Soybean & Maize: सोयाबीन, मका आश्वासक राहण्याची चिन्हे

मागील वर्षात कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean) आणि मका (Maize) या महाराष्ट्रात होणाऱ्या तिन्ही महत्त्वाच्या खरीप पिकांचे भाव जबरदस्त तेजीत राहिले. त्यामुळे शेतकरी कुठल्या पिकाला अधिक पसंती देतील हे सांगणे थोडे कठीण आहे. परंतु कापूस लागवड सर्वात अधिक राहील असे वाटत होते.
Soybean & Maize
Soybean & MaizeAgrowon

श्रीकांत कुवळेकर

कापूस (Cotton) क्षेत्र मागील वर्षांएवढे जरी राहिले तरी कापसाची उत्पादकता मागील वर्षाहून निश्चितच अधिक राहील असे म्हणायला हरकत नाही. शिवाय पुढील आठवड्यात कापसाखालील क्षेत्रात अजूनही वाढ दिसून येईल. आणि जागतिक स्तरावर देखील कापसाच्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल अशी चिन्हे आहेत. कापूस हा अन्नघटक नसल्यामुळे जर जगात अपेक्षित असलेली मंदी किंवा रिसेशन आले तर सोयाबीन किंवा मक्याच्या तुलनेत कापसाच्या मागणीत अधिक घट होऊन त्याच्या किंमती हमीभावाच्या (MSP) जवळ येण्याची शक्यता खूप जास्त आहे.

मक्याचा (Maize) विचार करता घसरलेला रुपया भारतातून निर्यातीला मदत करेल आणि पुढील दोन महिन्यात देशांतर्गत साठ्यांमध्ये बऱ्यापैकी घट करेल असे म्हटले जात आहे. असे झाल्यास दिवाळीदरम्यान काढणीला आलेल्या मक्याला चांगला भाव मिळू शकेल. त्यामुळे बाजारभावाचा विचार करता सोयाबीनखालोखाल किंवा तेवढीच अनुकूलता मक्यामध्ये तरी दिसून येत आहे.

भारतीय कृषी क्षेत्रासाठी मोसमी पाऊस (Monsoon) फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. पूर्वी नियमितपणे १ जून दरम्यान येणाऱ्या मॉन्सूनचे आगमन आणि त्यानंतरची प्रगती ही अलीकडील ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात चांगलीच अनियमित झाली आहे. त्यामुळे पेरणीचे नियोजन चुकत आहे. दुबार पेरणी किंवा पीक बदल करावे लागत आहेत. खरीप हंगाम पेरणी नियोजनाच्या दृष्टीने हे वर्ष खूपच वेगळे होते. आपल्याकडे पुढील काळात बाजाराचा कल काय राहील यापेक्षा मागील वर्षात ज्या पिकाला चांगला भाव मिळाला तेच पीक अधिक प्रमाणात घेण्याची थोडीशी चुकीचीच प्रथा आहे.

मागील वर्षात कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean) आणि मका (Maize) या महाराष्ट्रात होणाऱ्या तिन्ही महत्त्वाच्या खरीप पिकांचे भाव जबरदस्त तेजीत राहिले. त्यामुळे शेतकरी कुठल्या पिकाला अधिक पसंती देतील हे सांगणे थोडे कठीण आहे. परंतु कापूस लागवड सर्वात अधिक राहील असे वाटत होते.

परंतु पावसाने मागील तीन-चार वर्षातील अनियमितता याही वेळी जपली. त्यामुळे पेरण्यांचे गणित बिघडल्याचे पाहायला मिळाले. मागील आठवड्यापर्यंत देशव्यापी पेरण्यांची आकडेवारी पाहिली तर असे दिसून येईल की १५-२०% क्षेत्रवाढ अपेक्षित असलेल्या कापसाने जेमतेम मागील वर्षांएवढे क्षेत्र गाठले आहे. तर सोयाबीन अजूनही २२ टक्के एवढ्या मोठ्या पिछाडीवर आहे. तर मक्यातील पिछाडी २४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

