इंडोनेशिया पाम तेल निर्यातशुल्क कमी करणार

जगातील महत्त्वाच्या पाम तेल उत्पादक इंडोनेशियाने निर्यातशुल्क कमी करण्याचे संकेत दिले.
इंडोनेशिया पाम तेल निर्यातशुल्क कमी करणार
Palm Oil ImportAgrowon

पुणे ः जगातील महत्त्वाच्या पाम तेल उत्पादक (Palm Oil Producer) इंडोनेशियाने निर्यातशुल्क (Palm Oil Export Duty) कमी करण्याचे संकेत दिले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात लगेच पाम तेलाचे दर (Palm Oil Price) नरमले. इंडोनेशियात यंदा विक्रमी पाम तेल उत्पादनाचा (Record Palm Oil Production) अंदाज असल्याने हा निर्णय जाहीर केल्याचे जाणकार सांगतात; मात्र असे झाल्यास पाम तेलाचा पुरवठा वाढून दरातील तेजीला लगाम लागू शकतो, असेही जाणकारांनी सांगितले.

जगात इंडोनेशिया पाम तेल उत्पादनात अग्रेसर आहे. इंडोनेशियाने पाम तेल निर्यातबंदी केल्यानंतर खाद्यतेल बाजाराला फोडणी मिळाली होती. निर्यातबंदी मागे घेतल्यानंतर दर नरमले होते. येणाऱ्या काळात पाम तेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. देशात खाद्यतेल दरवाढ झाल्यानंतर पाम तेल निर्यातबंदी करणाऱ्या इंडोनेशियाने आता निर्यातशुल्क कमी करण्याचा विचार केला आहे. याचा फायदा पाम तेल आयातदार देशांना होईल. भारताला यामुळे सर्वाधिक दिलासा मिळेल. इंडोनेशिया पाम तेल निर्यातशुल्क सध्याच्या ५७५ डॉलर प्रतिटनावरून ४८८ डॉलर करण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाचे व्यापार मंत्री महंमद लुफ्ती यांनी नुकतेच कच्चे पाम तेल निर्यातीवर शुल्क जाहीर केले. लुफ्ती यांनी सांगितले की, कच्चे पाम तेल निर्यात शुल्क २८८ डॉलर प्रतिटनांपर्यंत वाढेल. तर निर्यातीवरील कमाल लेव्ही २०० डॉलरपर्यंत कमी करण्यात आली. म्हणजेच कच्चे पाम तेल निर्यातीवर दोन्ही मिळून ४८८ डॉलर शुल्क असेल. परंतु या शुल्काची आकारणी केव्हापासून होईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

इंडोनेशियाने निर्यातशुल्क कमी करणार असल्याचे जाहीर केले. याचाच अर्थ असा होतो, की इंडोनेशिया पाम तेल निर्यातवाढ करणार. यात पुढील महिनाभर पाम तेल पुरवठा सुरळीत झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाचे दर कमी होण्यास मदत होईल, असे जाणकारांनी सांगितले. पाम तेल बाजार आणि मागणी यानुसार इंडोनेशिया सरकार लेव्ही आकारत असते. लेव्ही वाढवली की पाम तेलाचे दरही वाढतात. याउलट लेव्ही कमी केली की दरात काहीसा दिलासा मिळतो. जाणकारांच्या मते, पाम तेलाच्या दरात पुढील काही आठवडे घसरण झाली तर इंडोनेशिया २५ लाख टन पाम तेल निर्यात करू शकते.

आंतरराष्ट्रीय बाजारात दर नरमले

इंडोनेशियाने निर्यातशुल्क कमी करण्याचे जाहीर केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया बाजारात लगेच उमटली. बुर्सा मलेशिया एक्स्चेंजवर बुधवारी पाम तेलाचे ऑगस्टचे वायदे १ टक्क्याने घसरून ६ हजार ४२८ रिंगिट प्रतिटनावर आले. रिंगिट हे मलेशियाचे चलन आहे. डॉलरमध्ये १ हजार ४६३.५७ प्रतिटन दर झाला. तर गुरुवारी हाच दर ६ हजार २४३ रिंगीटपर्यंत खाली आला. म्हणजेच इंडोनेशियाच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाचे दर नरमले. येणाऱ्या हंगामात इंडोनेशियात पाम उत्पादन वाढीची शक्यता आहे. त्यामुळेही पाम तेलाचे दर कमी झाल्याचा दावा काही जाणकारांनी केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com