Soybean Market : सोयाबीनचे दर सुधारण्यास पोषक स्थिती

तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आजपासून बाजारांमध्ये सोयाबीनचे व्यवहार सुरु झाले. आज सोयाबीनची आवक कमी होती.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon

Soybean Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन आणि सोयापेंडच्या (Soyameal) दरात चढ उतार सुरु आहेत. पण सरासरी दरपातळी कायम दिसतेय. देशात मात्र आज सोयाबीन दरात (Soybean Rate) अनेक बाजारांमध्ये नरमाई दिसून आली.

दुसरीकडे सोयाबीन आवक (Soybean Arrival) मात्र कमी होती. पण सोयाबीन दर दबावात येण्याचे कारण नाही, सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आजपासून बाजारांमध्ये सोयाबीनचे व्यवहार सुरु झाले. आज सोयाबीनची आवक कमी होती. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज देशात २ लाख ३० हजार क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची आवक झाली होती.

पण दरात आज काहीशी नरमाई पाहायला मिळाली. अनेक बाजारांमध्ये सोयाबीन दर आज १०० ते २०० रुपयांनी नरमले होते. सलग सुट्ट्यांमुळे आजही व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरु झाले नाहीत. त्याचा दबाव दरावर आल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

Soybean Rate
Soybean Rate Marathwada : मराठवाड्यातील सोयाबीन बाजारात सर्वाधिक दर कुठे मिळतोय?

जगातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक ब्राझीलमध्ये सध्या काढणी सुरु आहे. पण येथे अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे सोयाबीन काढणीत अडचणी येत आहेत. परिणामी काढणीचा वेग यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे.

तर ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी यंदा कमी प्रमाणात सोयाबीनची विक्री केली. शेतकऱ्यांनी ३५ टक्के सोयाबीन विकल्याचं येथील काही संस्थांंनी सांगितलं. पावसामुळे काढणी कमी असून विक्रीही कमी झाल्याचं शेतकरी सांगत आहेत.

ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तर अर्जेंटीनात उत्पादन कमी राहणार आहे. अर्जेंटीना सोयातेल आणि सोयापेंड निर्यातीत आघाडीवर आहे. ब्राझीलमध्ये सोयाबीनचे गाळप कमी होते. ब्राझील सोयाबीन निर्यात करत असतो.

त्यामुळं यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल आणि सोयापेंडची उपलब्धता कमी राहू शकते. त्यामुळं सोयापेंडचे दर मागील काही दिवसांपासून सुधारलेले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.१४ डाॅलरवर होते. तर सोयापेंडचा भाव ४८७ डाॅलरवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज वायद्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. पण सरासरी भावपातळी टिकून आहे.

पुढील काळातही सोयाबीन आणि सोयापेंडचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आजची सोयाबीन दरपातळी

देशात आज तीन दिवसांनंतर अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचे व्यवहार सुरु झाले. पण आज सोयाबीनची आवक कमी होती. लिलाव प्रक्रियेत व्यापारीही कमी प्रमाणात सहभागी झाले होते. परिणामी आज सोयाबीनच्या दरात नरमाई दिसून आली.

आज सोयाबीनला सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव आज ५ हजार ४५० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते.

Soybean Rate
Cotton Soybean Market : कापूस, सोयाबीनच्या किमतींत घट

दर वाढण्याचा अंदाज

देशात सोयाबीनला चांगली मागणी आहे. सोयापेंड निर्यात वाढल्याचा आधार सोयाबीनला मिळतोय. तसेच भारत सरकार खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करण्याच्या विचारात आहे. यामुळेही सोयाबीनचे दर सुधारु शकतात. देशातील सोयाबीन दर कमी होण्याचे कारण नाही.

पण उद्योगांकडून दर दबावात ठेवले जात आहेत. सोयाबीनला सध्याच्या काळात सरासरी ५ हजार ५०० रुपये दर मिळायला हवा. दर मात्र यापेक्षा कमीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com