नागपुरात विविध जातींच्या आंब्यांचा हंगाम जोमात

नागपूर - कळमणा येथील बाजार समितीत सध्या महाराष्ट्रातील विविध जातींच्या आंब्यासह तेलगंणा राज्यांतील बेंगनपल्ली आंब्याची मोठी आवक वाढीस लागली आहे. दररोज विविध जातींच्या आंब्याची (कच्च्या व पिकलेल्या मिळून) सुमारे १० टन आवक होत असून, दोन ते महिन्यांच्या हंगाम काळातील उलाढाल कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचते. या बाजार समितीतून परराज्यांतही आंबा पाठवण्यात येतो.
Mango
MangoAgrowon

कैरी हा शब्द जरी उच्चारला तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. ग्राहकांकडून पिकलेल्या त्याचबरोबर कच्च्या आंब्यांनाही मागणी असते. नागपूर- कळमणा स्थित पंडित जवाहरलाल बाजार समिती परिसरात आंब्याची मोठी आवक वाढीस लागली आहे. तेलंगणातील बेंगनपल्लीसह महाराष्ट्रातील दशहरी, लंगडा, पायरी आदी जातीचा आंबाही बाजारात पाहण्यास मिळत आहे. दररोज विविध जातींच्या आंब्याची सुमारे १० टन आवक होत असून, अवघ्या दोन ते महिन्यांच्या हंगाम काळातील उलाढाल कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचते.

बेंगनपल्लीचा दबदबा

कळमणा बाजार समितीत भाजीपाला, धान्य आणि फळांसाठी स्वतंत्र लिलाव शेड उभारण्यात आले आहेत. त्याच ठिकाणी लिलावाची प्रक्रिया पार पाडली जात असल्याने गोंधळ होत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून बाजारात आंब्याची आवक वाढती असल्याचे दि नागपूर फ्रूट्‌स डीलर असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले. ते म्हणाले, की तेलंगणा राज्यातून बेंगनपल्ली आंब्याची आवक सर्वाधिक म्हणजे दररोज पाच ते आठ टन या दरम्यान आहे. संपूर्ण हंगामात १५० ते २०० टन आवक होते. सध्या या आंब्याला ४० ते ५५ रुपये प्रति किलो असा घाऊक दर मिळत आहे. बेंगनपल्लीची आवक एकजूनपर्यंत राहील.

Mango
MangoAgrowon

...असे होतात आंब्याचे व्यवहार

राज्यासह विदर्भातील काही शेतकऱ्यांनी आमराईचे अस्तित्व म्हणण्यापेक्षा त्याचा वारसा अनेक वर्षांपासून राखला आहे. यंदा वातावरणातील बदलांचा फटका आमराईला बसला आहे. त्यामुळे उत्पादकतेत घट आली आहे. परिणामी, स्थानिक बागांमधील आंब्याची आवक दररोज १० ते ११ टेम्पो इतकी मर्यादित आहे. कोरोना काळात बाजार समितीत लिलावावर बंधने आणण्यात आली होती. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे चारच दिवस फळबाजारात लिलाव होतात. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. आंब्याची कमी आवक असेल तर ढीग मारून लिलाव पार पाडले जातात. आवक अधिक असेल तर वाहनासमोरच उभे राहून बोली लावली जाते. सुमारे १०० अडत्यांच्या माध्यमातून हे काम होते. बाजार समितीकडून शेकडा एक रुपया पाच पैसे सेस आकारला जातो.

आवकेची स्थिती

गेल्या हंगामात (२०२१) २७ मार्चपासून बाजारात आंब्याची आवक सुरू झाली. सात ऑगस्टपर्यंत बेंगनपल्लीची एक लाख नऊ हजार तीनशे सहा क्विंटल तर स्थानिक जातीच्या आंब्यांची सुमारे तीन लाख ६१ हजार आवक झाली. या वर्षी वातावरणातील बदलांमुळे आंब्याची आवक एक महिना उशिरा झाली. ११ एप्रिलच्या दरम्यान बाजारात आंबा दाखल झाला. आजवर सुमारे २७ हजार १६१ क्‍विंटल इतकाच आंबा बाजारात पोहोचला. गेल्या वर्षी याच काळात आवक ३० हजार क्विंटलहून अधिक तर दर प्रति क्विंटल ३००० ते ४००० रुपयांप्रमाणे होते.

यंदाच्या हंगामात सुरुवातीला आवक ६६७ क्‍विंटल इतकी अत्यल्प आणि दर ३००० ते ६००० रुपये होते. टप्प्याटप्प्याने दरात तेजी अनुभवण्यात आली. अपेक्षित मोहोर न धरणे, किडी-रोगांचा प्रादुर्भाव, हवामान आदी कारणांमुळे उत्पादन घटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सद्यःस्थितीत आंब्याचे व्यवहार ४००० ते ६००० रुपये दराने होत असून दररोजची आवक ५५०० क्‍विंटल आहे. तेलंगणासह स्थानिक जातीच्या आंब्याची आवक कुही, मांडळ, पवनी, लाखांदूर या भागांतून होते. भंडारा जिल्ह्यातून होणारी आवक सर्वाधिक राहत असल्याची माहिती नागपूर फ्रूटस डीलर असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी दिली. खरेदी केलेला आंबा मागणीनुसार उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, चंडीगड या राज्यांतील बाजार समित्यांमध्ये पाठविला जातो.

Mangp
MangpAgrowon

शेतकरी अनुभव

भंडारा जिल्ह्यातील माडगी येथील कवडु शांतलवार आंध्र प्रदेश भागात १९९३ मध्ये अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी या भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे कारण आंबा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सन १९९४ मध्ये त्यांनी आपल्या शिवारात आंबा लागवडीचा निर्णय घेतला. दशहरी, लंगडा, केसर, राजापुरी, मलिका, आम्रपाली, रत्ना, बेंगनपल्ली, सिंधू आदी जातींच्या आंब्यांची अठरा एकरांवर त्यांची लागवड आहे. ३० बाय ३० फूट असे लागवड अंतर आहे. एकरी सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न होते. अधिक उत्पादकता मिळण्यासाठी पुढील काळात १५ बाय १५ फूट अंतरावर नव्या लागवडीचे नियोजन आहे. सेंद्रिय पद्धतीने बागेचे व्यवस्थापन होते. झाडांची वाढ सुयोग्य असल्याने फळांना चव आणि दर्जा राहतो असा शांतलवार यांचा अनुभव आहे.

अननसाची केरळातून आवक

केरळ राज्यातून कळमणा बाजार समितीत होणारी अननसाची आवक डोळे दिपविणारी आहे. सहा ते सात गाड्या या प्रमाणात दररोज अननसाची आवक होते. एका गाडीत सरासरी १० टन माल राहतो अशी माहिती व्यापारी ज्ञानेश्‍वर उमराटे यांनी दिली. ही आवक बाराही महिने राहते. येथूनच मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यांना पुरवठा होतो.

संपर्क ः आनंद डोंगरे, ९४२२१०५५१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com