
पुणेः शेजारचा पाकिस्तान देश आयातीवर (Cotton import) मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. त्यातच यंदा पाकिस्तानला अतिपाऊस आणि पुराचा फटका बसला.
त्यामुळे पाकिस्तानमध्ये पाच महिन्यांतील कापूस आवक (Cotton Arrival) ३७ टक्क्यांनी घटली. यावरून पाकिस्तानमधील कापूस उत्पादन (Cotton Production) घटीचा अंदाज येतो.
परिणामी यंदा पाकिस्तान कापूस आयात वाढविण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमध्ये महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये अति पाऊस आणि पुरामुळे पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली.
परिणामी पाकिस्तानमधील बाजारातील कापसाची आवक जवळपास ३७ टक्क्यांनी यंदा घटली, असे पाकिस्तान काॅटन जिनर्स असोसिएशनने १ जानेवारीला प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानमधील बाजारात चालू विपणन वर्ष २०२२-२३ मधली पहिल्या पाच महिन्यांमध्ये म्हणजेच ऑगस्ट ते डिसेंबर या दरम्यान ४६ लाख १३ हजार कापूस गाठींची आवक झाली. एक कापूस गाठ १७० किलोची असते.
तर मागीलवर्षी पहिल्या पाच महिन्यांमधील कापूस आवक ७३ लाख ४७ हजार गाठी कापूस बाजरात आला होता. म्हणजेच यंदा बाजारातील कापूस आवक २७ लाख ३५ हजार गाठींनी कमी झाली.
डिसेंबर महिन्यातील कापूस आवकेचा विचार करता, यंदा कापूस आवक ८५ टक्क्यांनी वाढली. डिसेंबर २०२१ मध्ये पाकिस्तानच्या बाजारातील कापूस आवक १ लाख ७९ हजार गाठींवर झाली.
पण डिसेंबर २०२२ मधील कापूस आवक ३ लाख ३२ हजार गाठींवर पोचली होती.
सिंध प्रांताला पुराचा जास्त फटका
पाकिस्तानमधील राज्यनिहाय कापूस आवकेचा विचार केल्यास येथील पिकाला पुराचा किती फटका बसला, याची कल्पना येते.
पाकिस्तानमधील सिंध प्रांतात पुराचा सर्वाधिक फटका बसला. सिंधमधील ऑगस्ट ते डिसेंबर २०२२ मधील कापूस आवक ४७ टक्क्यांनी कमी आहे.
या काळात १८ लाख ५० हजार गाठी कापूस आवक झाली होती. तर २०२१ मधील याच काळातील कापूस आवक ३५ लाख गाठींवर होती.
पंजाब राज्यातील आवकही घटली
पंजाबही पाकिस्तानमधील महत्वाचे कापूस उत्पादक राज्य आहे. पंजाबमधील कापूस आवक २८ टक्क्यांनी घटली.
२०२२ मधील पहिल्या पाच महिन्यांमधील कापूस आवक २७ लाख ६२ हजार गाठी कापूस आवक झाली होती. तर २०२१ मध्ये याच काळातील आवक ३८ लाख ३९ हजार गाठींवर स्थिरावली होती.
भारतातून कापूस आयात सोईस्कर
पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादन घटले. मात्र येथील कापूस वापर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं यंदा पाकिस्तानची आवक आयात वाढण्याचा अंदाज आहे. पाकिस्तान जवळपास ५० टक्के कापूस अमेरिकेतून आयात करतो.
मात्र यंदा अमेरिकेतही कापूस उत्पादन घटलं. त्यामुळं दरही जास्त आहेत. आयातीसह पाकिस्तानला अमेरिकेचा कापूस आणखी महाग पडेल. त्यामुळं पाकिस्तानला भारताकडून कापूस आयात स्वस्त पडू शकते.
मात्र दोन्ही देशांमधील राजकीय तणामुळे सध्यातरी हे शक्य दिसत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत सरकारने कापूस निर्यातीसाठी पुढाकार घेतल्यास तोडगा निघू शकतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.