खाद्यतेलाच्या दरात काहीशी घट

इंडोनेशियाने पामतेल निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय बाजारांत खाद्यतेलाचे दर १ ते २ रुपयांपर्यंत कमी झाले.
Edible Oil Price
Edible Oil PriceAgrowon

पुणे ः आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर वाढल्यामुळे भारताने सोयातेलाला पसंती दिली. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात पामतेल आयात कमी झाली. तर सोयातेलाच्या आयातीत मोठी वाढ झाली. तसेच इडोनेशियाने पामतेल निर्यात सुरू केल्यानंतर भारतीय बाजारांत खाद्यतेलाचे दर एक ते दोन रुपयांनी कमी झाले.

इंडोनेशियाने पामतेल निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय बाजारांत खाद्यतेलाचे दर १ ते २ रुपयांपर्यंत कमी झाले. इंडोनेशियाने २८ एप्रिलपासून पामतेल निर्यातीवर बंदी घातली होती. आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यातच इंडोनेशियाने निर्यातबंदी केली. देशातील खाद्यतेल पुरवठा वाढून दर कमी करण्यासाठी इंडोनेशियाने हा निर्णय घेतला होता.

येथे खाद्यतेलाचे दर १९ हजार ८०० इंडोनेशियन रुपियांवरून १७ हजार २०० रुपियांवर पोहोचले. मात्र खाद्यतेलाचे दर १४ हजार रुपियांवर आणण्याचे इंडोनेशियाचे उद्दिष्ट आहे. ते अद्याप खूपच दूर आहे; मात्र येथे पामतेल साठवणीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे इंडोनेशियाने २३ मे पासून पामतेल निर्यातीला परवानगी दिली. यामुळे भारतीय ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.

Edible Oil Price
खाद्यतेल महागाईचा चढता आलेख

इंडोनेशियाने पामतेल निर्यात पुन्हा सुरू केल्यानंतर पामतेलाच्या दर जवळपास एक रुपयाने कमी झाले. तर शेंगदाणा तेल एक रुपया, मोहरी तेल २ रुपये, सोयाबीन तेल एक रुपयाने स्वस्त झाले. भारत जगात पामतेलाचा सर्वांत मोठा ग्राहक आहे. भारतात दरवर्षी जवळपास ८५ लाख टन पामतेलाची आयात होते. त्यापैकी इंडोनेशियाचा वाटा निम्म्याहून अधिक आहे; मात्र मागील काही दिवसांपासून पामतेलाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले. त्यामुळे सोयातेल आणि पामतेल यांच्या दरातील तफावत कमी झाली. त्यामुळे भारतात मागील काही महिन्यांपासून सोयाबीन तेलाची आयात वाढत आहे.

जूनमध्ये सोयातेल आयात आणखी वाढण्याचा अंदाज
कच्चे पामतेल आणि कच्चे सोयाबीनतेल यांच्या दरातील तफावत १५० डॉलरवरून ७० डॉलरपर्यंत कमी झाली. सध्या सर्व खर्चांसह पामतेल १७५० डॉलर प्रतिटनाने भारतात आयात होत आहे. तर सोयातेल १८२० डॉलरने मिळतेय. तसेच सोयातेल आयात तुलनेने सोपी जाते. त्यामुळे भारतात सोयातेल आयात वाढली.

देशात एप्रिल महिन्यात पामतेलाची आयात ५ लाख ७२ हजार टनांवर झाली होती. तर मे महिन्यात ५ लाख टनांपर्यंत कमी झाली. दुसरीकडे सोयातेल आयात एप्रिल महिन्यात २ लाख ७३ हजार टन होती, ती मे मध्ये ४ लाख ५० हजार टनांवर पोहोचली. जून महिन्यातही सोयातेल आयात वाढण्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com