चौथे महत्त्वाचे पीक म्हणजे तूर. परंतु तुरीचे क्षेत्र देखील २९ टक्क्यांनी मागे पडले आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये खरिपाची स्थिती मागील आठवड्यापर्यंत तरी चांगली नव्हती. अर्थात मागील आठवड्यापासून राज्यभर चांगल्या पावसाची सुरवात झाल्याचे दिसत असून येत्या १५ दिवसात ही आकडेवारी कमालीची बदलू शकेल. या पार्श्वभूमीवर आत्ताच कोणतीही भाकिते करण्यापेक्षा सध्याची आणि येत्या दिवसांतील बाजारातील परिस्थिती पाहता उरलेल्या पेरणीच्या काळात कुठल्या पिकाचा पर्याय अधिक चांगला राहील याकडे लक्ष देणे अधिक सयुक्तिक ठरेल.

याबाबतीत उद्या रात्री प्रसिद्ध होणारा अमेरिकी कृषी खात्याचा (यूएसडीए) जुलै महिन्याचा अमेरिकेतील आणि जागतिक कृषिमाल मागणी पुरवठा अनुमान अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. जून महिन्याचा अहवाल सोयाबीनसाठी तेजीदर्शक वाटला असला तरी प्रत्यक्षात त्यानंतर सोयाबीनमध्ये अमेरिकन वायद्यांमध्ये जोरदार विक्रीचा मारा आपण पाहिला आहे.

२०२२-२३ साठी मार्चमधील पहिल्या अनुमानामध्ये अमेरिकेतील सोयाबीन क्षेत्र ९१ दशलक्ष एकर अनुमानित होते. ते जूनमध्ये ८८ दशलक्ष एकरवर आले आहे. परंतु या महिन्यामध्ये त्यात बऱ्यापैकी वाढ झाल्यास आणि एकूण क्षेत्र ९० दशलक्ष एकर झाले तर परत एकदा सोयाबीनमध्ये विक्री होईल. सुरवातीचा निर्यात वाढीचा वेगही अमेरिकेमध्ये मंदावल्याने दिसत आहे. त्यामुळे सिबॉटवरील मध्यम अवधीचा कल थोडा मंदीकडे झुकलेला पाहायला मिळत आहे. अर्जेन्टिना, पॅराग्वे आणि ब्राझीलमधील हंगाम उशिरा चालू होत असल्याने तेथील क्षेत्र एवढ्यातच अंदाजित करणे योग्य ठरणार नाही. सिबॉटवरील कलाचा त्यावर थोडा परिणाम नक्की होईल.

सोयाबीनवर (Soybean) परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे पामतेल. परंतु पामतेल देखील अलीकडील विक्रमी स्तरापासून ४०% घसरल्यामुळे त्याचा दबाव सोयातेल आणि सोयाबीन वर पाहायला मिळत आहे. म्हणजे एकंदरीत कल मंदीचा वाटत असला तरी बाजारात एक नियम नेहमीच महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण दोन महिने पुढील परिस्थितीचा विचार करत असतो तेव्हा बाजार आपल्यापुढे निदान एक महिना तरी असतो. त्यामुळे सध्याच्या बाजार नरमाईमध्ये हे घटक बऱ्यापैकी प्रतिबिंबित झाले असावेत.

दुसऱ्या बाजूने विचार करता खनिज तेल अजूनही १०५-११० डॉलर वर आहे. मागणी-पुरवठा या मूलभूत घटकाचा विचार करता ते ८० डॉलरपर्यंत घसरेल असे वाटत नाही. भारतासाठी विचार करता ७६ वरून ८० रुपयां पर्यंत घसरलेला रुपया, आणि खरीप क्षेत्रातील पिछाडी यामुळे एवढ्यातच मोठी घसरण अपेक्षित नाही. मध्यम अवधीसाठी सोयाबीन ५८००-६५०० रुपयांच्या कक्षेत राहून काढणीच्या वेळेला ५,५००रुपये किंवा ५,२०० रुपयांना तळ गाठेल असे मूलभूत आणि टेक्निकल तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु ही पातळी देखील हमीभावापेक्षा २०-२५% अधिकच आहे.

