भारतीय कापसाचा आता कस्तुरी ब्रँड

जागतिकस्तरावर कापूस लागवड (Cotton Cultivation) क्षेत्रात भारताचा पहिला क्रमांक लागतो. उत्पादनाच्या बाबतीत मात्र जगातील इतर कापूस उत्पादक (Cotton Producer Countries) देशाच्या तुलनेत भारत पिछाडीवर आहे.
Kasturi Brand
Kasturi BrandAgrowon

नागपूर : भारतीय कापसाला (Indian Cotton)जगभरात प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न येत्या काळात केला जाणार आहे. त्याकरिता कस्तुरी ब्रॅण्डणे भारतीय कापसाचे मार्केटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंदर्भाने तीन विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

जागतिकस्तरावर कापूस लागवड (Cotton Cultivation) क्षेत्रात भारताचा पहिला क्रमांक लागतो. उत्पादनाच्या बाबतीत मात्र जगातील इतर कापूस उत्पादक (Cotton Producer Countries) देशाच्या तुलनेत भारत पिछाडीवर आहे.

एकरी अवघे चार क्विंटल कापसाचे उत्पादन भारतात होते. त्यामुळेच भारतात कापूस उत्पादनाला चालना मिळावी याकरिता अतिसघन पद्धतीने कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत यावर मंथन झाले.

केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) , केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यमंत्री दर्शना जरदोष यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच शेतकऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती. मध्य प्रदेश, महाराष्ट्र तसेच तेलंगणा या तीन कोरडवाहू कापूस उत्पादक राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता दहा सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

कापसाच्या उत्पादकता वाढीसोबतच त्याचे ब्रँडिंगदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता भारताच्या कापसाला जागतिकस्तरावर ओळख मिळावी याकरिता कस्तुरी ब्रॅंडने त्याचे प्रमोशन केले जाणार आहे. शुक्रवारी (ता. २९) मुंबईत या विषयावर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, टेक्स्टाइल समितीचे अजित चव्हाण यांच्यासह ऑनलाइन माध्यमातून भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा उपस्थित होते.

अमेरिका, इजिप्तसारख्या देशांनी कापसाच्या ब्रँडिंगवर भर दिला आहे. त्याचे मूल्यवर्धन देखील त्याच ब्रँडनेम खाली केले जाते यातून त्यांना प्रीमियम मिळतो. संबंधित देशांचा ब्रँड असल्याने त्यांच्या कापसाचा दर ते निर्धारित करतात. परंतु भारताचा कापसाचा ब्रँड नसल्याने आपल्याला खरेदीदार मागतील त्याच भावात कापूस विकावा लागतो. त्यामुळेच भारतीय कापसाचा ब्रँड केला जाणार आहे.

...अशा आहेत तीन समित्या

या ब्रँडचा दर्जा काय? हे सांगण्यासाठी व्हॅल्यू प्रपोझिशन समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती दर्जा निर्धारित करेल त्याच दर्जानुसार कापसाची प्रत राखली जाणार आहे. कापसाच्या प्रमाणीकरण विषयक दुसरी समिती राहणार आहे. तिसऱ्या समितीचे काम हे निधी जुळवा जुळवीचे राहणार आहे.

ब्रँडचे प्रमोशन व इतर कामांसाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता या माध्यमातून करण्याचे प्रस्तावित आहे. अशा प्रकारच्या तीन समित्यांची स्थापना पहिल्या टप्प्यात आणि बैठकीत करण्यात आले. या समित्यांचा अहवाल १५ ते २० दिवसांत अपेक्षित असून, त्यानंतर समितीची दुसरी बैठक होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तीन वर्षात जागतिक बाजारात भारतीय कापसाची कस्तुरी ब्रँडने विक्री करण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरता शासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

२०१९ मध्ये कापसाच्या ब्रँण्डवर चर्चा सुरू झाली. त्यावर आता प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. या ब्रँडचे व्हॅल्यू प्रपोझिशन (मूल्य विधान) काय असतील याकरिता एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. कापसाच्या या भारतीय ब्रँडचे मूल्य वैशिष्ट्य काय राहतील हे यातून जगाला सांगितले जाणार आहे. हा ब्रँड कुठेही विकला गेला तरी त्यातील कापसाचा दर्जा एक समान राखला जाईल यावर भर दिला जाईल. अशाच प्रकारच्या तीन वेगवेगळ्या समस्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

- मनीष डागा,कॉटन गुरू

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com