पामतेल आयात सात महिन्यांतील उच्चांकावर

जागतिक पातळीवर खाद्यतेलाचा तुटवडा असल्याने दर तेजीत आहेत. याचा फटका भारताला बसतोय. त्यामुळे सरकराने खाद्यतेल आयात वाढविण्यासाठी धडपड सुरू केली. परिणामी मे मध्ये मागील सात महिन्यांतील उच्चांकी पामतेल आयात झाली.
पामतेल आयात सात महिन्यांतील उच्चांकावर
Palm Oil ImportAgrowon

पुणे ः जागतिक बाजारात खाद्यतेल टंचाईमुळे (Edible Oil Shortage) मार्च आणि एप्रिल महिन्यात आयात (Oil Import) कमी होती; मात्र मे मध्ये सात महिन्यांतील उच्चांकी आयात झाली; मात्र इंडोनेशियाऐवजी मलेशियातून आयात वाढली. तर सोयातेल (Soybean oil) आणि सूर्यफुल तेल आयातही (Sunflower Oil Import) अधिक झाली. सरकारने शुल्कमुक्त आयातीला (Duty Free Import) परवानगी दिल्याने पुढील काळात सोयातेल आणि सूर्यफुल तेल आयात वाढेल, असे जाणकारांनी सांगितले.

जागतिक पातळीवर खाद्यतेलाचा तुटवडा असल्याने दर तेजीत आहेत. याचा फटका भारताला बसतोय. त्यामुळे सरकराने खाद्यतेल आयात वाढविण्यासाठी धडपड सुरू केली. परिणामी मे मध्ये मागील सात महिन्यांतील उच्चांकी पामतेल आयात झाली. तर एप्रिल महिन्याच्या तुलनेत पामतेल आयात १५ टक्क्यांनी अधिक होती. आयातदारांच्या मते मे महिन्यात भारताने ६ लाख ६० हजार टन पामतेल आयात केले. तर एप्रिल महिन्यातील आयात ५ लाख ७२ हजार टनांवर होती. असे असले तरी इंडोनेशियातून होणारी आयात घटली. तर मलेशिया, थायलंड आणि पपुआ न्यू गिनी या देशांतून पामतेल आयात अधिक झाली, असे सूत्रांनी सांगितले. भारत जगातील सर्वांत मोठा खाद्यतेल आयातदार आहे. त्यामुळे भारताने मलेशियातून पामतेल आयात वाढविल्याने येथील बाजाराला आधार मिळत आहे. मलेशियात पामतेलाचे दर सध्या विक्रमी पातळीवर स्थिरावले; मात्र इंडोनेशियाने देशांतर्गत खाद्यतेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी निर्यात बंद केली होती. तसेच देशांतर्गत पुरवठा वाढीसाठी काही नियम लावले. त्यामुळे भारताने मलेशियाकडे आपला मोर्चा वळविला होता.

मे महिन्यात केवळ पामतेलच नाही तर सोयाबीन तेल आयातही वाढली होती. बुर्सा मलेशिया एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर पामतेलाचे दर विक्रमी पातळीवर होते. त्यामुळे भारताने सोयाबीनतेल आयातीवर भर दिला होता. त्यामुळे मे मध्ये ३ लाख ५३ हजार टन सोयातेल आयात झाली. तर एप्रिल महिन्यातील आयात ३ लाख १६ हजार टन होती. पुढील काळात सोयातेल आयात आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण भारताने २० लाख टन सोयातेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे सोयातेलाचे सौदेही वाढल्याचे जाणकारांनी सांगितले. भारत सोयातेलाची आयात प्रामुख्याने अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून करतो.

रशियातून जास्तीत जास्त तेल आयातीचा प्रयत्न

सूर्यफुल तेल आयातही मे महिन्यात वाढली. एप्रिल महिन्यात जवळपास ६८ हजार टन सूर्यफुल तेल देशात दाखल झाले होते. तर मे महिन्यात १ लाख २४ हजार टनांची आयात झाली. रशिया आणि युक्रेन हे सूर्यफुल तेल आयातीचे स्रोत आहेत; मात्र युद्धामुळे युक्रेनमधून होणारी आयात थांबली. त्यामुळे रशियातून जास्तीत जास्त तेल आयातीचा प्रयत्न भारत करत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com