त्या तुलनेत कापूस क्षेत्र मागील वर्षांएवढे जरी राहिले तरी कापसाची उत्पादकता मागील वर्षाहून निश्चितच अधिक राहील असे म्हणायला हरकत नाही. शिवाय पुढील आठवड्यात कापसाखालील क्षेत्रात अजूनही वाढ दिसून येईल. आणि जागतिक स्तरावर देखील कापसाच्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल अशी चिन्हे आहेत. कापूस हा अन्नघटक नसल्यामुळे जर जगात अपेक्षित असलेली मंदी किंवा रिसेशन आले तर सोयाबीन किंवा मक्याच्या तुलनेत कापसाच्या मागणीत अधिक घट होऊन त्याच्या किंमती हमीभावाच्या जवळ येण्याची शक्यता खूप जास्त आहे.

मक्याचा विचार करता घसरलेला रुपया भारतातून निर्यातीला मदत करेल आणि पुढील दोन महिन्यात देशांतर्गत साठ्यांमध्ये बऱ्यापैकी घट करेल असे म्हटले जात आहे. असे झाल्यास दिवाळीदरम्यान काढणीला आलेल्या मक्याला चांगला भाव मिळू शकेल. त्यामुळे बाजारभावाचा विचार करता सोयाबीनखालोखाल किंवा तेवढीच अनुकूलता मक्यामध्ये तरी दिसून येत आहे.

सरकारी धोरण पातळीवर सोयाबीन, मोहरी यांच्या किंमती खूप घसरल्यास आणि आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेल, सोयातेलमध्ये मंदी आल्यास भारतात खाद्यतेल आयातीवरील शुल्क वाढण्याची शक्यता आहे. खरिपात उडीद, तूर क्षेत्र घटल्यामुळे त्यांच्या किंमती वाढल्यास सोयाबीन ऐवजी रब्बी कडधान्य क्षेत्र वाढून हंगामाच्या उत्तरार्धात सोयाबीन ला फायदा होईल. तसेच डिसेंबरमध्ये वायदेबंदी संपणार असून ती वाढवली नाही आणि वायदे परत चालू झाले तर सोयाबीनला त्याचा चांगला फायदा होईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूलतेल (Sunflower Oil) महागच ठेवण्यात रशियाचे हित असल्यामुळे आणि युक्रेनमधील सूर्यफूल उत्पादन घटणार असल्यामुळे त्याचा फायदा सोयातेलाला होईल. एकंदरीत विचार करता यापुढील काळात सोयाबीन ५,२००-६,५०० रुपये या कक्षेच्या कमाल पातळीजवळ अधिक काळ राहील असे सध्याच्या परिस्थितीत दिसत आहे. यासाठी अमेरिका आणि भारतात अनुक्रमे दोन आणि एक मोठ्या व्याजदरवाढी अपेक्षित धरल्या आहेत.

असे असले तरी कमोडिटी बाजाराचा लहरीपणा आपण वारंवार अनुभवला आहे. त्यातही आले हेज फंडांच्या मना तर त्यात कुठलेच अंदाज चालत नाहीत. याचा अनुभव आपण जेमतेम एक आठवड्यापूर्वी घेतला आहे. त्या एका आठवड्यात हेज फंडांनी ६०,००० कोटी रुपयांचे कृषी वायदे विकल्यामुळे बाजारात मोठी मंदी आली होती. तेथपासून गहू १२-१३ टक्के सुधारला आहे, तर सोयाबीन, सोयातेल आणि मक्यामध्ये देखील सुधारणा झाली आहे. परंतु पुढील व्याजदर वाढ आणि अमेरिकी कृषी खात्याचा मंगळवारचा अहवाल या दोन घटकांवर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे.

(लेखक कृषी व्यापार, कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com