Cotton Market : सीएआयकडून कापूस उत्पादन अंदाजात ९ लाख गाठींची कपात; कापसाचे दर वाढणार

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) ने यंदाच्या हंगामातील (२०२२-२३) कापूस उत्पादनाचा ताजा अंदाज जाहीर केला आहे. सीएआयने आधीच्या अंदाजापेक्षा कापूस उत्पादनात ९ लाख गाठींची कपात केली आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) (CAI) ने यंदाच्या हंगामातील (२०२२-२३) कापूस उत्पादनाचा (Cotton Production) ताजा अंदाज जाहीर केला आहे.

सीएआयने आधीच्या अंदाजापेक्षा कापूस उत्पादनात ९ लाख गाठींची कपात केली आहे. यंदा कापसाचे उत्पादन ३२१.५० लाख गाठी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते.

सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा (Atul Ganatra) यांनी मंगळवारी (ता. १४) हे अंदाज जाहीर केले.

कापसाच्या उत्पादनातील सर्वाधिक कपात महाराष्ट्रात दिसून येत आहे. आधीच्या अंदाजापेक्षा महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन अडीच लाख गाठींनी कमी होईल, असे सीएआयने म्हटले आहे.

तर तेलंगणामध्ये तीन लाख गाठी आणि आंध्र प्रदेशमध्ये दीड लाख गाठी कपात दाखवली आहे. तर मध्य प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी एक लाख गाठी कपात सांगितली आहे.

कापसाची मागणी मात्र आधीच्या अंदाजाइतकीच म्हणजे ३०० लाख गाठी राहण्याचा सीएआयचा अंदाज आहे. म्हणजे मागणी स्थिर असताना उत्पादन मात्र घटणार असल्याने कापसाला चांगला उठाव मिळण्याची शक्यता आहे. 

उत्पादन घटीच्या अंदाजामुळे कापसाच्या दरवाढीला बळ मिळाले आहे. कापसाचे दर येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे, असे या क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले.

Cotton Market
Cotton Market : जागतिक कापूस उत्पादन घटलं; दर टिकून राहतील?

सीएआयने कापूस निर्यातीच्या बाबतीत आधीचा अंदाज कायम ठेवला आहे. यंदाच्या हंगामात ३० लाख गाठी कापूस निर्यात होईल, असे सीएआयने म्हटले आहे. 

दरम्यान, कापूस उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा घटलेले असले तरी गेल्या वर्षीच्या (२०२१-२२) तुलनेत मात्र ते १४.४ लाख गाठींनी जास्त दिसत आहे. गेल्या वर्षी देशात सुमारे ३०७ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते.  
 
मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही सीएयआचा कापूस उत्पादनाचा अंदाज फसलेला दिसतोय. कारण यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सीएआयने ३७५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता.

त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ३४३ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज देण्यात आला. डिसेंबरमध्ये त्यात कपात करून ३३०.५ लाख गाठी करण्यात आले. त्यानंतर आता ३२१.५ लाख गाठी उत्पादनाचा ताजा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Cotton Market
Cotton Rate : कापसाचे दर वाढणार ?

मागील हंगामातही (२०२१-२२) सीएआयचा कापूस उत्पादन अंदाज पुरता चुकलेला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये ३६० लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज सांगण्यात आला होता.

त्यानंतर उत्पादन ३३५ लाख गाठींवर स्थिरावेल, असे म्हटले होते. पण त्यानंतर अंदाज सतत बदलत आधी ३२५ लाख गाठी, नंतर ३१५ आणि शेवटी ३०७ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचे सीएआयने सांगितले.

दरम्यान, वस्त्रोद्योग आणि प्रक्रिया उद्योगाला स्वस्तात कापूस मिळवून देण्यासाठी हंगामाच्या सुरूवातीला कापूस उत्पादनाचे फुगवलेले अंदाज जाहीर केले जातात, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. 

गेल्या वर्षी सीएआय आणि उद्योग क्षेत्राने कापूस उत्पादन अधिक राहणार असल्याचे चित्र बाजारात निर्माण केले. उत्पादन अधिक असल्याने बाजारभाव दबावात राहतील, अशा अफवा बाजारात पसरविण्यात आल्या.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घाबरून कापूस सात ते आठ हजार क्विंटल रूपये दराने विकून टाकला. पुढे मात्र कापसाचे दर १० ते १५ हजारावर गेले, याकडे शेतकरी आणि अभ्यासकांनी लक्ष वेधले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com