Kharip Sowing: रखडलेल्या पेरण्यांना वेग

धरणाच्या पाणीसाठ्यात (Water Storage) मोठी वाढ झाली असून, शनिवारी (ता. १६) सकाळपासून पावसाने उसंत घेतली असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
Kharip Sowing
Kharip SowingAgrowon

पुणे ः जिल्ह्यात पावसाने उसंत दिल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर, काही ठिकाणी सूर्यदर्शन झाल्याने आणि वाफसा परिस्थिती निर्माण झाल्याने रखडलेल्या पेरण्यांना (Sowing) वेग आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांतील विसर्ग सोडल्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

आंबेगाव तालुक्यातील पश्‍चिम आदिवासी भागात पावसाने उसंत घेतली असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. हुतात्मा बाबू गेनू जलाशय, डिंभे धरणाचा पाणीसाठा शनिवारी (ता.१६) ६ टीएमसी म्हणजेच ५०.६६ टक्के झाला असून, गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा २४.४७ टक्के इतका होता.

धरण पाणलोट क्षेत्रात (Catchment Area)गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात (Water Storage) मोठी वाढ झाली असून, शनिवारी (ता. १६) सकाळपासून पावसाने उसंत घेतली असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यात दर वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने ही खोरी पावसाचे माहेरघर म्हणून ओळखली जातात.

यंदाही समाधानकारक पाऊस पडत असल्याने आदिवासी शेतकरी (Tribal Farmers) बांधव समाधानी असून, पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे गाणी गात भात लागवड करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जुन्नर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील राजूर, आपटाळे व डिंगोरे या तीन मंडळ विभागात सरासरीच्या २०० टक्के, तर मध्य व पूर्व भागात सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाला आहे.

शनिवार (ता.१६) पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाला हायसे वाटले. दिवसभर आकाश ढगाळ होते, अधूनमधून सूर्यदर्शन होत होते. एक जून ते १५ जुलै दरम्यान तालुक्यातील नऊ मंडळ विभागातील पर्जन्यमापन केंद्रांवर नोंदला गेलेला पाऊस मागील वर्षापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, शनिवारी (ता. १६) चास कमान धरणाचा पाणीसाठा ९१.०९ टक्क्यांवर (६.९३ टीएमसी) वर पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून, एकूण पाच दरवाजांद्वारे ४,२९५ क्युसेक वेगाने पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

चास-कमान धरणात ५१७ मिमी पावसाची नोंद

मागील वर्षी धरण भरण्यासाठी ४ ऑगस्ट हा दिवस उजाडला होता. ४ ऑगस्टलाच धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र चालू वर्षी धरणातील पाणीसाठा शंभर टक्क्यांकडे झेपावला असून खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही वक्रदारे उघडून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे. धरण परिसरात एक जूनपासून ५१७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com