जिरा आयातदारांची विषमुक्त जिऱ्याला पसंती

देशात विषमुक्त जिऱ्याच्या वाणाची वानवा आहे. बारमेर आणि जैसलमेर या राजस्थानातील शुष्क प्रदेशातच विषमुक्त जिरा पिकवला जातो.
Cumin Export
Cumin ExportAgrowon

मसाल्यातील अविभाज्य घटक असलेल्या जिऱ्याला जागतिक बाजारात मोठी मागणी असते. भारत हा जगातील प्रमुख जिरा उत्पादक देश असून जगातील ७० टक्के जिऱ्याचे उत्पादन भारतात घेतले जाते. भारताखालोखाल सिरीया, तुर्की, अफगाण, सौदी अरब अमिराती या देशांतही जिऱ्याचे उत्पादन घेतले जाते.

जगाच्या कानाकोपऱ्यात जिरा निर्यात करणाऱ्या भारताची निर्यात गेल्या काही महिन्यांपासून मंदावली आहे. भारतीय जिऱ्याचा प्रमुख खरेदीदार आलेल्या चीनने मॅलेथीऑन, कार्बोसल्फान यांसारख्या ९ कीडनाशकांचे अवशेष असलेल्या जिऱ्याची खरेदी थांबवल्याने निर्यातीत घट झाली आहे. याशिवाय अन्य खरेदीदार देशांनीही विषमुक्त (कीडनाशक अवशेषमुक्त) जिऱ्याची मागणी केली आहे. याशिवाय उत्पादन घटल्याने जिऱ्याच्या किमतीत वाढ झाली आहे. वाढत्या किमतीचाही परिणाम निर्यातीवर झाला असल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे.

गुजरात, राजस्थानात एप्रिलमध्ये जिऱ्याचे सरासरी दर प्रति किलो २०४ रुपये होते. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात जिऱ्याला १२२ रुपये प्रति किलोचा दर होता. दरवाढीने निर्यातीत बरीच घट झाली. मागच्या तीन महिन्यांपासून निर्यातीत ४५ हजार टनांची घट झाली आहे. असे असूनही अलीकडच्या काही दिवसात जिरा निर्यातीचे थोडे करार पार पडले असून जूनमध्ये मागणी वाढण्याची शक्यता फेडरेशन ऑफ इंडियन स्पाईस स्टेकहोल्डर्सचे (FISS)अध्यक्ष देवेंद्र पटेल यांनी व्यक्त केली आहे.

एफआयएसएसच्या (FISS) माहितीनुसार, २०२१ मध्ये २.२१६ लाख टन जिरा निर्यात झाला. २०२० मध्ये २.५४८ लाख टन जिरा निर्यात झाला होता. ऑक्टोबरमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीत ५० टक्क्यांची घट झाली. नोव्हेंबरमध्ये ४८ टक्के, डिसेंबरमध्ये ५६ टक्क्यांची घट झाली. भारत हा प्रमुख जिरा उत्पादक देश असून एकूण उत्पादनापैकी ५२ ते ५५ टक्के जिरा निर्यात करतो. गुजरात आणि राजस्थान हे भारतातील प्रमुख जिरा उत्पादक राज्य आहेत. २०२०-२०२१ मध्ये ३.०१ लाख टन जिऱ्याचे उत्पादन झाले. त्यापूर्वीच्या चार वर्षांत जिरा लागवड क्षेत्र आणि एकरी उत्पादनात घट झाल्याचेही एफआयएसएसने (FISS) नमूद केले आहे.

लागवड क्षेत्र आणि उत्पादनात घट

या काळात शेतकऱ्यांनी जिऱ्याऐवजी मोहरी लागवडीस पसंती दिल्याने जिरा लागवडीत २८ टक्क्यांची घट झाली. त्यात हवामान बदलाचा फटका बसल्याने एकरी उत्पादनात १२.७ टक्क्यांनी घट झाली. एकट्या गुजरातमधील जिरा उत्पादन निम्म्यावर आले. जिरा उत्पादन गेल्या वर्षीच्या २.०७ लाख टनांवरून यंदा १. १६ लाख टनांवर आले. राजस्थानातही जिरा उत्पादनात ३२ टक्क्यांनी घट झाली.

भारतीय जिऱ्याचा प्रमुख खरेदीदार असलेल्या चीनकडून यंदा मागणी करण्यात आलेली नाही. चीनखालोखाल भारतीय जिरा खरेदी करणाऱ्या बांगलादेशने अफगाणिस्थानसोबत जिरा खरेदीचे करार केले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भारतीय जिऱ्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे खरेदीदार जिरा खरेदीत रस दाखवत नसून मागणीपुरतेच व्यवहार होत असल्याचे एफआयएसएसचे (FISS) म्हणणे आहे.

देशात विषमुक्त जिऱ्याच्या वाणाची वानवा आहे. बारमेर आणि जैसलमेर या राजस्थानातील शुष्क प्रदेशातच विषमुक्त जिरा पिकवला जातो. जोधपूर येथील साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरकडून विषमुक्त जिरा उत्पादनासाठी राजस्थानात एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management) कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत एका वर्षात विषमुक्त जिऱ्याचे १५ ते १६ हजार टन उत्पादन घेतले जाते.

या जिऱ्याला जगभरातील मसाला कंपन्यांची मागणी असते. इथून निर्यात होणाऱ्या जिऱ्याचा प्रत्येक लॉटची नॅशनल ॲक्रीडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅब्रॉटरीजकडून (NABL) तपासणी करण्यात येते. बाजारभावापेक्षा २० ते २५ टक्के अधिक दराने हा जिरा जगभरात जातो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com