हार्वेस्टरसाठी अनुदान देण्याची तयारी; टोपे

साखर धंद्याचे अर्थकारण ८० टक्के साखर व २० टक्के उपपदार्थ निर्मिती या गुणोत्तरावर होते. परंतु आता हेच प्रमाण ७०:३० असे झाले आहे. कारखान्यांना आता ऊसतोडणी ते गाळप या दरम्यानच्या सर्व टप्प्यांवर सूक्ष्म नियोजन करून खर्चात बचत करावी लागेल.
हार्वेस्टरसाठी अनुदान देण्याची तयारी; टोपे
Sugarcane HarvesterAgrowon

पुणेः जादा ऊस उत्पादन व मजुरांच्या टंचाईमुळे तोडणीची राज्यातील समस्या तयार झालेली आहे. त्यामुळे यांत्रिक ऊसतोड वाढविण्यासाठी हार्वेस्टरला अनुदान देण्याची तयारी चालू आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यस्तरीय साखर परिषदेत झालेल्या ‘भविष्यातील अद्ययावत तंत्रज्ञान’ या विषयावरील परिसंवादाचा समारोप करताना ते बोलत होते. ‘‘साखर कारखान्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी. त्यासाठी व्हीएसआयमधील संशोधनदेखील मार्गदर्शक ठरते आहे,’’ असे टोपे म्हणाले. ‘व्हीएसआय’च्या साखर तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. राजीव दाणी या वेळी साखर प्रक्रियेतील भविष्यकालीन आव्हानांची माहिती दिली.

व्हीएसआयच्या साखर अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राजेंद्र चांदगुडे म्हणाले, की साखर धंद्याचे अर्थकारण ८० टक्के साखर व २० टक्के उपपदार्थ निर्मिती या गुणोत्तरावर होते. परंतु आता हेच प्रमाण ७०:३० असे झाले आहे. कारखान्यांना आता ऊसतोडणी ते गाळप या दरम्यानच्या सर्व टप्प्यांवर सूक्ष्म नियोजन करून खर्चात बचत करावी लागेल.

व्हीएसआयच्या मद्यार्क तंत्रज्ञान व जैवइंधन विभागाचे प्रमुख डॉ. काकासाहेब कोंडे यांनी, ‘‘आसवनीचा परिपूर्ण वापर होण्यासाठी ‘ज्यूस टू इथेनॉल’ या साखळीवर बारकाईने काम करावे लागेल,’’ असे सांगितले.

पर्यावरण मान्यता प्रक्रिया कठोर झाली

‘व्हीएसआय’च्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. दीपाली निंबाळकर यांनी, ‘‘पर्यावरणविषयक नवे कायदे येत आहेत. पर्यावरणाला कोणताही धक्का न लावता साखर उद्योगाने कामकाज करावे, अशी अपेक्षा नियमाची व कायद्याची आहे,’’ असे सांगितले.

साखर उद्योगातील प्रकल्पांना पर्यावरण मान्यता मिळण्याची प्रक्रिया कठोर होते आहे. एक लिटर अल्कोहोल निर्मितीसाठी पाच लिटर पाणी वापरण्याची सुविधा मागे घेण्यात आली आहे. तीन लिटरपेक्षा जास्त पाणी वापरू नये अशी नवी अट आता टाकली गेली आहे, असेही डॉ. निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com