
भातपिकाची पारंपरिक पद्धत सोडून थेट बियाणे पेरणी करण्यास पंजाब सरकार प्रोत्साहन देणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना एकरी १५०० रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. खरिपासाठी २० मेपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी शनिवारी ही घोषणा केली.
भात लागवडीच्या पारंपरिक पद्धतीत आधी रोपवाटीका तयार केली जाते. २५ ते ३० दिवसांनंतर रोपांची लागवडीयोग्य वाढ होते. त्यानंतर ही रोपे नर्सरितून काढून चिखलणी केलेल्या शेतात लावली जातात. या पद्धतीत नर्सरिपासून ते लागवडीपर्यंत पाणी जास्त लागते. तसेच या प्रक्रियेत मजुरीसाठी खर्चही वाढतो. मात्र थेट बियाणे पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा एकरी ६ हजार रुपये खर्च वाचतो. ३० टक्के पाण्याची बचत होते.
पंजाबमधील भूजल पातळीचा विचार करता येत्या काळात शेतकऱ्यांनी थेट बियाणे लागवड करावी, असे आवाहन मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी केले. राज्य सरकारने भात लागवड पद्धतीत बदल करण्याचा संकल्प केला. याद्वारे राज्यातील अधिकाधिक लागवड थेट बियाणे पेरणीतून करण्यात यावी, असा राज्य सरकारचा आग्रह आहे.
या तंत्रामुळे पाण्याचा अतिवापर टळेल. थेट बियाणे पेरणी मशीनद्वारे होते, त्यासोबतच तणनाशकही सोडण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांचा तणनाशक फवारणीचाही खर्च वाचतो. गेल्या काही वर्षांत पारंपरिक पद्धतीने लागवड झाल्याने पंजाबच्या बहुतांशी जिल्ह्यांतील पाण्याची पातळी खालावली.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी १७ एप्रिल रोजी राज्यातील २४ शेतकरी संघटनांच्या नेत्यांशीही संवाद साधला. या भात हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी थेट बियाणे पेरणी करावी अन् आपल्या नातेवाईकांना, मित्रांना अशीच लागवड करण्याचा आग्रह धरावा, असे आवाहन मान यांनी शेतकरी नेत्यांना केले.
गेल्यावर्षी पंजाबमध्ये एकूण भाताची २८ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी ६ लाख हेक्टरवर मशीनद्वारे लागवड करण्यात आली. यंदा हे प्रमाण वाढवण्यासाठी राज्य सरकार संबंधित शेतकऱ्यांना एकरी १५०० रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. याशिवाय थेट बियाणे लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.