Tur Market : सोयाबीन, कापसाप्रमाणं तुरीलाही चांगला भाव मिळू शकतो

राज्यातील काही ठिकाणी आता तूर काढणी सुरु झाली. त्यामुळं यंदातरी तुरीचं पीक फायदेशीर ठरेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय.
Tur Market
Tur MarketAgrowon

अनिल जाधव
पुणेः राज्यातील काही ठिकाणी आता तूर काढणी (Tur Harvesting) सुरु झाली. त्यामुळं यंदातरी तुरीचं पीक (Tur Crop) फायदेशीर ठरेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय.

मागील हंगामात सरकारच्या धोरणामुळं तुरीला हमीभावापेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी दर मिळाला होता. त्यामुळं शेतकरी पुरते अडचणीत आल्यानं यंदा तूर लागवड कमी केली. पण यंदाही सरकारनं मुक्त तूर आयातीचं धोरण कायम ठेवले.

पण तरीही यंदा तुरीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Tur Market
Tur Market : तुरीचे भाव कसे राहतील?

कडधान्य बाजारात मागील दोन तीन महिन्यांपासून चर्चा आहे ती तुरीची. कारण देशातील तूर लागवड जवळपास पाच टक्क्याने कमी झाली.

त्यातच सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीनही महिन्यांमध्ये पावसानं पिकाचं मोठं नुकसान झालं. त्याचवेळी यंदा तुरीचं उत्पादन कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळं तुरीचे दर तेजीत आले. पण नेमकं या काळात शेतकऱ्यांकडे तूर नव्हती.

शेतकरी जूनपर्यंत तूर विकून मोकळे झाले होते. केवळ बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांकडे तूर होती. त्यामुळं सहाजिक तूर बाजाराचा कासरा स्टाॅकिस्ट आणि प्रक्रिया उद्योगाच्या हाती आला.

Tur Market
Tur Market: शेतकऱ्यांच्या तुरीला काय दर मिळू शकतो? | Agrowon | ॲग्रोवन

देशातील तूर उत्पादन यंदा कमी होण्याची शक्यता बळावत गेली तशी बाजारातील तूर आवक कमी होत गेली. बाजारात नफावसुली सुरु झाली.

तुरीचे दर प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांवरून ८ हजार रुपयांपर्यंत गेले. मात्र आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात होत गेली तसे दर काहीसे कमी झाले.

सध्या बाजारात तुरीला ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही आणि होतानाही दिसत नाही.

Tur Market
Private Market : खासगी बाजार चांगला पर्याय

मग सहाजिकच तुमच्या मनातही प्रश्न आलाच असेल की, या दरवाढीचा फायदा यंदाच्या तूर हंगामात तरी आम्हाला मिळेल का? तर सध्या तरी शेतकऱ्यांनाही यंदा तुरीसाठी चांगला दर मिळू शकतो, अशी परिस्थिती आहे.

यंदा देशातील तूर लागवड कमी झाली. पिकाचं पावसानं नुकसानही झालं. पिकावर बुरशी, वांझ रोग आणि इतर रोगांचा प्रादुर्भावही झाला. त्यामुळं यंदा उत्पादन कमी राहणार आहे.


तूर उत्पादनाचे अंदाज
सरकारचा अंदाजः  ३९ लाख टन

उद्योगाचा अंदाजः ३२ ते ३५ लाख टन
अभ्यासकांचा अंदाजः २७ ते ३० लाख टन
देशातील वापरः ४५ लाख टन

कसा राहू शकतो तुरीचा पुरवठा
अंदाजे उत्पादनः ३५ लाख टन

आयात ः ९ लाख टन
एकूण पुरवठाः ४४ लाख टन
देशातील मागणीः ४५ लाख टन

शेतकऱ्यांच्या विक्रीवर दर अवलंबून
शेतकऱ्यांनी तूर हाती आल्यानंतर लगेच विक्री आणि बाजारात आवक दाटली तर दर दबावात येऊ शकतात.

शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाप्रमाणं गरजेपुरती आणि टप्प्याटप्याने तूर विकल्यास दर टिकून राहू शकतात. यंदा तुरीला प्रतिक्विटल सरासरी ६ हजार ८०० हजार ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळू शकतात.

त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं तूर विकावी, असं आवाहन तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलंय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com