‘पीडीसीसी’कडून २६ पिकांच्या कर्जदरात वाढ

यंदा शेतकऱ्यांना मुबलक कर्जपुरवठा करण्यात येणार
‘पीडीसीसी’कडून २६ पिकांच्या कर्जदरात वाढ
Crop Loan Agrowon

पुणे ः पिकांचा उत्पादन खर्च (Production Cost) वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (PDCC Bank) जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीककर्ज दरात (Crop Loan Interest Rate) वाढ केली आहे. यंदा तब्बल २६ पिकांच्या पीककर्ज (Crop Loan) दरात वाढ केली केली आहे. यामध्ये आडसाली ऊस, फळबागा, खरीप, रब्बी, चारा पिके, फुले अशा पिकांचा समावेश असून पीककर्ज दरात सर्वाधिक म्हणजे २१ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे चालू वर्षी शेतकऱ्यांना पिकांवर खर्च करताना अडचणी येणार नसून, मुबलक कर्जपुरवठा (Loan Supply) करण्यात येणार आहे.

दरवर्षी शेतकरी घेत असलेल्या पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्च वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने उत्पादन खर्चाचे निश्‍चित केलेले दर यावर प्रगतिशील शेतकरी, तसेच जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये उत्पादन खर्चावर नुकतीच झाली होती. त्यामध्ये २६ पिकांच्या पीककर्ज दरात वाढ करण्याचे निश्‍चित करण्याचे ठरले आहे. चालू २०२२-२३ च्या आर्थिक वर्षामध्ये ठरविलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील बँकेकडून शेती कर्जामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, सोयाबीन, सूर्यफूल कापूस, ऊस, हरभरा, फळबाग, भाजीपाला पिकांना पीककर्जाचा पुरवठा केला जातो. तर शेतीपूरक कर्जातून ठिबक सिंचन, उपसा पाइपलाइन, ट्रॅक्टर, ट्रेलर, जेसीबी, शेतीपूरक अवजारे, शेळी, मेंढीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, संरक्षित शेती, बिगर शेतीमध्ये शैक्षणिक, गृहकर्ज, साखर कारखाने व औद्योगिक कर्ज दिले जाते. चालू वर्षी शेतकरी महत्त्व देत असलेल्या पिकांच्या दरात भरघोस वाढ केली आहे.

या पिकांच्या कर्जदरात वाढ झालेली नाही :

द्राक्षे, केळी, बटाटा, आले, कांदा, कोरपड, शाबुंकद, शुगर बीट, तुती लागवड, टोमॅटो, सुधारित बाजरी, तीळ, सूर्यफूल, वाल, तूर, जवस, एरंडी, मिरची, लसूण, गहू, हरभरा, करडई, लिंबू, संत्री, पेरू, मोसंबी, बोर, पपई, चिकू, अंजीर, सीताफळ, आवळा, कलिंगड, टरबूज, ढोबळी मिरची, कारली, दोडका, घेवडा, कट फ्लॉवर फुले, जाई, मोगरा, कंदवर्गीय पिके, हरितगृह व शेडनेटमधील पिके.

पिकांचे कर्जदर व कंसात झालेली वाढ

आडसाली ऊस १,३२००० (१२,०००), पूर्वहंगामी १,२६,००० (१६,०००) सुरू १,२६,००० (१६,०००), मका ३२,००० (४०००), पानमळा ५५,००० (५०००), जिरायती संकरित कपाशी ५२,००० (७०००), बागायत संकरित कपाशी ६९,००० (९०००), संकरित खरीप ज्वारी २९,००० (२५००), जिरायती संकरित ज्वारी २७,००० (२०००), खरीप-रब्बी जिरायती बाजरी २४,००० (२०००), भात आंबेमोहोर, इंद्रायणी, पवना ५८,००० (३०००), सोयाबीन ४९,००० (४०००), भुईमूग जिरायती ४०,००० (२०००), उडीद रब्बी २०००० (२०००), रब्बी- उन्हाळी ज्वारी ३३,००० (३०००) सुधारित जिरायती ज्वारी ३१,००० (३०००), उन्हाळी बाजरी २६,००० (२०००), उन्हाळी संकरित भात ५८,००० (३०००), काजू १, २१,००० (२१,०००), चिकू ७०,००० (१०,०००), नारळ ७५,००० (५०००), हापूस आंबा १,५५,००० (१५,०००), कोबीवर्गीय पिके ४२,००० (१२,०००), सुटी -इतर फुले (अॅस्टर, शेवंती, झेंडू) ३६,००० (४०००)

मागील पाच वर्षांत झालेली वाढ

वर्ष --- पिकांची संख्या -- झालेली सर्वाधिक वाढ, रक्कम

२०१८ -- १४ -- २१,०००

२०१९ -- ८ -- १०,०००

२०२० --- ३५ -- ५५,०००

२०२१-- २ -- ६०००

२०२२ -- २६ -- २१०००

चारा पिकांच्या दरात घट :

जनावरांसाठी आवश्यक असलेला चारा पिकेही अनेक शेतकरी घेतात. मात्र, काही शेतकरी नवनवीन चारा पिकांच्या जातीची लागवड करतात. त्यासाठी आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यंदा गजराज, मका, बाजरी, ज्वारी, सुबाभूळ या चारा पिकांच्या दरात कोणतेही बदल केलेले नाही. मात्र लसूणघास आणि पवना गवत या चारा पिकांच्या दरात तीन हजार रुपयांनी घट केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पिकांच्या खर्चात वाढ होत आहे. शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेताना काही वेळेस अडचणी येतात. या येऊ नये, यासाठी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पिकांच्या कर्जदरात वाढ करण्यात आली आहे.
प्रा. डॉ दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com