शेती निविष्ठांच्या किमती भडकल्या

बाजारात निविष्ठांच्या किमतींत २० ते ८० टक्के वाढ; शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला कात्री लागणार
Input Price
Input PriceAgrowon

पुणे ः शेतीमालाच्या बाजारभावात (Input Price) चढ-उतार होण्याचे दुष्टचक्र, वाहतूक व कच्च्या मालाच्या (Raw Material Rate) वाढलेल्या किमती, वीज आणि सिंचनासाठी (Irrigation) होणारा मनस्ताप शेतकऱ्यांच्या माथी कायम आहे. यात आता २० ते ८० टक्क्यांनी भडकलेल्या निविष्ठांची (Input Price) भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची (farmer Income) गळती वाढेल, अशी भीती कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

निविष्ठांच्या बाजारात येत्या खरिपासाठी बियाणे आणि खतांचा पुरवठा यापूर्वीच सुरू झालेला आहे. रासायनिक खतांच्या किमती १२ टक्क्यांपासून ते ८८ टक्क्यांपर्यंत वाढलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला कापूस व सोयाबीन ही राज्याची दोन मुख्य खरीप नगदी पिके करण्यासाठी शेतकऱ्यांना यंदा ५ ते ११ टक्के जादा किंमत मोजून बियाणे खरेदी करावे लागत आहे. तणनाशकांच्या किमतीदेखील ४४ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

कीडनाशकांच्या बाजारपेठेत अद्याप नव्या मालाचा पुरवठा झालेला नाही. जुलैपासून कीडनाशकांची विक्री सुरू होत असल्याने उत्पादक कंपन्यांकडून सध्या वितरकांच्या पातळीवर पुरवठ्याचे नियोजन चालू आहे. ‘‘कीडनाशकांच्या किमती गेल्या हंगामातच २० ते ३० टक्क्यांनी वाढलेल्या होत्या. यंदाचे नवे दर अद्याप आमच्या हाती आलेले नाहीत. मात्र त्यात १० ते १५ टक्क्यांची वाढ असल्याचे संकेत आम्हाला कंपन्यांकडून मिळत आहेत,’’ अशी माहिती निविष्ठा विक्री उद्योगातून देण्यात आली.

निविष्ठांच्या किमतीत वाढ झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न आपोआप घटते. उत्पादित मालाचे योग्य दाम शेतकऱ्यांच्या हाती जाण्यासाठी वेळोवेळी किमान आधारभूत किमतीत भरीव वाढ करणे हाच एकमेव पर्याय आहे.
डॉ. सी. डी. मायी, माजी कुलगुरू, अध्यक्ष, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र, दिल्ली
शेतीमाल उत्पादनात निविष्ठा अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. पर्याय उपलब्ध नसतील आणि अत्यावश्यकता असेल तर कितीही खर्चिक निविष्ठा वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. विशेषतः फलोत्पादनात काही निविष्ठा प्रचंड महाग असूनही वापराव्या लागतात. निविष्ठा महागल्याने त्या विकत घेण्याचे प्रमाण एकदम घटत नाही. कारण उधारीत निविष्ठा विक्रीचे प्रमाण मोठे असून, विक्रेत्यांकडून शिफारशी झालेल्या निविष्ठा वापरण्याचे प्रमाण देशात मोठे आहे.
डॉ. एस. डी. सावंत, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
जागतिक बाजारपेठेत कच्चा माल तसेच वाहतूक महागल्याने निविष्ठा खर्चात यंदा मोठी वाढ झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना येत्या खरीप व रब्बी हंगामात बसेल. मात्र कापूस व सोयाबीन बियाण्यांचे दर वाढले असले तरी बाजारभावातदेखील वाढ झाली आहे. त्यातल्या त्यात ही जमेची बाजू आहे.
मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

...अशी आहे निविष्ठांमधील किंमतवाढ (आकडे रुपयांमध्ये)

निविष्ठेचा प्रकार—----गेला हंगाम(२०२१-२२) —-------चालू हंगाम (२०२२-२३)---किंमतवाढ

कापूस बियाणे –७६७ (४७५ ग्रॅम)--८१० —५.६०%

सोयाबीन बियाणे–३९०० (३० किलो) –४३५०—११.५३ %

भुकटीरूप तणनाशक -९०० (प्रतिकिलो)-१३००– ४४.४४ %

द्रवरूप तणनाशक – ४५० (प्रतिलिटर)--६५०–४४ %

क्लोरपायरिफॉस कीडनाशक- ३०० (प्रतिलिटर)--४००–३३.३३

घनरूप खते

डीएपी–१२००–१३५०– १२.५%

१०ः२६ः२६—१२५०–१४७०–१७.६ %

२०ः२०ः०ः१३ —१२००-१४५०–२०.८३%

एमओपी- ९००–१७००—८८.८८%

एसएसपी–३३०–४५०–३६.३६%

विद्राव्य खते

१९ः१९ः१९—२२००–३५००–५९.०९%

०:५२:३४—३५००—५२००– ५४.२८%

१२ः६१ः ०—२८००-३८००–३५.७१%

जिब्रेलिक अॅसिड प्रतिकिलो—२१०००-२१०००– ०%

सीपीपीयू प्रतिलिटर—८५०—८५०–०%

-----

*जिब्रेलिक अॅसिड, सीपीपीयू, क्लोरपायरिफॉसच्या तुलनात्मक किमती २०२० व २०२१ मधील असून, नव्या पुरवठ्याच्या किमती जाहीर झालेल्या नाहीत.

* रासायनिक खतांच्या किमती प्रति ५० किलो गोणीच्या आहेत.

*जिब्रेलिक अॅसिड व सीपीपीयूच्या किमती द्राक्ष बागायतदार संघाच्या ओझर येथील विक्री केंद्राच्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com