Soybean Market : सोयाबीन दरात सुधारणा; किती झाली वाढ?

देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी दोन दिवसांमध्ये वाढली. दोन दिवसांमध्ये जवळपास २०० ते ३०० रुपयांनी दर सुधारले.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

पुणेः मागील महिनाभरापासून शेतकरी सोयाबीन दरावाढीची (Soybean Rate) वाट पाहत आहेत. सोयाबीन उत्पादकांना काहिसा दिलासा देणाऱ्या घडामोडी आता बाजारात घडत आहेत.

देशातील बाजारात दोन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली. सोयाबीनचा किमान दर आता ५ हजार १०० रुपयांवर पोचल्याचे बाजारातील दरावरून स्पष्ट होते. 

देशातील बाजारात सोयाबीनची (Soybean) दरपातळी दोन दिवसांमध्ये वाढली. दोन दिवसांमध्ये जवळपास २०० ते ३०० रुपयांनी दर सुधारले. किमान सरासरी भाव ४ हजार ९०० रुपयांपेक्षाही कमी झाले होते. ते आज ५ हजार १०० रुपयांवर पोचले.

आज देशात सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार १०० ते ५ हजार ४५० रुपये दर मिळाला. पण दुसरीकडं काही बाजारांमध्ये किमान भाव आजही ५ हजार रुपयांपासून सुरु झाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ४०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते.

देशभरात आज जवळपास ४ लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी १ लाख ७० हजार क्विंटल आवक झाली होती. तर राजस्थानसह इतर राज्यांमधील आवक ६० हजार क्विंटलच्या दरम्यान राहिली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरुच आहेत. मात्र सरासरी दरपातळी वाढली. सोयाबीनचे मार्च डिलिवरीचे वायदे १५.२८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४८७ डाॅलर प्रतिटनावर होते.

Soybean Market
Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीन प्रति क्विंटल ४८०० ते ५२२६ रुपये

अर्जेंटीनातील उत्पादन घटले

सोयाबीन निर्मितीत ब्राझील आणि अमेरिका अर्जेंटीनाच्या पुढे आहेत. पण सोयापेंड निर्यातीत अर्जेंटीना जगात  आघाडीवर आहे. पण यंदा अर्जंटीनात दुष्काळामुळं सोयाबीन उत्पादन घटलं.

त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर तेजीत आले. परिणामी भारतीय सोयापेंड मागील काही दिवसांपासून स्वस्त झाली.

भारताची सोयापेंड स्वस्त

भारताची सोयापेंड जागतिक बाजारात टनामागं जवळपास एक हजार रुपयाने स्वस्त आहे. भारतीय सोयपेंडचे दर ५७० डाॅलर प्रतिटनाच्या दरम्यान आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयापेंडचे दर ५७५ ते ५८८ डाॅलरच्या दरम्यान असल्याचं निर्यातदरांनी सांगितलं.

सोयाबीन दराला आधार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत आहेत. चीनकडून सोयाबीनला मागणी वाढली. अर्जेंटीनात उत्पादन घटलं. ब्राझीलमध्ये पावसामुळं सोयाबीन काढणी खोळंबली असून पिकाचंही नुकसान होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडं भारतातून सोयापेंड निर्यात वेगाने सुरु आहे. मार्च महिन्यात देशातून विक्रमी सोयापेंड निर्यात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं सोयाबीनधील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

दरवाढ कायम राहणार

सध्या बाजारातील सरासरी आवक काहीशी कमी आहे. पण मागणी चांगली आहे. त्यामुळं दर सुधारले. या परिस्थितीत शेतकरी ५ हजार ५०० रुपयांचे टार्गेट ठेऊ शकतात.

तर सरासरी दरपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते. पण शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्यानं विक्रीचं नियोजन करावं, असं आवाहनही बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com