अकोल्यातही विक्रेत्यांची डीएपीसोबत लिंकिंग

शेतकऱ्यांची अडवणूक; ‘कृषी’च्या कारवाईकडे लक्ष
Fertilizer
Fertilizer Agrowon

अकोला ः पाऊस झाल्याने एकीकडे पेरण्यांची (Sowing) लगबग वाढली आहे. त्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून (Agriculture Input) शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे प्रकार सुरू आहेत. अकोल्यातील काही विक्रेते डीएपी खत (DAP Fertilizer) हवे असेल तर सोबत दुसरे खत घेण्याचा आग्रह करीत आहेत. याची एक ध्वनिचित्रफीत सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. या बाबत कृषी विभाग आता काय कारवाई करतो? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

यंदाच्या हंगामात प्रामुख्याने डीएपी खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कृषी विभाग जिल्ह्यात मुबलक खतसाठा असल्याचे सांगत आहेत. मात्र मोठी मागणी असलेल्या अशा खतखरेदीसाठी शेतकऱ्यांना लिंकिंगच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. डीएपीसोबत दुसरी खते घेण्यास बंधनकारक केले जात आहे. आधीच रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच सोबत दुसरे खत देऊन अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत.

या प्रकाराचे एका शेतकऱ्याने स्टिंग ऑपरेशन केले. सध्या प्रसारित झालेल्या संबंधित ध्वनिचित्रफितीत शेतकरी डीएपीच्या १० बॅगची मागणी करताना दिसतो. त्यात त्याला कृषी केंद्रातील कर्मचारी दुय्यम खताची बॉटल घ्यावीच लागेल, असे सांगतो. हा शेतकरी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करतो, असे सांगतो. त्यावर कर्मचारी, ‘तुम्ही कुठेही बिनधास्त तक्रार करा,’ असे उत्तर देतो.

सर्व खतांच्या कंपन्या या शासनाच्या अधीन आहेत. त्याच सर्व वितरकांना लिंकिंग करतात. त्यामुळे विक्रेत्यांना खत विकताना लिंकिंग करावे लागत आहे. आमची मानसिकता लिंकिंगमध्ये खत विकण्याची अजिबात नाही. यावर शासनानेच लक्ष घालणे गरजेचे आहे. जर कृषी विभाग खत विक्रेत्यांवर लिंकिंग प्रकरणात कारवाई करीत असेल, तर जिल्ह्यातील सर्व खत विक्रेते खताची विक्री थांबवतील.
मोहन सोनोने, अध्यक्ष, अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com