोगाला अखेर यश आले आहे. भारतातून पहिल्यांदाच समुद्रमार्गे आंबा निर्यात सुरू झाली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे प्रतिपादन पणन संचालक आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले.

५ हजार ५२० बॉक्सेसमधून १६ हजार ५६० किलो आंबा कंटेनरद्वारे पाठविण्यात आला आहे. सर्व प्रक्रिया होऊन ५ जून रोजी आंबा प्रत्यक्षात जहाजावर लोड होऊन, अमेरिकेकडे रवाना होईल. सुमारे २५ दिवसांच्या सागरी प्रवासानंतर कंटेनर अमेरिकेतील नेवार्क या न्यूजर्सी शहराजवळील बंदरात ३० जून रोजी पोहोचणार आहे.

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स यांच्या संयुक्त प्रयत्नांनी भारतीय आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत निर्यात झाला आहे. या वेळी अमेरिकेचे क्वारंटाइन विभागाचे इन्स्पेक्टर डॉ. कॅथरिन फिडलर, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या बायोसायन्स विभागाचे संचालक डॉ. टी. के. घंटी, एन.पी.पी.ओ.चे उपसंचालक डॉ. झेड. ए. अन्सारी, ‘अपेडा’चे उपसरव्यवस्थापक श्री. रवींद्र, सानप ॲग्रो अॅनिमल्सचे संचालक श्री. शिवाजीराव सानप, ‘वाफा’चे अध्यक्ष अण्णा शेजवळ, श्री. इक्राम हुसेन, मर्क्स कंपनीचे व्यवस्थापक श्री. रवींद्रनाथन तसेच बी.ए.आर.सी. आणि कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. ३) हिरवा झेंडा दाखवून कंटेनर जेएनपीटी बंदरात पाठविण्यात आला.

Indian Mango
उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादनात ७० टक्क्यांची घट

तीन वर्षे प्रयोग, ३८ दिवस कंटेनर शीतगृहात

निर्यातीसाठीच्या प्रयोगाची माहिती पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘देशातून २०१९ मध्ये अमेरिकेस सुमारे १ हजार २०० टन आंबा निर्यात झाली होती. मात्र २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे होऊ शकली नाही. अमेरिकेला होणारी आंबा निर्यात ही सध्या १०० टक्के हवाईमार्गे होत आहे. यामुळे निर्यातदारांना प्रतिकिलो सुमारे ५५० रुपये विमानभाडे अदा करावे लागत असून, यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय आंबा किमतीच्या दृष्टीने महाग पडत असून, त्यामुळे निर्यातीवर मर्यादा येत आहेत.

यामुळे समुद्र मार्गे निर्यातीचे प्रयत्न सुरू होते. यासाठी २०१९ मध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, अपेडा, पणन मंडळ यांच्या संयुक्तरीत्या आंबा समुद्रमार्गे निर्यातीचा प्रयोग केला होता. या प्रयोगामध्ये आंब्यावर गरम पाण्याची प्रक्रिया, आंब्याच्या टिकवण कालावधी वाढविण्यासाठीची थंड पाण्यातील रासायनिक प्रक्रिया, विकिरण प्रक्रिया, प्रशीतकरण आणि शीतगृहात साठवणूक करून आंब्याचा कंटेनर भरून कंटेनर कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधेद्वारे साठवणूक करून ठेवण्यात आला होता. हा कंटेनर ३८ दिवसांनी उघडण्यात आला. या कंटेनरमधील आंबा सुस्थितीत होता. यामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने त्या दुरुस्त करून पुन्हा कंटेनर ट्रायल घेतली. यानंतर या वर्षी यशस्वीपणे आंबा निर्यात करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com