Soybean Market Rate : इंडोनेशिया, मोदी सरकार आणि सोयापेंड निर्यातीवर सोयाबीन दरवाढीची भिस्त

सोयाबीन प्रक्रिया आणि व्यापार क्षेत्रातील काही घटकांनी संगनमत केले आहे. सोयाबीनचे भाव वाढू नयेत, यासाठी त्यांनी खेळी केल्याने अडथळा निर्माण झाल्याची चर्चा बाजारात आहे.
Soybean Market Rate
Soybean Market RateAgrowon

Soybean Market Update पुणे : सोयाबीनचे दर (Soybean Rate) कधी वाढणार, याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Market) वाढीचा कल दिसत आहे. हा कल पुढेही कायम राहण्याचा अंदाज आहे.

येत्या आठ ते दहा दिवसांत सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

देशातील मुलभूत घटक (फंडामेन्टल्स) आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) स्थिती सोयाबीनच्या दरवाढीला अनुकूल आहे.

परंतु देशातील सोयाबीन प्रक्रिया आणि व्यापार क्षेत्रातील काही घटकांनी संगनमत केले आहे. सोयाबीनचे (Soybean) भाव वाढू नयेत, यासाठी त्यांनी खेळी केल्याने अडथळा निर्माण झाल्याची चर्चा बाजारात आहे.

Soybean Market Rate
Soybean Cotton Rate : पीकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढीवर तुपकर आक्रमक

मागच्या हंगामात शेतकऱ्यांनी अपेक्षित भाव मिळेपर्यंत माल रोखून धरला होता. त्यामुळे या घटकांना हात चोळत बसावे लागले होते. यंदा मात्र त्यांनी संगनमत करून शेतकऱ्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकऱ्यांची वाट बघण्याची क्षमता कमी असल्याने सुरूवातीच्या टप्प्यात या खेळीला यश आले. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे चित्र आहे. तसेच देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा साठा कमी होत चाललाय. त्यामुळे कृत्रिमरित्या भाव दाबून ठेवणे आता जास्त दिवस शक्य नाही.

त्यामुळे सोयीबन परत उसळी घेईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे जाणकारांनी सांगितले.

Soybean Market Rate
Soybean Rate : सोयाबीनचे दर कोणत्या बाजारात वाढले? सर्वाधिक दर कुठे मिळाला?

खाद्यतेल आयातीला वेसण?

गेल्या काही महिन्यांत सोयाबीनचे दर घटले, त्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्र सरकारचं खाद्यतेल आयातीचं धोरण. देशातील महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचं कंबरंडं मोडणारे निर्णय सरकारकडून घेतले जात आहेत.

गेल्या काही महिन्यांत सरकारने खाद्यतेलाची बेसुमार आयात केली. परिणामी पुरवठा वाढून खाद्यतेलाचे दर नरमले. त्यामुळेच सोयाबीनवर मोठा दबाव आला. परंतु आता या खाद्यतेल आयातीला वेसण घातली जाणार असल्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारच्या अतिरेकी खाद्यतेल आयातीमुळे बाजारातील एकंदर समतोल बिघडून गेला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रानेही खाद्यतेल आयातीवर शुल्क वाढवण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत.

तेथील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या मतांवर डोळा ठेऊन खाद्यतेलावरील आयातशुल्क वाढवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण मोहरीचे दर उतरून आता हमीभावाच्या आसपास आले आहेत. ही घसरण अशीच चालू राहिल्यास तेथील शेतकऱ्यांमधील नाराजी उफाळून येईल.

तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही खाद्यतेलावर परिणाम होणार आहे. भारताला खाद्यतेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये इंडोनेशियाचा क्रमांक वरचा आहे. परंतु आता इंडोनेशियामध्ये तेथील सरकारवर खाद्यतेल निर्यातीच्या धोरणात बदल करण्याचा देशांतर्गत दबाव वाढत आहे.

त्यामुळे इंडोनेशिया लवकरच खाद्यतेल निर्यातीवर बंधने घालण्याच्या तयारीत आहे. या आठवड्यात यासंबंधीचा निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. त्याचा थेट परिणाम भारताच्या खाद्यतेल आयातीवर होईल.

थोडक्यात खाद्यतेलाचे आयातशुल्क वाढण्याची शक्यता आणि इंडोनेशियातील खाद्यतेल निर्यातीच्या धोरणातील संभाव्य बदल यामुळे सोयाबीनला भक्कम आधार मिळण्याची चिन्हे आहेत.

Soybean Market Rate
Soybean Market : देशात सोयाबीन सुधारले; आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड तेजीत

सोयापेंड निर्यातीत वाढ

सोयाबीनसाठी दुसरी अनुकूल गोष्ट म्हणजे सोयापेंड निर्यातीत झालेली सुधारणा. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड तेजीत आहे. त्यामुळे भारतातील सोयापेंडला मागणी वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोयापेंड निर्यातीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येईल, असे बाजार अभ्यासकांनी सांगितले.

सोयापेंड प्लान्ट्सकडील किफायतशीर किंमतीत खरेदी केलेला सोयाबीनचा साठा आता संपत आला आहे. निर्यातीचे करार पूर्ण करण्यासाठी त्यांना बाजारातून सोयाबीन खरेदी वाढवणे भाग आहे. सोयापेंड निर्यातीला मागणी अधिक आणि बाजारात सोयाबीनचा पुरवठा तुलनेने कमी अशी सध्याची स्थिती आहे.

कमी किंमतीत सोयाबीन पदरात पाडून घेण्यासाठी खरेदीदारांना आता जास्त काळ ताणून धरता येणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले. तसेच सोयापेंडची देशांतर्गत मागणीही चांगली आहे. पोल्ट्री उद्योगाकडून मजबुत मागणी असल्यामुळे दर चढे राहतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

दरम्यान, सोयापेंड निर्यातवाढीवर सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानेही शिक्कामोर्तब केलं आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांमध्ये देशातून ६ लाख ३१ हजार टन सोयापेंड निर्यात झाली, अशी आकडेवारी सोपाने दिली आहे.

मागील हंगामात याच काळातील निर्यात ३ लाख ८३ हजार टन होती. या सगळ्या घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर निश्चितच वाढतील, अशी माहिती बाजार अभ्यासकांनी दिली. शेतकऱ्यांनी ५५०० रूपयांच्या भावपातळीवर लक्ष ठेऊन मालविक्रीचा निर्णय घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com