थकीत तेंदुपानाच्या बोनस वाटपाला वेग

१९ कोटी मंजूर; राज्यातील ९२ टक्के तेंदूपान युनिट्सची विक्री
थकीत तेंदुपानाच्या बोनस वाटपाला वेग
TendupanAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः शंभर कोटींच्या तेंदूपत्ता संकलनाला दोन वर्षानंतर चांगले दिवस आले आहेत. यंदा ९२ टक्के तेंदू युनिटची विक्री झालेली आहे. सोबतच दोन वर्षांपासून राज्य सरकारकडे थकीत असलेल्या १९ कोटींचा बोनस मंजूर करण्यात आला आहे. वाटपही करण्यात येत असल्याने विदर्भातील ४० हजार कुटुंबांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी पेरणीच्या काळात त्यांना हातभार लागला आहे.

दोन वर्षांपासून तेंदूपत्ता बोनस मिळत नसल्याने मजूर हवालदील झाले होते. त्यांनी अनेक व्यासपीठावर पाठपुरावा केला. त्याची दखल घेत शासनाने तातडीने बोनस मंजूर करून वाटपास सुरुवात केली आहे. देशात बिडी शौकिनांचे प्रमाण कमी होत असल्याने एका दृष्टीने या व्यवसायाला अखेरची घरघरच लागलेली आहे. असे असले तरी रोजीरोटीसाठी हजारो आदिवासी जंगलात हा व्यवसाय करतात. ऑक्टोबर महिन्यात तेंदू युनिटच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध होते.

आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील बडे कंत्राटदार या भागात लिलावासाठी दाखल होतात. वनविभागाने तेंदू युनिटचा लिलाव केल्यानंतर मे महिन्यात तेंदू तोडाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होते. साधारणतः: पंधरा ते वीस दिवस हा हंगाम असतो. शेतीच्या हंगामात शेतावर राबायचे आणि उन्हाळ्यात दिवसभर तोडाईच्या कामातून चार पैसे मिळवायचे हा त्यांचा नित्यक्रम आहे.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील हजारो कुटुंबे जादा मजुरी मिळावी, या साठी तोडाईच्या कामात व्यस्त असतात. काही मजूर इतर जिल्ह्यांच्या ठिकाणीही स्थलांतरण करीत असतात. यंदा २५५ युनिटची विक्री झाली. त्यातून ७२ कोटी ५० लाख ४ हजार रुपये वन विभागाला प्राप्त होणार आहेत. त्यातील प्रशासकीय खर्च वगळता उर्वरित रक्कम तेंदू मजुरांना बोनस म्हणून देण्यात येते. झोननुसार मजुरांना वेतनही देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पाने उत्तम असल्याने तोडण्याचे दर अधिक आहेत. राज्यात तेंदूची एकूण २७६ युनिट्स आहेत. त्यापैकी २५५ युनिटची विक्री झालेली आहे.

राज्य सरकारने दोन वर्षाचे थांबलेले तेंदुपानाचे बोनस देण्यासाठी निधी दिला आहे. त्याचे वाटपही प्रादेशिक आणि क्षेत्रीय स्तरावर सुरु झाले आहे.
- प्रवीण चव्हाण, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com