
Akola News : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी बुधवार (ता. १५) पर्यंत नावनोंदणी केली जात असून, शेवटच्या टप्प्यात या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर हरभरा विक्रीसाठी अकोला व वाशीम जिल्ह्यांत सुमारे १४ हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
या रब्बी हंगामात लागवड झालेल्या हरभऱ्याची काढणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वत्र आवक वाढलेली आहे. तर खुल्या बाजारात हरभऱ्याचा दर हा हमीभावाच्या (५३३५ रुपये प्रतिक्विंटल) आत आहे.
सध्या बाजारात सरासरी ४४०० रुपयांपर्यंत हरभरा विकत आहे. किमान दर तर ४००० रुपये मिळतो आहे. हमीभाव व खुल्या बाजारातील दरात मोठी तफावत असल्याने शेतकरी आता हमीभावाने खरेदी केंद्रावर विक्रीसाठी पुढे येत आहेत.
या केंद्रावर विक्रीसाठी आधी नावनोंदणीची गरज आहे. प्रशासनाने नावनोंदणीची प्रक्रिया सुरू केलेली असून, बुधवारपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यात हमीभावाने खरेदीसाठी या वर्षी तब्बल ३२ केंद्र मंजूर करण्यात आलेले आहेत.
नावनोंदणीनंतर आता खरेदीची प्रक्रियासुद्धा सुरू केली जात आहे. याबाबत शासनाकडून शुक्रवारी (ता. १०) उशिरा संबंधित यंत्रणांना आदेश प्राप्त झाले आहेत.
मार्केटिंग फेडरेशनकडून मंगळवार (ता. १४) पासून खरेदी सुरू केली जाऊ शकते, अशी शक्यता जिल्हा मार्केटिंग अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी दिली.
उर्वरित यंत्रणांचीही तयारी
हरभरा खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, महाएफपीसी अशा विविध संस्थांना परवानगी दिल्या गेली आहे. या संस्थांसाठी सबएजन्ट म्हणून केंद्र वितरित करण्यात आलेले आहेत. या केंद्रांवर आता खरेदी सुरू केली जाणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.